जाॅब मिळत नाही... मग करिअर चेंज करू?
- सुजाता साळवी
लेखिका या ईव्हिओएक्स टेक कंपनीच्या सीओओ आहेत
चेंज इज काॅन्स्टंट.. ही इंग्रजीमधली म्हण आपण अनेकदा ऐकली, वाचली असेल... पण २०२० मध्ये त्याचा प्रत्यय मिनिटा-मिनिटाला येतोय, नाही का? बदल होणे हा निसर्गाचा नियमच... सातत्याने बदलल्यामुळेच आपण प्रगतीच्या आणि भरभराटीच्या मार्गाने पुढे जाऊ शकतो. त्यामुळे तुम्ही जर आजही विशेषतः २०२० च्या एवढ्या उलथा-पालथीनंतरही एका बॅचलर डिग्री आणि कुठल्या स्कोअरच्या आधारे आपल्या उज्ज्वल भवितव्याची स्वप्न पाहात असाल तर 'कुछ तो गडबड है दया' असं नक्कीच म्हणावं लागेल!
सध्याच्या जागतिक महामारीच्या आणि न्यू नाॅर्मल जगण्याच्या परिस्थितीत आपण या नव्या जगाला स्वीकारून त्याप्रमाणे बदललेले चांगले राहील... किंबहुना आपल्याला त्याशिवाय दुसरा कोणता चाॅईस नाहीच आहे. नव्या जगामध्ये नव्या संधी आहेत, नवी आव्हाने आहेत आणि म्हणूनच त्यापुढे नवे भवितव्य आहे.
त्यामुळे हीच वेळ आहे आपल्या सर्व करिअर आॅप्शन्सचा पुनर्विचार करण्याची. होय, असे आॅप्शन्सही जे आपल्याला वाटत होते की ते खूप जुनाट आहेत किंवा आपल्याला ते जमणारचं नाहीत असे वाटलेल्या पर्यायांचाही विचार करण्याची वेळ आली आहे. आपल्या पॅशननुसार जगण्याचा, काहीतरी बदल घडवून आणण्याची हीच योग्य वेळ आहे. कोव्हिड-१९ च्या महामारीतून बाहेर पडण्यासाठी, म्हणजे वैद्यकीयदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्टीने, आपल्याला (जगाला) किमान दोन वर्ष लागणार आहेत. गेलेले जाॅब पुन्हा निर्माण होतीलच असे नाही. अन्य जाॅब निर्माण होण्यासाठी कदाचित वेळ लागेल. त्यामुळे हा मिळालेला वेळ आपल्याला गिफ्ट मिळालं आहे असं समजून आपल्या जीवनशैलीसाठी आणि रोजगारासाठी वेगळे मार्ग जोखण्याची एक संधी आहे.
पैशाशिवाय जगणं हे अशक्यच आहे. त्यामुळे पैसे कमविण्यासाठी सर्वात पहिलं या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी काय केलं पाहिजे, कंपन्या बंद पडत असताना, जाॅबवरून लोकांना कमी करत असताना, पगार कपात होत असताना काय केलं पाहिजे हे समजून घेतलं पाहिजे. सध्याच्या जागतिक संकटातून जो व्यवस्थितपणे बाहेर पडेल त्याला निश्चितच चांगले भवितव्य असेल. त्यामुळे या संकटाला सामोरे जाण्यासाठीचे प्रोत्साहन आपण स्वतःला दिले पाहिजे.
आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी, सुरक्षित भवितव्यासाठी, कुटुंबाची सुरवात करण्यासाठी आणि आपले ध्येय साध्य करण्यासाठी सध्यापेक्षा आव्हानात्मक वेळ कोणती असू शकत नाही. त्यामुळे हे सर्व साध्य करायचे असेल तर नवे स्किल्स शिकणे, मन खंबीर ठेवणे आणि आपल्या समोर आलेली प्रत्येक छोट्या, मोठ्या संधीचे सोने करण्याची गरज आहे.
एका कंपनीची सीओओ म्हणून हे मी निश्चित सांगू शकते की आजही मार्केटमध्ये खूप जाॅब्स आहेत, पण सध्या कंपन्यांकडून किमान खर्चात काम भागविण्याचे धोरण अंमलात आणले जात आहे. काही कंपन्यांमध्ये तर अशी परिस्थिती आहे की एम्प्लाॅईज परत येत नाहीयेत. काहींसाठी जाॅब जाणं हे फक्त रोजगार गमावल्यासारखं नाही तर आपली ओळख गमावल्यासमान आहे. त्यामुळे या सगळ्या लढाईत तुम्ही एकटे आहात असे वाटून घेऊ नका. आपल्या आशा-अपेक्षांचा पुनर्विचार करा आणि जमेल तसा करिअर चेंजचा विचार करा.
यापुढील लेखात आपण युआय डिझाईन, आर्टिफिशियल इंटलिजन्स, एनएलपी, मशीन लर्निंग, चॅट बाॅट्स, स्लॅक आदी विषयी आणि ते शिकल्यानंतर आपल्याला काेणत्या संधी उपलब्ध होतील हे जाणून घेऊया.