मला तुमच्यासोबत सरकारमध्ये बसण्याची इच्छाच नाही; थेट मोदींना इशारा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 3 June 2019
  • नितीशकुमार यांनी राज्य मंत्रिमंडळ विस्तारात भाजपला भोपळा दिला आहे

नवी दिल्ली - नव्या मोदी मंत्रिमंडळात केवळ एका मंत्रिपदावर बोळवण झाल्यावर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राज्य मंत्रिमंडळ विस्तारात भाजपला भोपळा दिला आहे. घटकपक्षांना मंत्रिमंडळात प्रातिनिधिक वा सांकेतिक स्थान नको, असे बजावतानाच केंद्रातील मंत्रिमंडळात ‘जेडीयू’चा एकही मंत्री कधीही सामील होणार नाही, असा सज्जड इशाराही दिला आहे. 

लोकसभा निकालापूर्वी नरेंद्र मोदी-अमित शहा यांनी ‘एनडीए’च्या घटकपक्षांसाठी जेवणावळ घातली. मात्र, २३ तारखेला निकालांमध्ये भाजपच्या जागा चक्क ३०३ पर्यंत वाढण्याचा चमत्कार होताच त्या पक्षनेतृत्वाची देहबोलीच बदलल्याची चर्चा आहे. त्यांच्यावाचून भाजप सरकारचे काही अडत नसल्याचे दिसताच नव्या मंत्रिमंडळात घटकपक्षांना केवळ एकेक जागाच देऊन बोळवण करण्याचे भाजपने ठरविले.

यामुळे नाराज झालेल्या नितीशकुमार यांनी नाराजी व्यक्त न करता आपल्या पक्षाला सरकारमधून बाजूला केले. नितीशकुमार यांनी जशास तसे उत्तर आजच्या राज्य मंत्रिमंडळ विस्तारातून दिले. दिल्लीला घडलेल्या अपमानाबद्दल नितीशकुमार यांची नाराजी तीव्र असल्याचे ‘जेडीयू’च्या नेत्यांचे म्हणणे आहे. तरीही, ते सातत्याने ‘आमचा पक्ष केंद्रावर नाराज नाही. मात्र, घटकपक्षांना प्रातिनिधिक नको, तर त्यांच्या खासदारसंख्येच्या आधारावर मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे,’ असेच सांगत आहेत, हे त्यांच्या राजकीय चातुर्याचे लक्षण मानले जाते. नितीशकुमार यांची नजर २०२० च्या विधानसभा निवडणुकीवर असल्याचे जाणकार मानतात. 

केंद्रातील सरकारमध्ये जेडीएस कधीही सहभागी होणार नाही, हे अंतिम सत्य आहे. दिलेला प्रस्ताव आम्हाला पूर्ण अमान्य होता.  
-  के. सी. त्यागी 
महासचिव, जेडीएस

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News