गुरुजी व्हायचं राहून गेलं...

संदीप काळे
Sunday, 24 May 2020

ते दोन तरुण ठाण्याच्या रेल्वे स्टेशनवर मला भेटले. त्यांच्याशी गप्पा झाल्या. त्यातून त्यांचा जीवनसंघर्ष समजला. या दोन्ही तरुणांच्या जगण्यासाठीची धडपड मला एकीकडे उल्लेखनीय वाटत होती; तर आपलं गुरुजी होणं जवळजवळ अधांतरीच राहिलं या त्यांच्या अधुऱ्या स्वप्नाबाबत दुसरीकडे वाईटही वाटत होतं.

नांदेडहून मुंबईला परतताना आई किती ओझं बांधून देईल याचा काहीही नेम नसतो. तिला कितीही सांगा, ती ऐकत नाही. नांदेडहून रेल्वेगाडीत बसेपर्यंत तसं फार टेन्शन नसतं. कारण, गाडीत सामान ठेवेपर्यंत कुणी तरी सोबत असतं; पण गाडी जसजशी मुंबईकडे जाते तसतसं सोबत असलेल्या सामानाविषयीचं टेन्शन वाढत जातं. ‘सामान नेशील का’, असं पूर्वी आई किमान विचारायची तरी; पण आता तसं काहीही न विचारता ती थेट बांधाबांधीला सुरुवात करते.

...तर मुंबईला परतण्याचा प्रवास सुरू झाला. सकाळी गाडी कल्याणला आल्यावर जाग आली. ठाण्याला उतरायचं होतं, त्यामुळे उतरण्यासाठीची लगब सुरू झाली. दोन बॅगा, तीन गोण्या आणि इतर सामान असं सगळं माझ्याबरोबर होतं. शिवाय, माझी बॅग वेगळीच. ठाण्याला उतरलो. कसंबसं सामान गाडीच्या बाहेर काढलं आणि हमालाची वाट बघत बसलो. वीस मिनिटं होऊन गेली. माझ्याबरोबर रेल्वेगाडीतून उतरलेली सगळी माणसं आपापल्या मार्गानं निघून गेली; मात्र हमाल काही येईना. ठाण्याला सकाळी रेल्वेनं आल्यावर असं नेहमी होतं, म्हणून सामानाची काळजी वाटायला लागते.
तेवढ्यात दोन तरुण माझ्याजवळ आले. मला वाटलं, एखाद्या गाडीची विचारपूस करायला आले असतील. ते जवळ आले आणि म्हणाले : ‘‘सामान न्यायचं आहे का?’’ ते हमाली करत असतील असं त्यांच्या पेहरावावरून तर वाटत नव्हतं.
मी म्हणालो : ‘‘हो.’’
त्यांनी सराईतपणे सर्व सामान अंगा-खांद्यावर घेतलं. आम्ही चालायला लागलो. पायऱ्या चढून थोडं वर गेलो असता एक हमाल आमच्याजवळ आला. माझ्या सोबतच्या त्या दोन तरुणांवर एकदम धावून जात तो म्हणाला : ‘‘तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही हे कामं इथं करायचं नाही. कळत नाही का? परत जर इथं दिसलात तर याद राखा.’’
ओरडणारा तो उत्तर प्रदेशातला भय्या होता. पान खात खात त्या गरीब तरुणांना दम भरत होता. दोघं काही न बोलता पुढं चालत होते. स्टेशनच्या पलीकडच्या बाजूला जाऊन तिथून मला गाडीनं घरी जायचं होतं. त्या तरुणांनी मला तिथपर्यंत सोडलं.  
‘‘किती पैसे झाले?’’ असं त्यांना विचारलं तेव्हा, मराठी माणसांच्या ‘स्टाईल’नं दोघांनी उत्तर दिलं : ‘‘साहेब, द्या जे काय द्यायचेत ते द्या.’’
मी म्हणालो : ‘‘तुम्ही सांगा, किती पैसे झाले तुमचे.’’
ते संकोचत म्हणाले : ‘‘दोनशे रुपये द्या.’’
ओझं अंगा-खांद्यावरून वाहण्याची उत्तर प्रदेश-बिहारमधल्या भैयांची ''स्टाईल'' तेवढी या मराठी तरुणांनी शिकली होती; पण हक्कानं, अगदी रेटून पैसे मागायची त्या भैयांची पद्धत काही त्यांनी त्यांच्याकडून घेतलेली दिसत नव्हती! खिशातलं पाकीट काढलं आणि बघितलं तर त्यांना द्यायला पैसे नव्हते. बाजूलाच चार एटीएम होती. त्या एटीएममध्येही पैशांचा पत्ता नव्हता.
मी दोन्ही तरुणांना म्हणालो : ‘‘दहा मिनिटं थांबू शकाल का? माझा मित्र परवेज खान मला घ्यायला येतोय, तो आला की मी तुम्हाला पैसे देतो.’’ दोघं ‘हो’ म्हणाले.
वीस मिनिटं होऊन गेली. परवेजचा काही पत्ता नव्हता. फोन केल्यावर ‘मी येतोय, दादा’ एवढं त्याचं उत्तर होतं. तोपर्यंत या दोन्ही तरुणांशी माझ्या गप्पा रंगल्या.  या तरुणांची नावं होती अजय जाधव आणि स्वप्नील बनसोडे. हे दोघं पाच वर्षांपासून मुंबईत आहेत. ठाण्यातल्या ''सिप्रा’ नावाच्या एका कंपनीत ते हेल्परचं काम करायचे.  कंपनीतलं काम हेच दोघांच्याही उदरनिर्वाहाचं एकमेव साधन. इतर सगळीकडे उद्योग सुरू झाले; पण कोरोनाच्या धास्तीमुळे इथले सगळे कामगार आपापल्या गावी गेले आणि कंपनीतून निघणारा धूर बंद झाला. आपापल्या गावी गेलेली सगळी माणसं दुसऱ्या राज्यातली होती.  अजय आणि स्वप्नील हे दोघं वर्गमित्र आणि एकाच खोलीत राहणारेही. अजय यवतमाळचा, तर स्वप्नील कळमनुरीचा. दोघांनीही डीएड केलं. डीएडनंतरच्या परीक्षा ते चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले; पण सन २०१० पासून आतापर्यंत या दोघांनाही शिक्षक म्हणून संधी ना सरकारनं दिली, ना कुठल्या संस्थेनं.
अजय म्हणाला : ‘‘मी मास्तर होणार म्हणून माझ्या मामानं मला मुलगी दिली. गावात, पाव्हण्यांत, सगळीकडे ‘मी आता शिक्षक झालोच’, अशी चर्चा असायची. मामाची मुलगी होती म्हणून ठीक; नाही तर अन्य कुणाची असती तर माझ्याकडे ती राहिलीच नसती.’’
मी स्वप्नीलला विचारलं : ‘‘तुझी फॅमिली कशी आहे?’’
स्वप्नील म्हणाला : ‘‘माझं अजून लग्न झालेलं नाही. कितीही गरीब मुलीचा बाप असला तरी तो आधी विचारतो, ‘मुलगा काय करतो?’ मी कंपनीत हेल्परचं काम करतो हे ऐकल्यावर कुणीही मुलगी द्यायला तयार नाही.’’ ‘कुठं राहता, सगळं कसं करता’पासून ते ‘पुढं काय करणार’पर्यंत आमचं बोलणं सुरू होतं. शेवटी, अर्ध्या तासानंतर परवेज गाडी घेऊन आला. गाडीत सामान ठेवलं. उन्हाचे चटके लागायला सुरुवात झाली होती. बाजूलाच गरमागरम खिचडीचा, भज्यांचा वास येत होता. आम्ही सगळे जण त्या हॉटेलात गेलो. ऑर्डर दिली. खाणं येईपर्यंत आणि खातानाही आमच्या गप्पा शिक्षकभरतीबाबतच सुरू होत्या.
मी स्वप्नीलला विचारलं : ‘‘कंपनी बंद झाल्यावर तू गावी गेला नाहीस का?’’
तो म्हणाला : ‘‘गावी जाऊन करू तरी काय? मी खूप शिकलो म्हणून गावात मला खूप मान-सन्मान, त्यामुळे गावात जाऊन छोटी-मोठी कामं करू शकत नाही. तीन बहिणी लग्नाच्या आहेत. आई-वडिलांचं या वयातही राब राब राबणं पाहवत नाही. उन्हाळ्यात आई-वडिलांच्या पायात चप्पल नसते आणि पावसाळ्यात छत गळत  असल्यानं घरात बसायला जागा नसते. दरवर्षी आख्खा हिवाळा आई वाट पाहते...या हिवाळ्यात का होईना, माझा मुलगा मला स्वेटर घेऊन येईल आणि माझं काकडणं थांबेल; पण स्वेटर काही घेणं होत नाही. कामातून मिळणारे जेमतेम पैसे आणि खर्च यातून शिल्लक राहतं काय? तर ‘अमक्‍या अमक्‍या बनसोडचा मुलगा मुंबईत कामाला आहे,’ एवढंच!’’
मी मध्येच विचारलं : ‘‘कसा असतो तुमचा दिनक्रम?’’
दोघं सांगू लागले : ‘‘सकाळी पाच वाजता स्टेशनला यायचं. दहा वाजेपर्यंत गाड्या येतात, त्यातून लोकांचं सामान इकडून तिकडं न्यायचं. त्यातून पाचशे-सहाशे रुपये मिळतात. दुपारी घरी जायचं, स्वयंपाक करायचा. जेवायचं.  भाजीविक्रीची छोटीशी गाडी आहे. दुपारपासून  संध्याकाळपर्यंत भाजी विकायची. संध्याकाळी एका कॉलनीत लोकांच्या गाड्या धुण्याचं काम करायचं...!’’
‘‘या सगळ्या कामातून पैसे मिळतात; पण समाधान मिळत नाही एवढं मात्र खरं,’’
स्वप्नील म्हणाला. मी विचारलं : ‘‘तुम्ही हे हमालीचं काम करताना एवढे टापटीप कसे बरं असता?’’
दोघं म्हणाले : ‘‘टापटीप राहण्याचे दोन फायदे आहेत. पहिला म्हणजे, अनेक वेळा गावाकडचे लोक, इथले ओळखीचे लोक भेटले तर अडचण निर्माण होते. आम्ही हमालीचं काम करतो, हे त्यांना सांगायला आम्हाला संकोच वाटतो. मात्र, गावाकडचे लोक भेटले तर आमच्या चांगल्या कपड्यांमुळे त्यांना किंवा इतर कुणालाही काही शंका वगैरे येण्याचं कारणच नाही. शिवाय, कपडे ठीकठाक, व्यवस्थित नसतील तर लोक विश्‍वासही ठेवत नाहीत. नाहीतर ‘हा आपलं सामान पाहिजे तिथं नेऊन ठेवेल की मध्येच पळून घेऊन जाईल,’ अशी भीती लोकांच्या मनात असते.’’
स्वप्नील म्हणाला : ‘‘एकदा गावातले ओळखीचे काही लोक भेटले आणि ‘हा तिकडं हमालीचं काम करतो,’असं त्यानं गावात सगळीकडे केलं...’’
मी मध्येच विचारलं : ‘‘महिन्याकाठी तुम्हाला पैसे किती मिळतात?’’
स्वप्नील म्हणाला : ‘‘कमीत कमी तीस हजार.’’
मी म्हणालो : ‘‘अरे वा! कंपनीत किती मिळायचे?’’
ते म्हणाले :  ‘‘वीस हजार, कधी कमीही.’’
मी म्हणालो : ‘‘तुम्हाला तसे खूप चांगले पैसे मिळतात.’’
अजय म्हणाला : ‘‘अहो दादा, शिक्षणात सतत मेरिटमध्ये आलो. साहित्याचा बारकाईनं अभ्यास केला. विद्यार्थी घडवायचे या हेतूनं अव्वल क्रमांकात पास झालो. आयुष्याची २२-२३ वर्षं शिक्षणात घालवली ती काय हमाल व्हायला?’’
मुलं मनमोकळेपणानं बोलत होती. अजय वेगवेगळ्या आंदोलनांत सहभागी झाला असल्याची माहितीही त्यानं मला दिली. एकीकडे या दोन्ही तरुणांच्या जगण्यासाठीची धडपड मला उल्लेखनीय वाटत होती; तर दुसरीकडे, आपलं गुरुजी होणं जवळजवळ अधांतरीच राहिलं या त्यांच्या अधुऱ्या स्वप्नाबाबत वाईटही वाटत होतं. डीएड, बीएडच्या भरतीबाबत, रिक्त जागांबाबत, शासननिर्णयाबाबत मी स्वप्नीलला सखोल विचारलं. तो म्हणाला : ‘‘दादा, मला याविषयीची माहिती आहेच;  पण अधिक नेमकेपणानं माहिती देणारी एक व्यक्ती मी सांगतो.’’
त्यानं खिशातली छोटीशी डायरी काढली. सुंदर अक्षरात टिपलेले अनेकांचे संपर्कक्रमांक तीत होते. त्यातून त्यानं मला त्याचे मित्र परमेश्वर इंगोले (९९२१७१५१०३) यांचा नंबर दिला. याच इंगोले यांच्याबरोबर स्वप्नीलनं डीएड, बीएड भरतीसंदर्भातल्या आंदोलनात भाग घेतला होता. ‘रयतसंकल्प’ नावाची डीएड, बीएड संघटना इंगोले चालवतात. इंगोले यांना मी फोन लावला व स्वप्नीलकडे दिला. स्वप्नीलनं त्यांना माझा परिचय करून दिला. आमच्या झालेल्या गप्पांविषयी सांगितलं. नंतर मी इंगोले यांच्याशी बोललो. मला ज्या प्रश्‍नांची उत्तरं इंगोले यांच्याकडून हवी होती ती सर्व मला मिळाली. इंगोले यांनी दिलेली आकडेवारी, माहिती धक्कादायक होती. इंगोले म्हणाले : ‘‘शेवटची सीईटी सन २०१० मध्ये झाली, तेव्हापासून शिक्षकभरती बंद आहे. महाराष्ट्रात सध्या नऊ लाख ६३ हजार डीएड, बीएड युवक-युवती बेरोजगार आहेत. सन २०१३ पासून टीईटी पात्रपरीक्षा सुरू झाली. त्यानंतर  शिक्षकांची दुसरी एक पात्रपरीक्षा सन २०१९ मध्ये झाली. या परीक्षेनुसार साडेपाच हजार विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणून अनेक ठिकाणी रुजू करून घेण्यात आलं. त्यानंतर अजून काही विद्यार्थ्यांना रुजू करून घेण्यात येणार होतं; पण ते तसंच राहिलं आहे. राज्यभरात आज १५ हजारांपेक्षा जास्त शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. त्या भरण्याची तसदी ना मागच्याही सरकारनं घेतली, ना हे सरकारही घेत आहे. आता चार मे रोजी नवीन जीआर म्हणजेच शासननिर्णय निघाला आहे. त्यानुसार इतर सर्व भरतींबरोबरच शिक्षकभरतीलाही स्थगिती देण्यात आली आहे. शिक्षकभरती कायम करावी, अशी इंगोले यांची मागणी होती.
नऊ लाखांपेक्षा अधिक तरुण डीएड, बीएडचं शिक्षण घेऊन घरीच आहेत, नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. हे दहा वर्षांपासूनचं चित्र खूपच धक्कादायक आहे. याच अवस्थेमुळे स्वप्नील आणि अजय यांच्यासारख्या मुलांच्या हाती खडू आणि पुस्तक येण्याएवजी त्यांच्या खांद्यावर हमालीचं ओझं येतं.
परवेजकडून मी थोडे पैसे घेतले. दोघांना दिले. ‘‘दादा, एवढे पैसे नकोत,’’ असं दोघं म्हणाले; पण मी न ऐकल्यासारखं केलं. दोघांचा निरोप घेतला आणि गाडीत बसून घराच्या दिशेनं निघालो.
परवेज माझ्याशी काही तरी बोलत होता; परंतु त्याच्याकडे माझं लक्ष नव्हतं.  ‘आपल्या आईला स्वेटर घेऊन देऊ शकलो नाही,’ असं म्हणणारा स्वप्नील मला आठवत होता. ‘पैसे नसल्यामुळे मी माझ्या मुलांना मुंबईतल्या शाळेत दाखल करू शकत नाही,’ अशी खंत व्यक्त करणारा अजय मला आठवत होता. बाकीचे नऊ लाख विद्यार्थी काय करत असतील, कसं जगत असतील हे विचारायलाच नको! स्वप्नीलचं आणखी एक वाक्य मला आठवत होतं...‘दादा, पैशाशिवाय पान हालत नाही, मग ती संस्था असो की शासन.’  स्वप्नीलचं हे वाक्य खटकलं; पण आपली लोकशाही प्रसंगी पैशापुढं कसं लोटांगण घालते हेही मी पाहिलं होतं.
बघा, परिस्थिती कशी आहे...एकीकडे विनाअनुदानित शाळेतल्या मेहनती शिक्षकांना पगार नाही. जागा रिक्त आहेत, शिक्षकच नाहीत म्हणून विद्यार्थी घडत नाहीत; तर दुसरीकडे पात्र शिक्षक आहेत, मात्र त्यांची भरतीच केली जात नाही.
सगळं गाडं सरकार नावाच्या निर्दयी यंत्रणेशी येऊन थांबतं. तिथं सर्वांचे हात बांधले जातात. हे सगळं पाहून मन सुन्न होतं. आतून खूप राग येतो.  वाटतं, सरकार चालवणाऱ्यांनी असा कुणाचा अंत पाहू नये!

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News