अशा प्रकारे करावे नर्तकासन
- याचा व्यवस्थित सराव झाला की, हे आसन जमू लागते. गुडघ्याचा त्रास आहे, त्यांनी शक्यतो हे आसन करू नये.
नर्तकासन हे दंडस्थितीमधील आसन आहे. तोलात्मक आसन प्रकार आहे. यापूर्वी आपण अनुपार्श्वकोनासन, नटराजासन ही आसने कशी करतात हे पाहिले आहे. याचा व्यवस्थित सराव झाला की, हे आसन जमू लागते. गुडघ्याचा त्रास आहे, त्यांनी शक्यतो हे आसन करू नये. प्रथम उजव्या पायाने हे आसन कसे करतात, हे पाहू. डाव्या पायावर उभे राहून उजवा पाय सावकाश जमिनीपासून वर उचलावा व गुडघ्यात वाकवून नटराजासनप्रमाणे हाताच्या आधाराने वरच्या दिशेला घ्यावा.
त्यानंतर हळूहळू पाऊल हनुवटीच्या इथे अडकविण्याचा प्रयत्न करावा. पाऊल अडकवले की दोन्ही हात वरच्या दिशेला घ्यावेत. छायाचित्राप्रमाणे आसनस्थिती घेण्याचा प्रयत्न करावा. परंतु, अतिताण देऊन किंवा झटका देऊन करू नये. अन्यथा गुडघ्याला किंवा स्नायूंना दुखापत होऊ शकते. आसनस्थिती पूर्ण झाल्यावर नजर स्थिर ठेवावी व श्वसन संथ सुरू ठेवावे. आसन सोडताना सावकाश सोडावे व दुसऱ्या बाजूने करावे. या आसनामध्ये लवचिकता वाढते. आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.