घराचं घरपण, असं तुमचंही असाव

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 25 April 2019

घर म्हणजे काय? घराचं घरपण संपतंय म्हणजे काय? घराचं घरपण का संपू द्यायचं नाही? ती फक्‍त स्त्रीचीच जबाबदारी आहे.

बाई गं, तू शिकलीस, ऑफिसात जातीस. मिळवती झालीस; पण अगोदर घर संसार, मग करिअर, अशासारखा उपदेश व सुनावणं घराघरातून ऐकायला मिळतं. फरक शब्दांमध्ये असेल; पण घर संसाराला पहिली प्रायोरिटी व मग जॉबला हीच अपेक्षा ज्येष्ठांकडूनच नव्हे, तर मुलाबाळांसह नवरा, नातेवाईकांकडून, शेजाऱ्यांकडूनसुद्धा. ‘आधी घर, मग करिअर’ हीच अपेक्षा मिळवतीकडून.

स्त्रियांचे कमावतेपण तर घरातल्यांना हवंच हवं; मात्र त्यासाठीचा वेळ, एनर्जी, घरकामातून सवड, कौटुंबिक जबाबदाऱ्यांमधून सूट आणि काहीशी पर्सनल स्पेस देण्याची तयारी कुटुंबीयांनी ठेवायला हवी. तुमच्या खात्याच्या परीक्षा, ट्रेनिंग जॉबच्या दृष्टीने आवश्‍यक ते पदोन्नतीसाठी ओव्हरटाईम वर्क वगैरेचे महत्त्व त्यांना नसेल तर कमावतीला टेन्शन येणे, इरिटेट होणे असे प्रकार येणारच ना? त्यातून चिडचिड, अस्वस्थता, बी. पी. वाढणं हे सोसणं येतं कमावतीला. नवरा-बायकोत वाद, संताप, संघर्ष यातून नात्याचे विघटन होण्यापर्यंतची स्थिती उद्‌भवू शकते.

मान्य. अहो नव्हे, हे असायला हवे की, संसार महत्त्वाचा. घर मोलाचे, मुलांचे संगोपन महत्त्वाचे. संसार, नवऱ्याची काळजी, नात्याची देखभाल, नातेवाईकांची उठबस याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तरीही जॉबची डिमांड, करिअरची गरज, नोकरीच्या वेळा, मीटिंग्ज या टाळणं शक्‍य नसण्यातून कमावत्या स्त्रियांविषयी गैरसमज होत राहतात व कुटुंबातले, नात्यातले ज्येष्ठ त्यास खतपाणी घालतात. त्यातून ‘गॉसिप’चा धमाका आणि कमावतीचे स्वास्थ्य हरवणं घडतं. वास्तविक कुटुंबासाठीच अर्थार्जन करणं असल्यानं त्या संदर्भातील मोल लक्षात घ्यावे.

तंत्रज्ञान, विज्ञान, ज्ञान व आधुनिक प्रगतीचे वारे वाहत आहेत. ग्लोबल आलं, जागतिकीकरण झालं. मल्टिनॅशनल कंपन्या विस्तारत गेल्या. आपल्याकडेही त्या आल्या आणि स्त्रियांना नोकरीच्या संधी वाढल्या. त्या विविध क्षेत्रांत चमकत आहेत. राजकारण, अर्थकारण, शिक्षण, समाजसेवा, स्वयंसेवी संस्था अशांसारख्या विविध क्षेत्रांत स्त्रिया कार्यरत आहेत.

तरीही स्त्रिया घर, संसार सांभाळण्याचा प्रयत्न टाळतात असेही नाही; मात्र काही स्त्रिया ती जबाबदारी समर्थपणे पेलत नाहीत. पैसा, पद, पदोन्नती, बॅंक बॅलन्स, घरदार, कार अशांसारख्या बाबींची त्यांना क्रेझ. त्यामुळे काय होतं तर त्या मुलं, नवरा, घर याकडे म्हणावं तितकं लक्ष देत नाहीत. एक तर तसा त्यांचा स्वभाव व दुसरं वेळेचा अभाव. परिणामी वितंडवाद, भांडण, घटस्फोटापर्यंतची मजल जात आहे. 

घर म्हणजे काय? घराचं घरपण संपतंय म्हणजे काय? घराचं घरपण का संपू द्यायचं नाही? ती फक्‍त स्त्रीचीच जबाबदारी आहे. पुरुषांचा सक्रिय सहभाग हवा. घर म्हणजे लॉजिंग-बोर्डिंग नव्हे, तर तिथं नात्यांमध्ये प्रेम, विश्‍वास, आपुलकी, कर्तव्यभावना हवी. घर हा प्रत्येकाचा श्‍वास असतो. जिवंत ठेवणारा श्‍वास असतो. रेशमी नात्यातला विश्‍वास असतो. 

खरे तर पुरुषांनी, नवरे मंडळींनी मनापासून स्त्रियांशी संवाद, सुखदुःखात सहभाग, प्रेमाचा शिडकावा, कौतुकाची थाप, घरकामात सहभाग, प्रायव्हसी व पर्सनल स्पेस देण्यातून स्त्रियांना शारीरिक व मानसिक थकवा यातून दिलासा द्यावा. स्त्रिया या खरे तर मल्टिटास्कर आहेत; परंतु त्यासाठी नवरा व कुटुंबीयांची साथ व सहकार्य हवे. पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन व पारंपरिक नॉर्म्स वापरून स्त्रियांच्या कामगिरीचे मूल्यमापन होऊ नये. घर संसाराची उभारणी व ते राखणं ही जबाबदारी स्त्रियांनी घ्यावी; पण साथ हवी पुरुषांची म्हणजे कुटुंबातील नवरा व इतर मंडळींची.

दुभंगलेले घर कधीच उभे राहू शकत नाही, असा विचार अब्राहम लिंकन यांनी मांडला, तर साने गुरुजी म्हणतात, घर म्हणजे एकमेकांना माणसाळण्याची शाळा. तेव्हा स्त्रियांना घर संसाराची जबाबदारी टाळून नाहीच चालणार. कारण त्यांच्यावर मुलांचं भवितव्य अवलंबून आहे. जॉब, करिअर तर महत्त्वाचे. त्याची डिमांडही टाळता येणार नाही. तेव्हा घर व करिअरचा समन्वय साधावा व समायोजनही करावं हेच खरं.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News