सरकारने याकडे लक्ष न दिल्यास  तीव्र उपोषण करण्यात येईल-शिक्षक परिषदेचा इशारा 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 22 July 2020

नववी आणि अकरावीतील विद्यार्थांची परीक्षा न झाल्याने त्यांना मागील सत्रातील सरासरी गुण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र, या निर्णयामुळे अनेक विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.

मुंबई: नववी आणि अकरावीतील विद्यार्थांची परीक्षा न झाल्याने त्यांना मागील सत्रातील सरासरी गुण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र, या निर्णयामुळे अनेक विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा होणे अवघड असल्याने पदवीच्या विद्यार्थांप्रमाणे पास करावे, या मागणीसाठी नववी, अकरावीतील अनुत्तीर्ण विद्यार्थी आणि पालकांनी आपल्या घरी एक दिवसीय उपोषण केले.

नववी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना परत परीक्षा देऊन उत्तीर्ण होण्याची संधी देण्याबाबतचा निर्णय सरकारने पूर्वीच घेतला आहे. नववीत अनुत्तीर्ण झाले असले तरी विद्यार्थांनी दहावीचा ऑनलाईन अभ्यास सुरू केला आहे. मात्र, फेरपरीक्षा कधी होणार याबाबत शिक्षण विभागाकडून कोणतीच घोषणा होत नसल्याने वर्ष वाया जाण्याच्या धास्तीने पालकांची चिंता वाढली आहे. याविषयी काही पालकांनी शिक्षणमंत्र्यांची भेटही घेतली. मात्र, अद्याप काहीही निर्णय न झाल्याने पालक त्रस्त आहेत. वार्षिक परीक्षा झाली नसल्याने मूल्यमापनासाठी वापरलेल्या पद्धतीत अन्याय झाल्याचा आरोप पालक करत आहेत. या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांनी एक दिवसाचे उपोषण केले. विद्यार्थी आणि पालकांनी आपल्या मागण्यांचे फलक दाखवले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित पाहता आम्ही या उपोषणाला पाठिंबा दिला आहे. सरकारने याकडे लक्ष न दिल्यास आणखी तीव्र उपोषण करण्यात येईल, असा इशारा शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी दिला आहे.

शिक्षक परिषदेचा पाठिंबा
पदवीच्या विद्यार्थांना उत्तीर्ण करण्यात येत असताना नववी, दहावीच्या विद्यार्थांवर अन्याय का, असा सवाल करत पालकांनी उपोषणाचा मार्ग पत्करला आहे. शिक्षक परिषदेने या उपोषणाला पाठिंबा दिला आहे. तसेच, शिक्षण विभागाला पत्र लिहून नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा शक्‍य नसल्याने सर्वांना पदवीच्या विद्यार्थ्यांप्रमाणे न्याय द्यावा, अशी मागणी परिषदेने केली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News