महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांचा "महाजॉब्स" ला प्रचंड प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 8 July 2020

लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर अनेक परप्रांतीय कामगार हे आपापल्या राज्यात निघून गेल्यामुळे महाराष्ट्रातील उद्योगांना आता कामगारांची गरज भासू लागली आहे. तेव्हा ह्या संधीचा फायदा महाराष्ट्रातील बेरोजगार भूमिपुत्रांनाच मिळावा याकरिता महाराष्ट्र शासनाने 'महाजॉब्स' ह्या वेब पोर्टलची सुरुवात केली आहे.

मुंबई :- लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर अनेक परप्रांतीय कामगार हे आपापल्या राज्यात निघून गेल्यामुळे महाराष्ट्रातील उद्योगांना आता कामगारांची गरज भासू लागली आहे. तेव्हा ह्या संधीचा फायदा महाराष्ट्रातील बेरोजगार भूमिपुत्रांनाच मिळावा याकरिता महाराष्ट्र शासनाने 'महाजॉब्स' ह्या वेब पोर्टलची सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडी सरकारने तयार केलेल्या महाजॉब्स ह्या वेब पोर्टलला महाराष्ट्रातील तरुणांनी प्रचंड प्रतिसाद दिला. महाजॉब्स वर एका दिवसात महाराष्ट्रातील ८८ हजार ४४७ तरुणांनी आपली नोंदणी केली. बेरोजगार तरुणांप्रमाणेच  ७५१ उद्योजकांनीदेखील नोकरभरतीसाठी आपली नोंदणी केली आहे. 

 

महाराष्ट्रातील भूमिपुत्रांना रोजगारसंधी उपलब्ध व्हाव्यात त्यांच्या हाताला काम मिळावे तसेच राज्यातील उदयोग विश्वालाही  कुशल आणि अकुशल कामगारांचे मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांच्या पुढाकारातून या संकेत स्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. http://mahajobs.maharashtra.government.in या संकेतस्थळावर जाऊन तरुणांना आणि उद्योजकांना आपली नोंदणी करता येणार आहे. परप्रांतीयांच्या घुसखोरीमुळे महाराष्ट्रातील बेरोजगारांना नोकऱ्यांपासून वंचित राहावे लागत होत तसेच लॉकडाऊनच्या काळातही रोजगार गेलेल्या अनेकांनी महाजॉब्स ह्या वेबपोर्टलच्या लोकार्पणानंतर २४ तासातच आपली नोंदणी करून ह्या योजनेला प्रचंड प्रतिसाद दिला.

 

राज्यातील उद्योग सुरु व्हावेत ह्याकरिता शासनाकडून उद्योगांना परवानग्या देण्यात आल्या असून लवकरच या उद्योगांमध्ये नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध होणार आहेत. केमिकल, अभियांत्रिकी, लॉजिस्टिक तसेच इतर १७ क्षेत्रांत रोजगाराच्या संधी महाजॉब्स ह्या वेब पोर्टलवरून उपलब्ध होणार आहेत. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ह्या पोर्टल मार्फत किती भूमिपुत्रांना रोजगार मिळाले तसेच कंपन्यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची पूर्तता झाली कि नाही ह्या सर्वांची योग्य नोंद उदयोग खात्याला घेण्यास सांगितली आहे. तसेच ही योजना अधिक प्रभावीपणे राबवली जावी याकरीता एमआयडीसीने एक कक्ष स्थापन करावा अश्या सूचना देखील उद्योगमंत्र्यांनी दिल्या आहेत. महाजॉब्स ह्या वेबपोर्टलच्या माध्यमातून राज्यातील भूमिपुत्रांना नोकरी मिळवण्यासाठी अधिवास प्रमाणपत्र बंधनकारक असणार आहे. तसेच नोकरी देणारे व मागणारे ह्यांना एकत्र आणण्याकरीता हे पोर्टल तयार केले असून याचा फायदा उद्योजक आणि बेरोजगार युवक या दोघांनाही होईल असे सुभाष देसाई यांनी सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News