भारतीय कुस्तीगीरांचे शिबिर 'या' महिन्यात सुरु करण्याचा विचार 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 25 July 2020

 कोरोनाची साथ रोखण्यासाठी सुरक्षित अंतर राखण्याची सूचना केली जात आहे. त्यामुळे थेट संपर्क असलेल्या क्रीडा खेळांना चांगलाच फटका बसत आहे.

मुंबई :  कोरोनाची साथ रोखण्यासाठी सुरक्षित अंतर राखण्याची सूचना केली जात आहे. त्यामुळे थेट संपर्क असलेल्या क्रीडा खेळांना चांगलाच फटका बसत आहे. मात्र भारतीय क्रीडा प्राधीकरण राष्ट्रीय कुस्ती शिबिरास सुरुवात करताना सरावातील सहकारी कुस्तीगीरांसह हे शिबिर घेण्याचा विचार करीत आहे.

ऑलिंपिक पात्रता स्पर्धांच्या पूर्वतयारीसाठी भारतीय कुस्तीगीरांचे शिबिर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून सुरु करण्याचा विचार करीत आहे. पुरुष कुस्तीगीरांचे शिबिर सोनीपतला तर महिला कुस्तीगीरांचे शिबिर लखनौत आयोजित करण्याचा विचार आहे. या शिबिरासाठी आता कुस्तीगीरांनीही हिरवा कंदील दाखवला आहे. सुरुवातीस ऑलिंपिक गटातच हे शिबिर होणार आहे.

कुस्तीगीरांबरोबर चर्चा करुनच आम्ही शिबिराबाबत ठरवत आहोत. या शिबिरात प्रत्यक्ष लढतीचा सराव होण्यासाठी आम्ही सरावातील सहकारी कुस्तीगीरांचीही निवड करणार आहोत. या शिबिरातील सर्वांच्या सुरक्षेसाठी भारतीय क्रीडा प्राधीकरण मार्गदर्शक तत्त्वे तयार करीत आहे. ती झाल्यावरच सर्व स्वरुप निश्‍चित होईल. त्याचवेळी शिबिरात येणाऱ्या कुस्तीगीर, मार्गदर्शक तसेच सपोर्ट स्टाफच्या विलगीकरणाबाबतही विचार होईल, असे भारतीय कुस्तीगीर महासंघाचे कार्यकारी सचिव विनोद तोमर यांनी सकाळला सांगितले.

आम्ही शिबिराबाबत कुस्तीगीरांसह सातत्याने चर्चा करीत आहोत. हे शिबिर सुरुवातीस मर्यादीत ठेवण्यासाठी ऑलिंपिक गटातील कुस्तीगीरांसाठीच होईल, असे तोमर यांनी सांगितले. आत्तापर्यंत रवी दहिया (57 किलो), बजरंग पुनिया (65 किलो), दीपक पुनिया (86 किलो) आणि विनेश फोगट (53 किलो) यांनी ऑलिंपिक पात्रता मिळवली आहे. साक्षी मलिकने केवळ गटातील एकच कुस्तीगीर शिबिरात असून काय साधणार आहे अशी विचारणा केली होती. आता शिबिरात जास्त कुस्तीगीर असतील तर त्यात सहभागी होण्यात काहीच प्रश्न नाही असे सांगितले होते.

सुशील कुमार, रवी दहीया, दीपक पुनिया सध्या छत्रसाल स्टेडियममध्ये सराव करीत आहेत, तर बजरंग पुनिया, जितेंदर किन्हा हे विजयनगर येथील इन्स्पायर इन्स्टिट्यूटमध्ये सराव करीत आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News