मी "एव्हरेस्ट'वर अन्‌ हाती तिरंगा 

सुहैल शर्मा 
Friday, 8 February 2019

ती तारीख होती 20 मे 2016. जगातील सर्वोच्च शिखरावर, एव्हरेस्टवर मी उभा होतो, हाती तिरंगा अन्‌ वडिलांचा फोटो. आयुष्यात पाहिलेलं सर्वांत मोठं स्वप्न साकार झालं होतं! आपल्या स्वप्नपूर्तीविषयी सांगताहेत, सांगलीचे पोलिस अधीक्षक, पहिले आयपीएस एव्हरेस्टवीर सुहैल शर्मा.

मी पंजाबचा. वडिलांनी शिक्षणासाठी शिमल्यातील अकॅडमीत प्रवेश दिला. तेथेच पर्वतांची ओढ लागली. मैदानी खेळ, माऊटिंगचे आकर्षण तेथे जडले. पुढे स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू झाली. या दोन्ही गोष्टी कधीच एकमेकांच्या आड आल्या नाहीत, ना पालकांनी माझ्या स्वप्नांना बांध घातला. मी भारतीय पोलीस सेवेत दाखल झालो, ते माझे सर्वोच्च स्वप्न नव्हते. मला एव्हरेस्ट सर करायचे होते. त्यासाठी वडील डॉ. वीरेंद्रकुमार यांनी बळ दिले. पोलीस सेवेत दाखल झाल्यानंतर सन 2015 मध्ये मी खात्याकडे एक प्रस्ताव मांडला. पहिल्या भारतीय व्यक्तीने एव्हरेस्ट सर केले तो काळ होता 1965 चा. त्याला 50 वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्ताने पोलीस दलाने एव्हरेस्ट मोहीम हाती घेतली. मी नेपाळमधून एव्हरेस्ट सर करण्याचे ठरवले. 

तो माझा पोलिस प्रशिक्षणाचा काळ होता. रात्री गस्तीवर असायचो. रात्रभर तीस-तीस किलोमीटर धावायचो. तयारी झाली, मोहिमेची तारीख ठरली, मात्र दुर्दैवाने मोहिमेच्या दोन महिने आधी वडिलांचे निधन झाले. "एव्हरेस्ट' हीच त्यांना श्रद्धांजली, असे मी मनाशी ठरवले. बेसकॅंप-17 हजार फुटांवरून मोहीम सुरू झाली. 25 दिवस झाले. आम्ही दुसऱ्या टप्प्यावर होतो. अन्‌ अचानक निसर्ग कोपला. भल्यामोठ्या बर्फाच्या भिंती कोसळू लागल्या. आम्हाला वाटलं, काहीतरी स्थानिक नैसर्गिक दुर्घटना असावी. सारे हादरले. माझ्या नजरेच्या अंतरावर कोरियन सहकारी तरुणी डोक्‍यात बर्फाचा घाव लागल्याने पडली होती. तिला मी पट्टी बांधली; पण दोन मिनिटांत तिने माझ्या हातात प्राण सोडले. त्या दिवशी मोहिमेतील अठरा जण मृत्युमुखी पडले. माझ्यासह 61 जणांना गंभीर जखम झाली. तीन दिवसांनंतर मदत आली, हेलिकॉप्टरने बेसकॅंपवर नेले. तेथे कळाले, ही साधीसुधी आपत्ती नव्हती. भयंकर भूकंप होता. नेपाळ हादरले होते. भूकंपाचा केंद्रबिंदू आमच्यापासून पंचवीस-तीस किलोमीटरवर होता. 

मोहीम थांबली, माझ्या स्वप्नांना तो स्वल्पविराम होता. जखमा भरायला काही काळ गेला. मृत्यूच्या दाढेतून परतलो होतो, मात्र पुन्हा तयारी सुरू केली. आईला काळजी होती, मात्र ती माझ्या स्वप्नांआड आली नाही. भाऊ माझ्यावर नाराज होते, मात्र आईला खात्री होती. सन 2016 ला मी पुन्हा मोहिमेवर निघालो. नेपाळने पुढील वर्षी गिर्यारोहकांना मान्यता दिली नव्हती. त्यामुळे चीनकडील बाजूने जायचे ठरले. यावेळी मी एकटा होतो. 3 एप्रिलला मोहीम सुरू झाली, 20 मे रोजी एव्हरेस्ट, स्वप्नांचे शिखर सर केले. मी आयपीएस असल्याचा अभिमान आहेच, मात्र मी पहिला आयपीएस एव्हरेस्टवीर असल्याचा गर्व वाटतो.

छोटी स्वप्नं पाहणं, हाही एक गुन्हाच आहे, असं मी मानतो. हे वाक्‍य कुठल्या पुस्तकात लिहिलेलं नाही, हे माझ्या आयुष्याचं मी बनवलेलं तत्त्व आहे. तेच मी जगतोय. 

समाधानी राहू नका 
आयपीएस झाल्यानंतर खूप मोठेकाही तरी साध्य झाल्याचा विचार केला असता तर कदाचित पुढे एव्हरेस्ट मला छोटं वाटू लागलं असतं. तरुणांनी आहे त्यात समाधान मानले, तर कधीच ते मोठे होऊ शकणार नाहीत. समाधानी राहू नका, सतत नव्याचा ध्यास घ्या. त्यावर काम करा.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News