अंतिम वर्षांच्या ऑनलाईन परीक्षा कशा पद्धतीने होणार? जाणून घ्या

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 21 September 2020
  • अंतिम वर्षांच्या परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन होणार आहेत. परंतु जास्तीत जास्त विद्यार्थींनी ऑनलाईन पर्याय निवडला आहे.
  • यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात अंतिम वर्षांत शिक्षण घेणारे राज्याच्या कानाकोपऱ्यातील जवळपास दोन लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

नाशिक :- अंतिम वर्षांच्या परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन होणार आहेत. परंतु जास्तीत जास्त विद्यार्थींनी ऑनलाईन पर्याय निवडला आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात अंतिम वर्षांत शिक्षण घेणारे राज्याच्या कानाकोपऱ्यातील जवळपास दोन लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. पण, यातील ४० हजार विद्यार्थी ऑफलाइन परीक्षेचा पर्याय निवडतील असा अंदाज आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षांची परीक्षा देणाऱ्या १०० टक्के विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा पद्धतीत सामावून घ्यावे, अशी सूचना उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केली.

रविवारी सामंत यांच्या उपस्थितीत येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या परीक्षांबाबत आढावा बैठक झाली. परीक्षेबाबतच्या नियोजनाची माहिती सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. मुक्त विद्यापीठात १६१ अभ्यासक्रमांच्या माध्यमातून ९१४ विषयांचे जवळपास सहा लाख २७ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यातील एक लाख ९१ हजार विद्यार्थी अंतिम वर्षांचे आहेत. या परीक्षेचे स्वरूप विद्यापीठांनी निश्चित केले आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून त्यास विविध कारणांस्तव होणारी गर्दी कारणीभूत आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारची गर्दी न करता घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचे शासनामार्फत स्वागत केले जाईल. अंतिम वर्षांतील विद्यार्थिसंख्येचा विचार करता प्रत्येक जिल्ह्यात सुमारे दोन हजार विद्यार्थी मुक्त विद्यापीठाची परीक्षा देतील. त्यासाठी विद्यापीठाने सर्व संबंधित यंत्रणांना पूर्वकल्पना द्यावी, सार्वजनिक आरोग्यासह परीक्षार्थीच्या आरोग्याचा विचार करावा, असे सामंत यांनी सूचित केले. करोना काळात घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचे गुणपत्रक अथवा पदवी प्रमाणपत्र करोना कालखंडातील म्हणून बाधित केले जाणार नाही, अथवा त्यावर तशा प्रकारचा उल्लेख केला जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मुक्त विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षेत तीन पर्यायी प्रश्न असलेली प्रश्नपत्रिका असेल. त्यासाठी ५० गुण असतील. त्यापैकी ३० प्रश्न परीक्षार्थीना सोडवावे लागतील. प्रात्यक्षिक परीक्षा २० गुणांची असेल. २२ सप्टेंबरला वेळापत्रक जाहीर होणार असून २५ सप्टेंबपर्यंत ऑनलाइन परीक्षेसाठी नोंदणी केली जाणार आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात परीक्षा आणि डिसेंबर महिन्यात निकाल तसेच परीक्षेपासून वंचित आणि अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घेतली जाईल, असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले.

१०० टक्के उपस्थितीबाबत…

अंतिम वर्षांच्या परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या १०० टक्के उपस्थितीला प्राध्यापक संघटनांनी विरोध दर्शविला आहे. याबाबत विचारले असता, परीक्षा मुख्यत्वे ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. त्यासाठी जितके मनुष्यबळ आवश्यक ठरते, त्यानुसार विद्यापीठांना उपस्थितीबाबत नियोजनाची मुभा देण्यात आल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News