मानाच्या गदेपेक्षा मित्राचा सन्मान महत्त्वाचा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 9 January 2020

एकमेकांबद्दलचा आदर राखण्याचा  मार्ग खेळातून सापडतो. मेरी-झरीन या महिला मुष्टियोद्‌ध्यांना जमले नाही, ते आपल्या मातीतील हर्षवर्धन सदगीर आणि शैलेश शेळके यांनी दाखवून दिले. 

मुंबई : बॉक्‍सिंग आणि कुस्ती हे तसे दोन्ही खेळ रिंगमधले... त्याहूनही शरीरवेधी... म्हणजे राग, आक्रमकता प्रतिस्पर्धी खेळाडूंवर दाखवण्याची संधीच जणू. कोणी जुने हिशेब पूर्ण करतो, तर कोणी प्रतिस्पर्ध्यांना खांद्यावर घेऊन नाचतो. एकमेकांबद्दलचा आदर राखण्याचा  मार्ग खेळातून सापडतो. मेरी-झरीन या महिला मुष्टियोद्‌ध्यांना जमले नाही, ते आपल्या मातीतील हर्षवर्धन सदगीर आणि शैलेश शेळके यांनी दाखवून दिले. 

जेमतेम आठवडाभरातील दोन घटना भारतीय क्रीडा क्षेत्राच्या दोन बाजू दाखवणाऱ्या ठरल्या आहेत. खेळात हारजितप्रमाणे श्रेष्ठत्वाचीही लढाई होत असते; पण ‘महाराष्ट्र केसरी’त श्रेष्ठ ठरूनही मित्र असलेल्या आपल्या सहकाऱ्याला तेवढाच सन्मान देण्याचा मोठेपणा हर्षवर्धनने दाखवला आणि तमाम जनतेची मने जिंकली.

‘महाराष्ट्र केसरी’ या मानाच्या गदेपेक्षा त्यांनी शैलेशचा उचललेला भार सर्वार्थाने महाराष्ट्राच्या कुस्तीची यशोगाथा सांगणारा होता.
विख्यात कुस्तीपटू आणि आताचे मार्गदर्शक काका पवार यांच्या तालमीत केवळ कुस्तीचे धडे आणि डावच शिकवले जातात असे नाही; तर मित्रत्वाचीही भावना जोपासली जाते, हे सिद्ध झाले. त्यामुळे पराभूत होऊनही शैलेश निराश झाला नव्हता आणि जिंकूनही हर्षवर्धनच्या आनंदात उन्माद नव्हता. पराभूत झालो असतो तरी निराश झालो नसतो, हे शैलेशचे उद्‌गार सर्व काही स्पष्ट करणारे आहे.

मेरीची अखिलाडू वृत्ती

एकीकडे महाराष्ट्रातील ही कुस्ती आदर्श निर्माण करीत असताना भारतीय क्रीडा क्षेत्राने मेरी कोम आणि झरीन निकत यांची खुन्नसही पाहिली होती. ऑलिंपिक पात्रता संघात कोणाला स्थान मिळणार, यापेक्षा एकमेकींमध्ये श्रेष्ठ कोण, याचीच ती लढत होती. रिंगणावर जेवढा त्वेषाने खेळ केला जातो, तेवढीच खिलाडू वृत्ती सामन्यानंतर दाखवणे हीच खिलाडू वृत्ती होती; पण मेरी आणि झरीन ‘त्या’ लढतीनंतरही शाब्दिक ठोसे मारत राहिल्या होत्या.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News