गुलाबाच्या पाकळ्यांपासून नॅचरल ग्लो येण्यासाठी घरच्या घरी करा क्रीम; जाणून घ्या पद्धत

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 16 September 2020
  • प्रत्येक व्यक्तीला नॅचरल ग्लो पाहिजे ही सगळ्याची इच्छा असते. त्यासाठी सगळेच खूप प्रयत्न करत असतात.
  • परंतु त्वचेची देखभाल करण्यासाठी कोणाकडेही पुरेसा वेळ नसतो.

मुंबई :- प्रत्येक व्यक्तीला नॅचरल ग्लो पाहिजे ही सगळ्याची इच्छा असते. त्यासाठी सगळेच खूप प्रयत्न करत असतात. परंतु त्वचेची देखभाल करण्यासाठी कोणाकडेही पुरेसा वेळ नसतो. ब्युटी पार्लरमधील केमिकलयुक्त ट्रीटमेंट करण्याऐवजी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार नैसर्गिक उपचारांची मदत घेऊन पाहा. यामुळे तुमच्या त्वचेला दीर्घकाळासाठी लाभ मिळतील. नैसर्गिक उपचार करण्यासाठी तुम्ही गुलाबाच्या फुलाचाही वापर करू शकता. त्वचा उजळ आणि चमकदार होण्यासाठी गुलाबाचे फुल लाभदायक ठरू शकते.

या फुलामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत, ज्यामुळे चेहऱ्यावरील लालसर डाग कमी होण्यास मदत मिळते. या घरगुती क्रीमच्या वापरामुळे चेहऱ्यावरील मुरुम, सूज आणि एक्झिमापासून सुटका मिळू शकते. गुलाबाच्या पाकळ्या त्वचेवर क्लींझर प्रमाणे कार्य करतात आणि रोमछिद्रांमध्ये जमा झालेले तेल व दुर्गंध बाहेर काढण्यासही मदत मिळते.

​गुलाबाच्या फुलातील पोषक घटक

कोरड्या त्वचेची समस्या असणाऱ्यांसाठी गुलाबाच्या पाकळ्यांची क्रीम फायदेशीर ठरू शकते. गुलाब आपल्या चेहऱ्याला हायड्रेट आणि मॉइश्चराइझ ठेवण्यासाठी मदत करते. गुलाबाच्या पाकळ्यांपासून तयार केलेले फेस पॅक लावल्यास आपला चेहरा प्रसन्न दिसतो. एवढंच नव्हे तर या फुलामध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. हे घटक चेहऱ्यावरील जखम, त्याचे व्रण कमी करण्यास मदत करतात.

​गुलाबाच्या पाकळ्यांपासून क्रीम तयार करण्याची पद्धत

साहित्य :-

  • एक कप गुलाबाच्या पाकळ्या
  •  एक चमचा कोरफड जेल 
  • अर्धा चमचा ग्लिसरीन

सर्व प्रथम गुलाबाच्या पाकळ्या स्वच्छ धुऊन घ्या आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याची बारीक पेस्ट तयार करा. यानंतर एका वाटीमध्ये ही पेस्ट काढून घ्या. त्यामध्ये कोरफड आणि ग्लिसरीन मिक्स करा. सर्व सामग्री चांगल्या पद्धतीने एकजीव करून घ्या. यानंतर ही क्रीम एका काचेच्या डबीमध्ये भरून ठेवा. गुलाबाच्या पाकळ्यांपासून तुमची मसाजिंग क्रीम तयार झाली आहे.

​क्रीमचा कसा करायचा वापर?

या मसाजिंग क्रीमचा तुम्ही सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी वापर करू शकता. चेहरा पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या. यानंतर आपल्या हातावर थोडेसे क्रीम घेऊन चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. क्रीम लावल्यानंतर अंदाजे १० मिनिटांसाठी चेहऱ्याचा हलक्या हाताने मसाज करावा. त्वचा रगडू नये.

​गुलाबाच्या फुलाचे त्वचेसाठी होणारे फायदे

अँटी ऑक्सिडेंट

आपल्या त्वचेला अँटी ऑक्सिडेंटचा पुरवठा होणे किती महत्त्वाचे आहे, हे आपणा सर्वांनाच माहिती आहे. गुलाबाच्या फुलातील अँटी ऑक्सिडेंटमुळे त्वचेच्या पेशी मजबूत होण्यास मदत मिळते. ज्यामुळे आपली त्वचा नैसर्गिक स्वरुपात दुरुस्त होते. त्वचेवर जमा झालेले धूळ, मातीचे कण दूर करण्याचे कार्य अँटी ऑक्सिडेंट करतात. यामुळे आपल्या चेहऱ्याला अँटी एजिंग लाभ देखील मिळतात.

​​त्वचेमध्ये ओलावा टिकून राहतो

गुलाबाचे फुल सर्व प्रकारच्या त्वचेसाठी लाभदायक मानले जाते. विशेषतः कोरड्या त्वचेसाठी हे फुल लाभदायक आहे. यातील गुणधर्म आपली त्वचा मॉइश्चराइझ ठेवते आणि त्वचेवर येणारी खाज देखील कमी करण्याचे कार्य करते.

सुरकुत्या कमी करण्यासाठी

अँटी ऑक्सिडेंट व्यतिरिक्त गुलाबाच्या फुलामध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी चेही गुणधर्म आहेत. हे घटक चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यास मदत करतात. शिवाय चेहऱ्यावरील डाग कमी होतात आणि कोलेजन देखील वाढते.

​त्वचेवरील दुर्गंध आणि अतिरिक्त तेल करते कमी

तेलकट त्वचेची समस्या असल्यास वारंवार चेहरा स्वच्छ करावा लागतो. चेहऱ्यावरील चिकटपणा कमी करण्यासाठी तुम्ही गुलाब पाण्याचा वापर करू शकता. यामुळे चेहऱ्यावर अति प्रमाणात होणाऱ्या तेलाचा स्त्राव नियंत्रणात येण्यास मदत मिळते. यातील घटक त्वचेतील पाण्याची पातळी वाढवतात. अशा पद्धतीने गुलाबाच्या फुलाचा तुम्ही ब्युटी केअर रुटीनमध्ये वापर करू शकता.

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News