ओळख एनएसएसची: प्रा अभय जायभाये, संचालक, राष्ट्रीय सेवा योजना कक्ष, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
मोठी जबाबदारी, मोठे संकट.. वाचा कसं पेललं हे आव्हान प्रा अभय जायभाये यांनी
विद्यार्थी जीवनापासूनच राष्ट्रीय सेवा योजनेशी संबंधित असलेले प्रा अभय जायभाये यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण औरंगाबाद विद्यापीठाशी संलग्न असलेल्या वसंतराव नाईक महाविद्यालयात झाले. महाविद्यालय स्तरावर उत्कृष्ठ विद्यार्थी म्हणून गौरविले गेलेले प्रा जायभाये हे एनएसएसचे व्हाॅलंटियर म्हणून गेली कित्येक वर्ष अहोरात्र काम करत आहेत. कोव्हिड-१९ महामारीचा उद्रेक होण्याच्या काही दिवस आधी त्यांना संचालक म्हणून एनएसएसमध्ये जबाबदारी देण्यात आली होती. ही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडत असताना आलेले अनुभव सांगत आहेत प्रा जायभाये.
प्राध्यापक म्हणून रुजू झाल्यानंतर पाचगणीमध्ये मी एनएसएसचा सदस्य म्हणून काम करण्यास सुरवात केली. एनएसएसमध्ये कार्यक्रम अधिकारी म्हणून जबाबदारी मिळाल्यानंतर जलसंधारणाची काम, रस्ते निर्मिती, प्रबोधन, साक्षरता, पोलिओ लसीकरण मोहीम अशा वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये जनजागृती केली.
रस्ता सुरक्षेच्या उपक्रमातून वाहतूक नियमांचे विद्यार्थ्यांनी कसे पालन करावे यावर मी चांगल्या पद्धतीने काम केले. वृक्षारोपणासाठी आमच्या महाविद्यालयाने जांबळेवाडी गावामध्ये २० हजार झाडे लावली आणि ही झाडे जगण्याचा दर ७० टक्क्यांहून अधिक आहे. आम्ही आयोजित केलेल्या विद्यापीठस्तरीय शिबिरांमध्ये ३५० स्वयंसेवक सहभागी झाले होते. वाई विभागीय समन्वयक म्हणून माझ्यावर जबाबदारी सोपवल्यानंतर ती पुढील पाच वर्ष पार पाडली. त्यानंतर सातारा जिल्हा समन्वयक म्हणून काम करायची संधी मिळाली. तेव्हा संचलक पदाची जाहिरात आली. माझ्या आतापर्यंतच्या कामाचा विचार करून मला संचालकपदाची जबाबदारी जानेवारी २०२० पासून विद्यापीठाने दिली.
प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन काम करण्याची व करवून घेण्याची सवय असलेल्या माझ्यासारख्याला कोरोना संसर्गाच्या काळात सोशल डिस्टन्सिंग पाळून काम करणे आव्हानात्मक होतं. पण संचालक पदाची जबाबदारी मोठी होती आणि तितकंच संकटही मोठं होतं. लाॅकडाऊनमध्ये स्वयंसेवक प्रत्यक्ष फिल्डवर उतरू शकत नव्हते. अनेक प्रकारची बंधने होती. त्यामुळे आम्ही जनजागृती करण्याचे काम हाती घेतले.
शिवाजी विद्यापीठांतर्गत २७ हजाराहून अधिक स्वयंसेवक आहेत. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती केली. प्रत्येक विद्यार्थ्याने किमान दोनशे लोकांपर्यंत पोचण्याचे लक्ष्य ठरवून दिले. आणि जी माहिती पोचवायची आहे ती विश्वासार्ह आहे याची खात्री पाहिजे. म्हणून आम्ही फक्त शासनाने प्रसिद्ध केलेली माहिती प्रसारित करत होतो. पन्नास लाख लोकांपर्यंत पोचण्याचे उद्दिष्ट ठेवून आम्ही काम केले. किमान ३५ लाख लोकांपर्यंत आम्ही पोहोचू शकलो. सॅनिटायझर, मास्क, अन्नधान्य वाटप, आर्थिक मदत केली. किमान पाच ते सहा हजार स्वयंसेवकांनी वेगवेगळ्या गावात जाऊन मदत केली. महामार्गावरून चालत जाणाऱ्या लोकांना फूड पॅकेट वाटण्याचे कामही केले.
हे सर्व काम करत असताना एका गोष्टीची खंत वाटत होती. डाॅक्टर, अंगणवाडी सेविका, नर्स या सगळ्यांना विमा कवच आहे पण फिल्डवर काम करणाऱ्या एनएसएसच्या स्वयंसेवकाला असे कोणतेही कवच नव्हते. तरीही आपल्या जीवावर उदार होऊन समाजासाठी एनएसएसची मुले-मुली झटत होती. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून सर्वांनी काम केले आहे. आणि आजपर्यंत कोणत्याही स्वयंसेवकाची तक्रार माझ्यापर्यंत आलेली नाही याचा मला अभिमान आहे.
आता पुढील टप्प्यात माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेत एनएसएसचे सभासद आपले योगदान देत आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या जवळच्या २१ लोकांकडून गुगल फाॅर्म भरून घ्यायचा आहे. कोव्हिडचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी ही महत्त्वाची मोहीम आहे. आणि नेहमीप्रमाणेच एनएसएसचे विद्यार्थी ती मोहीम फत्ते करण्यासाठी तत्पर व तयार आहेत.