मीच आहे तुझा शेवटचा सोबती

कांतीलाल कडू
Saturday, 6 July 2019

आयुष्याचं स्मशान धगधगतय दिवसरात्र,
वर्षाचे बारा महिने चिताग्नी भडकतोय
फुलासारख्या देहाची होते राख,

आयुष्याचं स्मशान धगधगतय दिवसरात्र,
वर्षाचे बारा महिने चिताग्नी भडकतोय
फुलासारख्या देहाची होते राख,
तेव्हा ती सुद्धा भरून नेतात मुठीमुठीने... 

मला खरंच रडायला येतं
पण माझ्या अश्रूंच्या ज्वाळा तेव्हा भडकतात
जिथं जिथं मानवी वस्ती, 
तिथ तिथं माझ्याच शाखा स्वागताला... 

एकदा का कुडीतील आत्मा 
पक्ष्यासारखा उडाला की, 
मग कुणी गोंजारत 
नाही फार वेळ लाडाने...

मग माझ्या कुशीत आणून ठेवतात
तो सजलेला देह, 
देह नाहीच, नाशिवंत शरीरच ते
त्याला वाली कुणीच नसतं माझ्याशिवाय...

त्याआधी मालमत्तेची वाटणी 
करून घेतलेली असते प्रियजनांनी
उरलेल्या देहाचा सातबारा
तेवढा माझ्या कपाळी... 

आता नवीन फंडा सुरू झाला आहे, श्रध्दांजलीचा, 
सभा, समारंभातून ही जीवंत भुते,
इथेही बसतात मानगुटीवर
सरणावर जळणाऱ्या देहाच्या...

तेव्हा मी सुद्धा शीण झालेलो असतो 
उतराई होताना, वाटतं मनात की, 
भाषण देणाऱ्यालाही घ्यावे का कवेत...? 

इतरांना तरी त्यामुळे थोडी शांती मिळेल 
अन चिताग्नीत जळत असलेल्याला चिरशांती! 
मांत्रिक, तांत्रिक इथेच करतात कणकेच्या बाहुल्या 
अन माझ्याच शरीरात टोचतात टाचण्या...

तेव्हा मीच जळत असतो पुन्हा पुन्हा त्या सरणावर
शिव भगवान तिसऱ्या नेत्रांतून हळूच पाहत असतात
हे सारं किळसवाणे दृश्य आणि 
डमरूतून टाकत असतात काळाची पावलं...

त्रिशूळ फेकून मोजत असतात
शांततेच्या डोहाची खोली अन 
कातडे पांघरूण एकाच पायावर 
उभे राहून घेतात समाधी! 

हे ही पाहणं माझ्याच नशिबी कारण 
मला चिरंजीवी होण्याचं वरदान दिलं आहे
सृष्टीच्या उगमापासून ते प्रलयानंतरच्या अंतापर्यंत 
कधीच न विझण्याचा कपाळी शाप गोंदवून...

म्हणूनच मी धगधगत आहे
जीवंत माणसाच्या धगधगत्या आयुष्यासारखा....
होय, मीच आहे स्मशान...
तुझा शेवटचा सोबती ! 

 

 

 

 

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News