ऑनलाईन शिक्षण विद्यार्थ्यांसाठी कितपत फायदेशीर आहे?

रसिका जाधव
Friday, 7 August 2020
  • आजची चर्चा, माझा अधिकार, माझे मत...
  • ऐकीकडे कोरोनाच संकट तर दुसरीकडे आर्थिक अडचणी या अर्थिक अडचणीतून विद्यार्थी देखील सुटेलेले नाहीत.
  • आता कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अनेक मुलांचे भविष्य धोक्यात येऊ शकते.

मुंबई :- ऐकीकडे कोरोनाच संकट तर दुसरीकडे आर्थिक अडचणी या अर्थिक अडचणीतून विद्यार्थी देखील सुटेलेले नाहीत. आता कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अनेक मुलांचे भविष्य धोक्यात येऊ शकते. मार्च पासून शाळा आणि महाविद्यालय बंद आहेत. परंतु पुढील शैक्षणिक वर्ष सुरू करण्यासाठी सरकारने ऑनलाईन शिक्षण प्रणाली विकसित केली आहे. जेणे करून मुलांचे नुकसान होणार नाही ते घरी बसून त्यांच्या तासिक पूर्ण करू शकतात. ऑनलाईन शिक्षण विद्यार्थ्यांसाठी कितपत फायदेशीर आहे? तुम्हाला काय वाटतं याच विषयावर यिनबझच्या अनेक ग्रृपवर मनोसत्त्क चर्चा केली. या चर्चेतील काही निवडक मत आणि प्रतिक्रिया येथे देत आहोत.  

ऑनलाईन शिक्षण हे फक्त काही मोजक्याच किंवा ठराविक विध्यार्थ्यांना फायदेशीर आहे. कारण असे की, आजकाल ऑनलाईन शिक्षणासाठी सर्वांकडे मोबाईल किंवा ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी सुखसुविधा असेल असे नाही. म्हणून काही ठराविक आणि मोजक्याच विध्यार्थीसाठी फायदेशीर आहे. रोजंदारीवर काम करणारे लोक, ज्यांना शिक्षण घेणे परवडत नाही अशा लोकांनी कसे ऑनलाईन शिक्षण घायचे. गरीब विद्यार्थ्यांना याचा फायदा किंवा शिक्षण मिळत नाही, आणि जर ऑनलाइन शिक्षण सरकारने किंवा जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर सरकारने सरकारी योजना मधून उपलब्ध करून दिले. तर याचा सर्व विद्यार्थ्यांना लाभ होईल आणि शिक्षनासाठी आकारली जाणारी भरमसाट फी वर निर्बंध पडेल आणि कायद्यानुसार जी फी आकारले पाहिजे तीच अकारली जाईल.

सागर सातवेकर

ऑनलाईन शिक्षण पध्दत तितकी फायदेशीर वाटतं नाही. ऑनलाईन राहून अभ्यास करताना कनेक्शन व्यवस्थित असेल तर पूर्ण तास तासिका सुरळीतपणे करता येते, नाहीतर इंटरनेट परत परत जोडावे लागते, त्यातही विद्यार्थ्यां पर्यंत शिक्षकाचा आवाज पोहोचत नाही, शिक्षक पुरवत असलेले साहित्य विद्यार्थीना उपलब्ध होत कधी नाही, विद्यार्थ्यांचे काही समस्या असतात, त्या समस्यांचे समाधानकारक योग्य वेळेत उत्तर शिक्षक देऊ शकत नाहीत, विद्यार्थी पूर्ण वेळ लक्ष देऊन अभ्यास करत नाही, महत्त्वाचे मुद्दे समजावत असताना तो समोर असून लक्ष नसत, यांसारख्या तांत्रिक गोष्टींमुळे प्रत्यक्ष अभ्यासामधील रुची निघून जाते आणि कंटाळवाणे किंवा निरस होते.

विपुल जानराव

मुळात शिक्षण म्हंटल की, पुस्तक आणि शिक्षक अस काही चित्र डोळ्यासमोर उभे राहते परंतु सद्य परिस्थिती पाहता शिक्षण पद्धत ही पूर्णपणे बदलेली दिसून येत आहे. या ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे विध्यार्थ्यांना हवे तसे शिक्षण मिळणार नाही. त्यांचा पुस्तकाशी संबंध उरणार नाही. अनेक विध्यार्थी असे आहेत, ज्याच्या कडे ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी आवश्यक साधने उपलब्ध नाहीत किंवा नेटवर्क नसल्यामुळे अडचणी निर्माण होत असतील मग त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न इथे उपलब्ध होतो.

शिक्षणात बदल होत असला तरी पुस्तकात आणि गूगल वर एखाद्या प्रश्नाचे उत्तर शोधणे या मध्ये फरक जाणवते. ऑनलाईन शिक्षण घेताना अनेकदा "ध" चा "म" होण्याची शक्यता अधिक आहे. आणि हे शिक्षण मात्र एक विध्यार्थी आणि तंत्रज्ञान या मध्येच मर्यादित राहील. यामुळे विद्यार्थ्यांच्या ही ऑनलाईन शिकणं पद्धत त्यांच्या करिअरसाठी फारशी फायदेशीर ठरणार नाही अस मला वाटते.

अश्लेषा ननवरे

ऑनलाईन शिक्षण हे या कोरोना काळात तरी खूप फायदेशीर आहे. अगदीच नसण्यापेक्षा काही तरी सुरु असलेल नेहमीच उत्तम कारण ही परिस्थिती अजून किती काळ राहील सांगू शकत नाही. झूम मीटिंग या सारखे बरेच अँप विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणासाठी फायदेशीर ठरत आहेत. कारण त्यामध्ये उपलब्ध असलेल्या विविध फीचर्समुळे शिक्षकांना पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन करून शिकवण देखील सोप्प होते आणि विद्यार्थ्यांना सुद्धा एखादा कंसेप्ट समजण्यासाठी त्याची मदत होते. संपूर्णपणे ऑनलाईन शिक्षण घेण्याची ही पहिलीच वेळ असल्याने त्याच सुरुवातीचे काही दिवस नवल देखील वाटते. तसेच हातात असलेल्या डिजिटल माध्यमांचा वापर आपण किती उत्तम प्रकारे करू शकतो याची देखील जाणीव होत आहे. ऑनलाईन शिक्षण हे सध्या प्रत्येक जण घरी बसून घेत असल्याने लेक्चर संपल्यावर कुटुंबासोबत वेळ घालवणे किंवा इतर कौशल्य विकास वाढवणारी कामे करण्यास वेळ मिळत आहे.

पूजा पवार

विज्ञानाच्या जोरावर नवनवीन तंत्रज्ञानामुळे शिक्षण क्षेत्रात देखील अनेक बदल झाले आहेत. यामध्ये ऑनलाईन शिक्षण घेणे देखील सहज शक्य झाले आहे. मात्र, हेच ऑनलाईन शिक्षण सर्वांनाच फायदेशीर आहे असे नाही. सध्य परिस्थिती पाहता लॉकडाऊन दरम्यान, ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या अडचणींमुळे विद्यार्थ्यांनी आत्महत्या करण्याचा प्रकार समोर आला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे मोबाईल अथवा संकणक नसणे, अपुरी इंटरनेट सुविधा.

खेडेपाड्यातील, गावाकडील सर्वसाधारण कुटुंबातील विद्यार्थ्यांना या सुखसुविधा मिळतीलच असे नाही. त्यामुळे या ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे या विद्यार्थ्यांचे शिक्षण अपुरे राहण्याची शक्यता आहे. वेळ कोणासाठीही थांबत नही. असच काही सध्या चालू आहे. ज्यांच्याकडे ऑनलाईन शिक्षण घेण्याकरता सर्व सुविधा उपलब्ध आहेत. त्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी कोणत्याही अडचणी येत नाही. मात्र, काही विद्यार्थ्यांना या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे माझ्या मते, ऑनलाईन शिक्षणपद्धती सर्वांनाच फायदेशीर आहे असे नाही.

मनिष तरे

गेली चार महीने शाळा बंद आहेत. शाळा सुरू कराव्यात की नाही, यासाठी अनेक मते मतांतरे आहेत. त्यावर एक तात्पुरता उपाय म्हणून ऑनलाईन शिक्षण पध्दती सध्या अवघ्या जगात सुरू करण्यात आली आहे. काहींना तर असे वाटते की, अता ऑनलाईन शिक्षण पध्दती ही आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग होऊन जाईल. पण ऑनलाईन पध्दतीने शिक्षण देतांना ज्या व्हर्चुअल म्हणजेच आभासी जगाचा आधार आपण घेतो आहोत. त्या आभासी जगात, प्रत्यक्ष अनुभुतीचा जो आभाव आहे त्याची भर आपण कशी भरून काढणार आहोत ?

पण मुलांना शाळेत पाठवावे तर कोविडचा संसर्ग होण्याची भिती. यावर लस निघेलही. पण म्हणून मग दुसरा कोणताही संसर्गजन्य आजार येणारच नाही याची कोण खात्री देऊ शकेल ? म्हणजे मग पुन्हा मुलांची शाळा बंद का? यावर कायम स्वरूपी काहीच उपाय असु शकत नाही का ? संसर्गजन्य रोग टाळण्यासाठी म्हणून नव्हे, तर मुळातच आपली प्रचलीत शिक्षण पध्दती न आवडल्यामुळे शिक्षणाच्या किंवा शिक्षण पध्दतीच्या वेगळ्या वाटा धुंडाळनारे काही अवलीये आपल्या अवतीभवती असतात.

त्यातलाच एक महत्वाचा प्रकार म्हणजे "होम स्कुलींग"! मुलांना शाळेत न पाठवता घरीच त्यांची तयारी करून घेणे. पण या प्रकारात मुलांच्या पालकांचा रोल खुपच महत्वाचा असतो. मुलांच्या शिक्षणाकडे प्रचंड संवेदनशील पणे लक्ष द्यावे लागते. दोन्ही पालकांपैकी एकाने नोकरी न करता जवळ जवळ पूर्ण वेळ घरी रहाने क्रमप्राप्त आहे. मुल जस जसे वाढेल, तस तसे त्याला साधारण शाळेत शिकवले जाणारे विषय घरच्या घरी शिकवावे लागतात. या शिक्षण पध्दतीमध्ये मुलांनी स्व अनुभवातून शिकावे अशी जरी अपेक्षा असली तरीही गरज वाटेल तेंव्हा त्याला मदत करणे आवश्यक असते. स्व अनुभवातून म्हणजे,  जर नदी हा विषय असेल तर प्रत्यक्ष नदीवर जाऊन अथवा नदी दाखवून तो विषय समजून सांगावा लागतो. किल्ला कसा असतो हे सर्व अनुभव शक्य तेवढे प्रत्यक्षात देणे अपेक्षित असते. मुलांच्या आवडीनुसार त्याला ज्या विषयात जास्त रस आहे तो विषय त्याला जास्त अभ्यास देणे इत्यादी. 

आपल्याकडे दहावीची परीक्षा हा शैक्षणिक प्रवासातला एक महत्वाचा टप्पा आहे. आणि दुर्दैवाने त्याला दुसरा पर्याय नाही. त्यामुळे नववी पर्यंत जरी आवडीच्या विषयाचा अभ्यास केला तरीही दहावीला पारंपारिक पद्धतीनेच सामोरे जावे लागते. आपल्या सर्वांनाच हे होम स्कुलींग शक्य नाही. पण या कोरोना च्या काळात जेंव्हा आपण जास्तीत जास्त वेळ आपल्या पिल्लां सोबत आहोत, तर त्यांना वेगवेगळे अनुभव अगदी घरापासून ते जवळपासच्या निसर्गा पर्यंत का देऊ नयेत? त्यातून ते जे शिकतील ते आयुष्य भरासाठी परंतु परीक्षेसाठी घोकंपट्टी करून मिळवलेले ज्ञान ते कदाचित परिक्षेनंतर विसरतीलही. पण हे होम स्कुलींगने प्रत्यक्ष अनुभवातून मिळवलेलं ज्ञान ते कधीही विसरणार नाहीत.

महेश सोरटे

ऑनलाईन शिक्षण हे एक अर्थाने चांगले आहे, तर एक अर्थाने वाईट ठरत आहे. घरी बसून रोजची काम करून आपल्याला शिकता येते शिवाय इतर बऱ्याच गोष्टी करण्यास वेळ मिळतो ही चांगलीच गोष्ट आहे. हातातल्या मोबाईलचा चांगल्या कामासाठी वापर होतोय शिवाय करोनासारख्या महामारीमध्ये विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाही याची शाश्वती आहे. परंतु असे डिजिटल शिक्षण घेताना त्यातून किती ज्ञान आपण घेतो याचा बोध होत नाही. परीक्षेला काय विचारणार, किती लिहायचे याबाबत विद्यार्थी अनभिज्ञ आहेत. ज्या विद्यार्थ्यांना शाळेत समोर शिक्षकांनी समजावलेला मजकूर कळायला वेळ लागायचा त्यांना मोबाईलवर शिकवलेल किती कळेल यात शंका आहे. शिवाय  पालकांना अँपद्वारे शिकायचे म्हणजे कसं ? असा प्रश्न पडलेला असतो. ते मुलांच्या हाती मोबाईल देऊन मोकळे होतात आणि काही विद्यार्थी मोबाईल चालू करून निघून जातात, त्यांना या शिक्षण प्रवाहात आणणे अत्यंत कठीण आहे. त्याहून कठीण म्हणजे काही मुलांकडे ऑनलाईन शिकण्यासाठी साहित्यच उपलब्ध नाही. सरकारने केलेल्या अनेक घोषणा किंवा तरतुदी या मुलांसाठी काहीच उपयोगाच्या नाहीत. ही मुले मात्र या शिक्षणाच्या प्रवाहापासून वंचित राहण्याचीच जास्त शक्यता आहे. नवनवीन धोरणे आणून या गावखेड्यातील मुलांसाठी सरकारने काही विशेष पावले उचलली पाहिजेत तरच प्रगतिशील भारताचा पाय रोवला जाईल. 

पायल नाईक

ग्रामीण भागात रोजगाराच्या संध्या कमी झालेल्या असताना इथल्या मायबाप सरकारला ऑनलाईन शिक्षणाचे डोहाळे लागले आहेत. आजही अनेक गावे अशी आहेत. जिथे वीजपुरवठा नाही तर काही गावांमध्ये वीजपुरवठा खंडित केला जातो. अशा भागांमध्ये विद्यार्थांना ऑनलाईन शिक्षणाचे महत्व तुम्ही कोणत्या इन्व्हर्टर किंवा जनरेटरच्या माध्यमातून पोहचवणार आहात. 1GB किंवा 1.5 GB डेटामध्ये किती तास ऑनलाईन स्ट्रीमिंग चालू शकते याचे गणित ६०-७० हजार पगार घेणारे शिक्षक कधीच सांगू शकत नाहीत. फ्री वायफाय देण्यासाठी कोणता अंबानी जिओच्या माध्यमातून स्वतःचा जीव धोक्यात घालणार आहे. अनेक मजुरांच्या मुलांनी मोबाईल नाही किंवा साधने नाहीत म्हणून आत्महत्या केलेल्या आहेत. शिक्षणावर केवळ शहरातील मुलांचा हक्क नसून गावकुसाबाहेर असणाऱ्या मुलांचा देखील तेवढाच हक्क आहे, हे सर्व अभ्यासक विसरले आहेत. पहिल्यांदा सोयी सुविधा उपलब्ध करून द्या नंतर प्रश्न उभा राहतो ऑनलाईन शिक्षणाच्या फायद्याचा किंवा तोट्याचा? शेवटी हे शिक्षण जीवघेणे होऊ नये एवढ्याच अपेक्षा. शहराने कधीच आत्महत्या केली आहे आता गाव आत्महत्या करायचे म्हणतंय याचा देखील विचार व्हावा.

एकनाथ गोपाळ

२०२० या वर्षाचे सहाच महिने होत आहेत आणि जगात नुसती उलथापालथ होते असे वाटते. कोविड-१९ नंतर आपण सर्वजण एका स्थित्यंतराच्या टप्प्यात आहोत. आपल्याला हवे किंवा नको असले तरी खूप मोठे बदल आपल्या आयुष्यात होणार आहेत. काही गोष्टी आधीपासूनच आपली जागा बनवण्याच्या प्रयत्नात होत्या आणि लॉकडाऊनमुळे ती संधी मिळाली. आता सर्वजण या गोष्टींकडे एक उत्तम पर्याय म्हणून पाहू लागले आहोत. त्यापैकीच एक म्हणजे 'ऑनलाइन शिक्षण' !

आता नवीन सत्र सुरु होत असल्याने ऑनलाइन शिक्षणाचा अजूनच जास्त गाजावाजा होऊ लागला आहे. मात्र याबाबत शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांमध्येही प्रचंड संभ्रम आहे. शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ आणि शासन यांपैकी कुणालाच नक्की काय भूमिका घ्यायची हे समजत नाही. तर दुसरीकडे, केंद्र शासन नवीन ‘शिक्षा नीती’ आणायची तयारी सुरु झाली आहे. यंदा संसदेची अधिवेशनेही व्हर्चुअल होतील अशी स्थिती आहे. या परिस्थितीत शिक्षक आणि विद्यार्थ्यांसमोर ऑनलाईन वर्ग घेण्याचा दबाव वाढतो.

ऑनलाइन शिक्षण देणारे बरेच प्लॅटफॉर्म्स आधीपासून उपलब्ध आहेत. त्यांच्यामार्फत तुम्ही देश-विदेशातील नामांकित विद्यापीठांची प्रमाणपत्रे मिळवू शकता. या तंत्रज्ञानाच्या माध्यमांतून तुम्ही जगातल्या कोणत्याही विषयाबद्दल माहिती मिळवू शकता. सोबत परीक्षा देऊन तुम्हाला सर्टिफिकेटसुद्धा मिळते. काहीवेळा ही सर्टिफिकेट्स कामाला येऊ शकतात, पण बऱ्याचदा ती फक्त आपल्या फाईलची जाडी वाढवण्याच्या कामाचीच असतात.

तात्पर्य काय तर कोविड-१९ नंतर जग बदलणार आहे. आणि आपण या बदलांसाठी तयार होऊया कुसुमाग्रजांच्याच शब्दांत सांगायचे झाले तर ‘अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा, किनारा तुला पामराला!’

श्रुती वाघाटे

राज्यातील करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शिक्षण व्यवस्था पूर्णपणे संकटात आलेली आहे. त्यामुळे कोरोना सारख्या महामारीच्या संकटातून बाहेर येई पर्यंत सद्या तरी ऑनलाईन शिक्षणाची पद्धत चांगली आहे. परंतु कायमस्वरूपी ह्या पद्धतीकडे पाहून चालणार नाही. स्टडी फ्रॉम होम, वर्क फ्रॉम होम या पद्धतींने सर्वांगीण विकासाचा विचार केला तर तोटाच जास्त प्रमाणात होईल, असे मला वाटते.

काही गोष्टी या अगोदर पासूनच आपली जागा निर्माण करण्याच्या तयारीत होत्या आणि त्यात ह्या कोरोनाच्या काळात झालेल्या लॉकडाउनमुळे ऑनलाईन शिक्षण पद्धतीला तशी संधीही मिळाली. शाळेतील वर्ग हा मनाला ताजेतवाना करणारा स्रोत आहे. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण घेताना वयोगट खूप महत्त्वाचा आहे. तस पाहिले गेले तर बालवाडीपासून ते बारावीपर्यंतच्या ऑनलाईन शिक्षणाचा जास्त फायदा मुलांना होणार नाही. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण हे बारावीच्या पुढील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल.

तसा जर विचार केला तर ग्रामीण भागामध्ये आजही विजेची समस्या मोठ्या प्रमाणात आहे. तसेच ग्रामीण भागातील सर्वच विद्यार्थ्यांकडे संगणक, लॅपटॉप, स्मार्टफोन उपलब्ध नसतो. समाजामध्ये खूप कुटुंब अशी आहेत की, त्यांना दोन वेळच जेवण सुद्धा मिळत नाही, आणि चार भिंतीचा निवारा सुद्धा नाहीये, त्यांनी ऑनलाईन पद्धतीचे शिक्षण कसे घ्यायचे, त्याही पलीकडे पाहिले गेले तर जिथे मोबाईलाच रेंज नाही, अशा ठिकाणी ऑनलाईन शिक्षण पद्धती हास्यास्पद का नाही ठरणार. त्यामुळे माझ्या मते तर खडू, फळा, पाटी, पेन्सिल, दप्तर, वही ह्या वस्तू विद्यार्थ्यांसाठी खूप मोलाच्या आहेत. या वस्तूंमुळे तर विद्यार्थ्यांना खरी शिक्षणाची गोडी निर्माण होते.

मुख्य म्हणजे ऑनलाईन शिक्षण पद्धतीने विद्यार्थ्यांना जे शिकवले जाते, ते त्यांना समजते का? हे पण खूप महत्वाचे आहे. सद्याच्या काळात तर जन्माला आलेल्या मुलापासून ते अगदी मोठया व्यक्तींपर्यत सर्वांनाच मोबाईलचे भयंकर प्रमाणात वेड लागले आहे. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने कितपत मुले चांगले शिक्षण घेतील की, बिघडतील याचाही विचार केला पाहिजे. शहरी भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचा फायदा घेता येईल. पण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे कसे होणार? ऑनलाईन शिक्षण पद्धतीच्या अशा एक ना अनेक प्रकारच्या समस्या आहेत, त्यामुळे सर्वसामान्य माणसाला शिक्षण घेता येईल, अशी एकमेव शिक्षण पद्धत ही पारंपरिक शिक्षण पद्धतीच आहे. आणि ती तळागाळातील सर्व विद्यार्थ्यांच्या फायदेशीर आहे, असे मला वाटते. त्यामुळे सरकारच्या डोक्यात ऑनलाईन पद्धतीचे जे खूळ भरले आहे. ते काढून टाकावे नाहीतर ऑनलाईन पद्धतीच्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून द्या.

 शिल्पा नरवडे

सद्यपरिस्थिती बघता विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, यासाठी ऑनलाईन शिक्षण हाच एकमेव मार्ग आहे. तसेच विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात न घालता ज्ञानसंपादन करण्याचा उपायदेखील. ऑनलाईन शिक्षणात तांत्रिक अडचणी येतात पण डिजिटल माध्यमांनी केलेल्या प्रगतीमुळे त्याही दूर होतात आणि शिक्षण सुरळीत होते. ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा प्रवासाचा वेळ वाचेल त्यामुळे या वाचवलेल्या वेळात अजून काहीतरी करता येऊ शकते. जोवर प्रत्यक्ष वर्गात बसून शिक्षण पद्धत परत सुरू होत नाही तोवर विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचा एक अनुभव घेता येईल. इच्छा तिथे मार्ग असतो त्यामुळे ऑनलाईन अभ्यास जरी वेगळा असला तरी विद्यार्थ्यांच्या इच्छेप्रमाणेच पण ऑनलाईन मार्ग नक्कीच फायदेशीर ठरेल.

मैथिली फडके

ऑनलाईन वर्ग भरतील असा विचार विद्यार्थ्यांनी तर सोडा शिक्षकांनी पण कधी केला नसेल. देशात मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोना व्हायरस सक्रिय झाला आणि राज्यसरकारने तातडीने शाळा कॉलेज बंद करण्याचे आदेश दिले आणि केंद्राने देखील देशात लॉकडाऊन घोषित केला आणि बघता बघता सर्व काही ठप्प झाले. एकवीस दिवसांचा लॉकडाउन पाच महिने लोकांना घरी बसवेल याची कोणीच कल्पना केली नसेल. मुलाचे शैक्षणीक वर्ष वाया जाऊ नये म्हणून सरकारने सगळ्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात ढकलले. आता ऑनलाईन स्वरूपात शिकवण्याचा जीआर सगळया शाळांना पाठवला आहे. ऑनलाईन स्वरूपात शिकणे जसे विद्यार्थ्यांसाठी नवीन आहे. तसेच ऑनलाईन माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवणे हेही शिक्षकांसाठी नवीनच आहे. सद्या बाहेर कोरोना संसर्गजन्य रोगाचे वाईट संकट आल्यामुळे तात्पुरते ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवणे ठिक आहे. परंतु कायम ऑनलाईन शिकवणे योग्य नाही! शाळेला आपण विद्येचे मंदिर म्हणत असतो, जी प्रसन्नता आणि प्रामाणिक ज्ञानाची देवाणघेवाण शाळेतल्या वर्गात होते ती ऑनलाईन लेक्चर मध्ये कुठे ? शिक्षकांविषयी आदर असो व्हा पुस्तकी ज्ञानाबरोबर अनुभवांची शिदोरी असो हे फक्त प्रत्यक्ष शिकायला मिळत. आज अनेक पालकांनी ऑनलाईन लेक्चरसाठी आपल्या मुलांना टॅब घेऊन दिलेत शाळा बंद असून पण अक्षरशः कर्ज काढून शाळेची भरमसाठ फी भरली आहे. पण त्याचा सकारात्मक परिणाम होतो आहे का ? मुलं लेक्चर झाल्यानंतर अभ्यास करतात का ? ऑनलाईन लेक्चरमध्ये विद्यार्थ्यांचे कितपत लक्ष असते ?  हे पालकांनी पाहिले पाहिजे, विद्यार्थ्यांचा अभ्यास घेतला पाहिजे. मुले इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या आहारी नाही गेली पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे. कारण पहिलेच शिक्षणव्यवस्थेने पहिली ते आठवी विद्यार्थ्यांना पुढे ढकलून आणि दहावी पर्यंतचे शिक्षण अगदी सोपे करून शिक्षणाचा दर्जा कमी केला आहे. महाविद्यालय जाऊन पण काही विद्यार्थ्यांना जोड शब्द वाचता येत नसतात, जनरल नॉलेज नसत. शब्द उच्चार स्पष्ट नसतात.

ऑनलाईन लेक्चर घेतात खरे पण मग परीक्षेचे काय ? परीक्षा तर ऑनलाईन स्वरूपात घेणे शक्य नाही. ऑनलाईन स्वरूपात परीक्षा घेतलीच तर त्यामध्ये कॉपी होणारच! शिक्षणाचा कमी होणारा दर्जा सरकारने आणखीन कमी करू नये एवढीच प्रमाणिक मागणी माझी राहील. विद्यार्थी पदवी घेऊन बाहेर पडल्यावर जास्त ज्ञान नसल्यामुळे त्यांना नोकऱ्या मिळत नाही अपेक्षित पगार मिळत नाही. ऑनलाईन स्वरूपातील लेक्चर तात्पुरते चालवून विद्यार्थ्यांची सगळी काळजी घेऊन लवकर सरकारने शाळा सुरू करावी. शैक्षणीक विभागाने शालेय शिक्षणाचा दर्जा पुन्हा वाढवला पाहिजे आणि केजी ते पीजी पर्यंतचे शिक्षण मोफत दिले पाहिजे.

अमित गायकवाड

कोविड-१९ च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वसामान्यांना परिस्थितीवर मात करता यावी म्हणून ऑनलाईन शिक्षण पद्धती विकासाच्या दृष्टिकोनातून अंमलात आणण्यात आली. परंतु एकंदरीत विचार केला असता ऑनलाईन प्रशिक्षण घेणं जितके सुलभ वाटत आहे, तितक्या सुलभरित्या ते ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिवाय इतकेच नव्हे शहरातील देखील काही आदिवासी विभागातील विद्यार्थ्यांना घेता येणे शक्य नाही. अर्थातच ऑनलाईन शिक्षणाची संकल्पना प्रगतीपथावर नेण्यायोग्य निर्णायक ठरली असली तरीही आर्थिकदृष्ट्या आणि तांत्रिकदृष्ट्या ती तितकीच कोलमडण्याची शक्यता आहे. याचे कारण असे ते म्हणजे बेरोजगारी. सर्वसामन्यांच्या जगण्याचा प्रश्न जिथे निर्माण होतो तिथे पालक आपल्या मुलांना कशा पद्धतीने प्रोत्साहन देतील हा एक मोठा प्रश्न समोर उपस्थित होतो? तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला इंटरनेट, संगणक, ई-लर्निंग आणि इतर माध्यमांचा उपभोग घेता येणे शक्य नाही आणि या समस्या बहुतांश ग्रामीण भागातील तसेच मुख्य म्हणजे शेतकऱ्यांच्या मुलांबाबत सातत्याने भेडसावत असतात. तात्पर्य इतकंच की, ऑनलाईन शिक्षण पद्धती विकसित करण्यात आपण वास्तविक परिस्थिती तर नाकारू शकत नाही ना याचीही दखल घेणे तितकेच अत्यावश्यक आहे.

अमृता सोनवणे

ऑनलाईन शिक्षण तसे फायदेशीर अजिबात नाही, कारण सर्वांन कडे स्मार्ट फोन इंटरनेट असेलच असे नाही शक्यतो ग्रामीण भागामध्ये ऑनलाईन शिक्षण सगळ्याच विद्यार्थांना मिळेल असे बोलता येत नाही. ऑनलाईन शिक्षणामध्ये विद्यार्थान वर शिक्षकांचे जवळून लक्ष देखील राहत नाही पण सध्याच्या परिस्थिती मध्ये विद्यार्थी घरी सुरक्षित आहेत. या पेक्षा महत्त्वाचे काहीच नाही असे मला वाटते आणि शाळा या लॉकडाऊन मध्ये खूप प्रयत्नशील आहेत. मुलांच्या अभ्यासासाठी, शाळा प्रयत्न करते त्यांच्या परीने आपण सुद्धा आपल्या परीने शाळेला समजून घ्यायला हवे.

प्रिती कुथे

 

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News