पुरंदर आणि वज्रगड जरी एकाच डोंगर सोंडेवर वसलेले असले तरी ते दोन स्वतंत्र किल्ले आहेत.
पुरंदर किल्ल्याला ३ माच्या (उत्तर, दक्षिण, बावची माची) आहेत. पुरंदरचा बालेकिल्ला ३ भागात (पूर्वेस कंदकडा, मध्यभागी राजगादी, पश्चिमेस केदारेश्वर) विभागलेला आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी नारायणपेठ गावातून डांबरी रस्ता आणि पायवाट आहे. डांबरी रस्त्याने आपण सैन्याने बनविलेल्या मुरारगेट या दरवाजापाशी पोहोचतो. तर पायवाटेने गडावर आल्यास आपण बिनी दरवाजापाशी पोहोचतो. दोन्ही मार्गाने गडावर प्रवेश केल्यास आपण पुरंदरच्या उत्तरेकडील माचीवर पोहोचतो. ही माची मुरारगेट ते भैरवखिंड अशी पसरलेली आहे. तर दक्षिणेकडील माची भैरवखिंड ते केदार दरवाजा अशी पसरलेली आहे. तर दक्षिणेकडील माची भैरवखिंड ते केदार दरवाजा अशी पसरलेली आहे. याखेरीज फत्ते बुरूजाखाली (केदार दरवाजाच्या पुढे खालच्या बाजूस) असलेल्या माचीस बावची माची म्हणतात.
मुरारगेटने किल्ल्यावर प्रवेश केल्यावर प्रथम “पद्मावती तळे” पाहायला मिळते. त्याच्या पुढे इंग्रजांच्या काळात बांधलेले चर्च आहे. चर्च वरून पुढे गेल्यावर “वीर मुरारबाजीचा पुतळा” आहे. (बिनीदरवाजातून किल्ल्यात प्रवेश केल्यास उजवीकडे गेल्यावर वीर मुरारबाजीचा पुतळा दिसतो.) इ. स. १९७० मध्ये हा पुतळा उभा केला आहे. पुतळच्या पुढे दुसरे चर्च आहे. चर्चच्या पुढे बिनी दरवाजा आहे.
बिनी दरवाजा :-
पुरंदर उत्तर माचीवरील हा एकमेव दरवाजा आहे. आपण नारायणपूर गावातून किल्ल्यावर जातांना हा दरवाजा लागतो. दरवाजा आजही चांगल्या स्थितीत आहे. आत पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. समोरच पुरंदरचा कंदकडा आपले लक्ष वेधून घेतो. दरवाज्यातून आत शिरल्यावर दोन रस्ते लागतात, एक सरळ पुढे पुरंदरेश्र्वर मंदिर, वज्रगडाकडे जातो, तर दुसरा रस्ता उजवीकडे वळून मुरारबाजी पुतळा, मुरारगेट कडे जातो.
आपण सरळ रस्त्याने थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे महादेवाचे मंदिर दिसते. पुढे थोड्याच अंतरावर ‘पुरंदरेश्र्वर’ मंदिर आहे. या मंदिराबाहेर एक चौकोनी विहिर आहे, तिला “मसणी विहीर” म्हणतात. या मंदिराजवळच कॅन्टीन आहे.
पुरंदरेश्र्वर मंदिर :-
हेमाडपंथी धाटणीचे हे महादेवाचे मंदिर आहे. थोरल्या बाजीरावाने या मंदिराचा जीर्णोध्दार केला होता. मंदिरात इंद्राची सव्वा ते दीड फूटाची मूर्ती आहे. पुरंदरेश्र्वर मंदिराच्या मागील कोपऱ्यात पेशवे घराण्याचे रामेश्र्वर मंदिर आहे. हे पेशव्यांचे खाजगी मंदिर होते.
राजाळे तलाव आणि भैरवखिंड :-
पुरंदरेश्र्वर मंदिरापासून पुढे चालत गेल्यावर उत्तर माचीच्या टोकावर राजाळे तलाव आहे. सध्या पुरंदरमाचीवर याच तलावाचे पाणी वापरले जाते. या तलावाच्या पुढे पुरंदर आणि वज्रगड यांच्या मधील भैरवखिंड आहे. याच खिंडीतून वज्रगडावर जाण्यासाठी वाट आहे. याच खिंडीत शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. या खिंडीपर्यंत गाडी रस्ता आलेला आहे. या ठिकाणी भारतीय सैन्याची ठाणी असल्यामुळे भैरवखिंड आणि वज्रगडावर जाता येत नाही.
पेशव्यांचा वाडा (सवाई माधवरावांचे जन्मस्थान) :-
पुरंदेश्र्वर मंदिराच्या वरच्या बाजूला पेशव्यांच्या दुमजली वाड्यांचे अवशेष दिसतात. पेशवाईच्या आरंभी बाळाजी विश्र्वनाथाने हा वाडा बांधला होता. या वाड्यातच सवाई माधवरावांचा जन्म झाला. वाड्याच्या मागे विहीर आहे. आजही ती सुस्थितीत आहे. येथून थोडे पुढे गेल्यावर दोन वाटा लागतात. एक वाट बालेकिल्ल्याच्या दिशेने वर जाते तर दुसरी खाली भैरवखिंडीच्या दिशेने जाते. बालेकिल्ल्याच्या दिशेने या वाटेने वर जातांना एक सुकलेले टाक पाहायला मिळते. या वाटेने १५ मिनिटातच आपण दिल्ली दरवाजापाशी पोहोचतो.
दिल्ली (सर) दरवाजा आणि गणेश दरवाजा :-
हा उत्तराभिमुख दरवाजा आहे. दरवाज्याच्या वळणावर लक्ष्मी मातेची देवळी आणि हनुमानाची मुर्ती आहे. हा दरवाजा आणि त्याच्या बाजूचे बुरूज अजूनही सुस्थितीत आहे. या दरवाज्यातून आत गेल्यावर उजवीकडे आणखी एक दरवाजा दिसतो. त्याला “गणेश दरवाजा” म्हणतात. या दरवाजातून बाहेर पडल्यावर उजव्या बाजूस “बावटा बुरूज” आहे. येथे ध्वज लावला जात असे.
या दरवाजातून बाहेर पडल्यावर तीन वाटा फुटतात. समोरची वाट राजगादी, केदार दरवाजा आणि केदारेश्र्वर मंदिराकडे जाते. उजवीकडची वाट राजगादी उजवीकडे आणि माची डावीकडे ठेवत शेंदऱ्या बुरूजापर्यंत जाते. तिसरी वाट डावीकडे वळून दरवाजा संकुलाच्या वरून कंदकड्याकडे जाते. (सन २०१३ मध्ये कंदकड्याला जाणारी वाट भारतीय सैन्याने तारेचे कुंपण घालून बंद केलेली आहे.)
कंदकडा :-
दरवाज्यातून बाहेर येऊन डावीकडे गेल्यावर एक कडा थेट पूर्वेकडे गेलेला दिसतो, हाच तो कंदकडा. या कड्याच्या शेवटी कंदकडा बुरूज आहे बुरूजा जवळ एक आणि वाटेवर एक अशी पाण्याची दोन टाकी आहेत. कंदकडा बुरूजावरून भैरवखिंड आणि वज्रगड व्यवस्थित पाहाता येतात.
कंदकडा पाहून परत दरवाज्यापाशी यावे येथून उजवीकडे जाणारी वाट पकडावी, ही वाट राजगादी उजवीकडे आणि माची डावीकडे ठेवत शेंदऱ्या बुरूजापर्यंत जाते.
शेंदऱ्या बुरूज आणि बोर टाक :-
पद्मावती तळ्याच्या मागे वरच्या बाजूस, बालेकिल्ल्याच्या वायव्येस, तटबंदीच्या बरोबरीने एक बुरूज बांधलेला आहे, त्याचे नाव शेंदऱ्या बुरूज. शेंदऱ्या बुरूज बांधताना तो सारखा ढासळत होता, तेव्हा बहिरनाक सोननाक याने आपला पुत्र नाथनाक आणि सून देवकाई अशी दोन मुले त्यात गाडण्यासाठी दिली, त्यांचा बळी घेतल्यावरच हा बुरूज उभा राहिला अशी कथा आहे. या बुरूजाच्या पुढे एक कड्याच्या टोकाला एक पाण्याचे टाक आहे त्याला बोर टाक म्हणतात. येथून समोरच्या टेकडीवरील केदारेश्र्वर मंदिर दिसते.
राजगादी :-
शेंदऱ्या बुरूज आणि बोर टाक पाहून परत दरवाज्यापाशी यावे. येथून समोर जाणारी वाट पकडावी. या वाटेवर काही वास्तूंचे चौथरे आणि दोन पाण्याची टाकं पाहायला मिळतात. पुढे या वाटेला दोन फाटे फुटतात. एक समोरच्या टेकडीवरील राजगादीवर जाते, तर दुसरी राजगादीला वळस घाकून केदारेश्र्वर मंदिराकडे जाते. आपण प्रथम समोरच्या टेकडीवर (राजगादी) जाणाऱ्या वाटेने वर चढावे. येथे पडक्या जोत्यांचे अवशेष आहेत. थोडे पुढे गेल्यावर दारू खान्याची वास्तू आहे. थोडे वर चढून गेल्यावर आपण राजगादी टेकडीच्या सर्वोच्चा माथ्यावर येतो. येथे उजव्या बाजूला तटबंदी आहे. या तटबंदीच्या केदारेश्र्वरकडील टोकावर तटबंदीत बांधलेले शौचालय आहे. हे सर्व पाहून पुन्हा आल्या वाटेने खाली उतरून राजगादीची टेकडी उजवीकडे आणि दरी डावीकडे ठेऊन केदारेश्र्वर मंदिराच्या दिशेने जावे.
केदार दरवाजा :-
या वाटेवरून पुढे गेल्यावर एकाखाली एक असलेली पाण्याची टाकी लागतात. पुढे एक वाट डावीकडे खाली गेली आहे. या वाटेवरून १० मिनिटे चालत गेल्यावर केदार दरवाजा लागतो. या वाटेवर वरच्या बाजूस दोन पाण्याची टाकी आङेत. केदार दरवाजाच्या खालच्या बाजूस बावची माची आहे..(सन २०१३ मध्ये केदार दरवाजा आणि बावची माचीला जाणारी वाट सैन्याने तारेचे कुंपण घालून बंद केलेली आहे.) या दरवाच्या वरच्या बाजूस “फत्ते बुरूज” आहे.
केदारेश्र्वर :-
केदार दरवाजा पाहून आपण आपल्या मूळ वाटेला लागून १५ मिनिटे चालून गेल्यावर राजगादी आणि केदारेश्र्वर मंदिर यांच्या मधील खिंडीत येतो. केदारेश्र्वर मंदिरात जाण्यासाठी दगडी जीना बांधलेला आहे. या रूंद जिन्याने आपण थेट केदारेश्र्वराच्या मंदिरापाशी पोहोचतो. पुरंदरचे मूळ दैवत म्हणजे केदारेश्र्वर. या मंदिराच्या जीर्णोध्दार केलेला आहे. महाशिवरात्रीला हजारो भाविक याच्या दर्शनाला येतात.
मंदिराच्या समोरच एक दगडी दीपमाळ आहे. सभोवती दगडी फरसबंदी आहे. केदारेश्र्वराचे मंदिर किल्ल्यावरील अत्युच्च टोकावर आहे. येथून राजगड, तोरणा, सिंहगड, रायरेश्र्वर, रोहीडा, मल्हारगड, कहेपठार हा सर्व परिसर दिसतो. या केदार टेकडीच्या मागे एक बुरूज आहे. त्याला “कोकण्या बुरूज” असे नाव आहे. केदारेश्र्वर मंदिराजवळ केदारगंगेचा उगम होतो.
संपूर्ण गड फिरण्यास एक दिवस लागतो. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या नारायणपूर गावात नारायणेश्र्वराच प्राचीन देऊळ पाहाण्यासारख आहे.