श्रेयसमध्ये मी स्वतःला पाहतो : विराट

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 16 August 2019
  • श्रेयस अय्यर संघात कायमस्वरूपी होऊ शकतो -  विराट कोहली
  • संघावर दडपण असताना फलंदाजी करणे आवडते - श्रेयस अय्यर

त्रिनिनाद : श्रेयस अय्यर हा भारतीय संघाच्या मधल्या फळीतील कायमस्वरूपी खेळाडू होऊ शकतो, असे मत विराट कोहलीने व्यक्त केले. विंडीजविरुद्धच्या दोन्ही लढतीत तो माझा सहकारी होता. माझ्या मैदानावरील उपस्थितीचे त्याच्यावर कोणतेही दडपण आले नाही. त्याच्या खेळीत कमालीचा आत्मविश्वास होता. आपण काय करीत आहोत, याची त्याला पुरेपूर जाणीव होती. तो कधीही बाद होईल असे वाटत नव्हते, असे कोहलीने सांगितले.

श्रेयस परिस्थितीनुसार खेळत आहे. तो आता जास्त प्रगती करील आणि यशस्वी होईल. तो नक्कीच भारतीय संघाच्या मधल्या फळीतील कायमस्वरूपी खेळाडू होऊ शकतो, असे कोहलीने सांगितले.

भारताचा मधल्या फळीचा प्रश्न अय्यर सोडवेल, असा विश्वास कोहलीस वाटत आहे. आम्ही काहीसे दडपणाखाली होतो. पण त्याच्या खेळीने सामन्याचे चित्रच बदलले. त्याच्या फलंदाजीने माझ्यावरील दडपण दूर होण्यास मदत झाली. त्यामुळे मीही माझा खेळ करू शकलो; तसेच डावावर अखेरपर्यंत नियंत्रण राखू शकलो. तो प्रतिकूल स्थितीत केलेल्या खेळीचे महत्त्व जाणतो, असे भारतीय कर्णधाराने सांगितले. 

श्रेयसची खेळी पाहून मला माझे भारतीय संघातील सुरुवातीचे दिवस आठवले. संघास विजय मिळवून देण्यास आतूर होतो. त्यासाठी धोका पत्करण्याचीही तयारी होती. दडपणास तो शूरासारखा सामोरा जातो, असेही कोहली म्हणाला.

संघ प्रतिकूल परिस्थितीत असतो. ड्रेसिंग रूम नर्व्हस असते, त्या वेळी फलंदाजी करायला मला खूप आवडते, असे श्रेयस अय्यरने सांगितले. वेस्ट इंडीजविरुद्धच्या सलग दुसऱ्या एकदिवसीय लढतीत श्रेयसने निर्णायक कामगिरी केली. 

विराट कोहलीस श्रेयसची पुन्हा साथ लाभली. या दोघांनी प्रतिकूल परिस्थितीत दुसऱ्या सामन्यात १२५; तर तिसऱ्या सामन्यात १२० धावांची भागीदारी केली. तिसऱ्या सामन्यात श्रेयस फलंदाजीस आला, त्या वेळी भारताची अवस्था ३ बाद ९१ होती. पण त्याने ४१ चेंडूत ६५ धावांचा तडाखा देत कोहलीवरील दडपण कमी केले. संघ प्रतिकूल परिस्थितीत असतो, ड्रेसिंग रूममध्ये प्रत्येक जण नर्व्हस असतो, त्या वेळी फलंदाजी करायला मला आवडते. त्या वेळी काहीही घडण्याची शक्‍यता असते. या दडपणाखाली खेळण्याचा आनंद वेगळाच असतो, असे श्रेयस म्हणाला. 

विंडीज फलंदाजांनी चाहलला लक्ष्य केले होते. त्याचा बदला आपण घेतला, असे श्रेयसने चाहलला सांगितले. आमच्या गोलंदाजांवर केलेल्या हल्ल्याचा मला बदला घ्यायचा होता. पूरण चांगला फलंदाज आहे; पण चाहलला लक्ष्य केल्यामुळे मी चिडलो होतो. त्यामुळेच मी त्यांच्या गोलंदाजांवर प्रतिहल्ला केला, असे अय्यरने सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News