राष्ट्रवादीचा कार्यकर्ता किती आशावादी? 

राजेश सोळसकर, सहयोगी संपादक
Tuesday, 11 June 2019

राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आणखी एक वर्धापन दिन साजरा होत असताना...1999 पासून सुरू झालेल्या या कालखंडाची वीस वर्षे पूर्ण होत असताना, "काहीतरी निसटतंय' याची अनामिक जाणीव प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात दिसते आहे... 

लोकसभा निवडणुकीत अपेक्षेइतके यश न मिळाल्याचं शल्य बाजूला सारत निकालाच्या दुसऱ्या-तिसऱ्याच दिवशी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दुष्काळी जनतेला धीर देताना आपल्याला शेतकऱ्यांच्या बांधावर दिसले. श्री. पवार ज्या दिवशी दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत होते, त्या दिवसापर्यंत राज्यातील अनेक नेत्यांचा विजयाचा उन्माद उतरलेला नव्हता, तर अनेक नेते पराभवाच्या धक्‍क्‍यातून पुरते सावरलेले नव्हते. श्री. पवार हे राज्यातले एकमेव नेते यश-अपयश बाजूला सारत निकालाच्या दुसऱ्याच दिवशी लोकांसोबत होते.

एकदा पेरलेलं उगवलं नाही म्हणून शेतकरी जसा आपलं शेत पुन्हा उभी-आडवी नांगरट करून दुबार पेरणी करतो, अगदी तसंच! पवारांचं राजकारण हे असं आहे, कायम लोकांभोवती फिरणारं. म्हणूनच गेल्या वीस वर्षांत त्यांच्या पक्षाने अनेक चढ-उतार जरी पाहिले असले, तरी लोकनेता म्हणून त्यांची असलेली प्रतिमा कायम राहिली. तिला कोणी धक्का लावू शकले नाही.
 
सातारा जिल्ह्याचा विचार करायचा झाला, तर गेल्या वीस वर्षांत या जिल्ह्याने पवारांवर आणि त्यांच्या राष्ट्रवादी पक्षावर नितांत प्रेम केलं. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर जिल्ह्याचं प्रेम मिळालेला हा दुसरा नेता. पुढे अजित पवार यांनीही राष्ट्रवादी वाढवण्यासाठी जिल्ह्यात कार्यकर्त्यांची फळी उभी केली. परिणामी, सातारा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला बनून राहिला. या काळात अनेक लाटा आल्या; पण तो डळमळला नाही. अगदी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झाला.
 
असं असलं तरी 1999 पासून सुरू झालेल्या या कालखंडाची वीस वर्षे पूर्ण होत असताना, राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आणखी एक वर्धापन दिन साजरा होत असताना "काहीतरी निसटतंय' याची जाणीव प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात दिसते आहे, हेही तितकंच खरं आहे. 1999 मध्ये राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत तत्कालीन दहापैकी नऊ विधानसभा मतदारसंघांत पक्षाच्या उमेदवारांनी अभूतपूर्व विजय मिळवला होता. तेव्हापासून आजपर्यंत झालेल्या निवडणुकांत कधी स्वबळावर, तर कधी कॉंग्रेसला बरोबर घेऊन राष्ट्रवादीने या जिल्ह्यावर आपले वर्चस्व राखले होते. 

सातारा हा आपला बालेकिल्ला असल्याचे सातत्याने सिद्ध केले होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही हा किल्ला शाबूत राहिला असला, तरी बुरूज ढासळताहेत, याची जाणीव प्रकर्षाने व्हायला लागली आहे. जिल्ह्यातील आठपैकी चार मतदारसंघ या निवडणुकीत मायनस झालेले आहेत. पक्षाच्या उमेदवाराचं मताधिक्‍य कमालीचा घटलं आहे. भाजपने केलेला शिरकाव धडकी भरवणारा आहे आणि म्हणूनच "काहीतरी निसटतंय' ही भावना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात उभी राहिली आहे. ही खदखद राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जशी आहे, तशीच ती कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्येही आहे. 

कॉंग्रेसची तर प्रचंड वाताहात झाली आहे; किंबहुना जिल्ह्यात कॉंग्रेस शोधावी लागत आहे. कॉंग्रेसचा एक आमदार केव्हाचा भाजपच्या कश्‍यपी लागला आहे. माजी मुख्यमंत्र्यांच्या या जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष मिळू नये, इतकी कॉंग्रेस हतबल झाली आहे. कॉंग्रेसचे एक चाक हे अशा प्रकारे निखळून पडलेलं असताना आघाडीचा गाडा एकट्याने किती ओढायचा, हेच दुखणं, हीच खदखद सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रकर्षाने दिसते आहे. जरी सातारा जिल्ह्यात हा गाडा ओढला गेला, तरी महाराष्ट्राचे काय, हा प्रश्‍न उरतोच. राज्यातील लोकसभेच्या निकालांमुळे आगामी विधानसभा निवडणुकीत काय वाढून ठेवले आहे, हे या कार्यकर्त्यांना दिसते आहे आणि म्हणूनच लोकसभेची साताऱ्यातील निवडणूक जिंकूनही कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारे पराभुताची मानसिकता तयार झाली आहे. 

एका हतबलतेने हे कार्यकर्ते ग्रासले गेले आहेत. भविष्यातला अंधःकार त्यांना स्पष्ट दिसतो आहे. आपल्या नेतृत्वाचा करिश्‍मा महाराष्ट्रात अपेक्षित निकाल घडवून आणेल, असा आशावाद त्यांना होता. मात्र, निकालानंतर तोही फोल ठरला आहे. हा निष्ठावंत कार्यकर्ता जेव्हा मागे वळून पाहतो आहे, तेव्हा आशा-अपेक्षांच्या जमा-खर्चाच्या विचारांतच तो अडकून पडल्याचे दिसून येते. यामध्ये संघटनेतील वरिष्ठ नेत्यांचं काय चुकलं, याचे उत्तर त्याला जिल्हा पातळीवर मिळत नाही आणि म्हणूनच आगामी वाटचालीसाठी या कार्यकर्त्यांचा धीर सुटत चालला आहे.
 
पक्षाचा विसावा वर्धापन दिन साजरा करत असताना कार्यकर्त्यांमध्ये आलेली ही मरगळ दूर करण्याचे आव्हान राष्ट्रवादीच्या नेतृत्वापुढे असेल. तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीस तितक्‍याच जोरकसपणे सामोरे जायचे असेल, तर इथून सुरवात करावी लागेल. कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा नवचैतन्य जागवावे लागेल. कार्यकर्त्यांमध्ये आशावाद निर्माण करणं हेच पक्षापुढील महत्त्वाचं आव्हान असेल. लोकसभा निवडणुकीनंतर पक्षबदलाच्या ज्या वावड्या उठवल्या जात आहेत, त्याची सत्यता बाहेर आणावी लागेल. पक्ष अस्थिर करण्याचा जो प्रयत्न होतोय, वातावरण बिघडवले जात आहे, ते दूर करावे लागेल. पक्षाची सामान्य माणसाशी असलेली नाळ जर तुटत असेल, तर ती जोडावी लागेल. थोडक्‍यात काय, तर आशावाद कायम ठेवणं हेच पक्षापुढचं आगामी काळासाठी खरं आव्हान आहे. राष्ट्रवादी ते पेलेल का? 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News