केंजळगड हा तब्ब्ल सव्वाचार हजार फूट उंचीवर असलेला रांगडा किल्ला. हा दुर्ग वाई आणि रायरेश्वर दरम्यानच्या महादेव डोगररांगाच्या एका उत्तुंग नाकाडावर उभारलेला आहे. रोहिड्याची डोगररांग उतरताना नेऋत्य दिशेला लांबवर एका भल्या मोठया पहाडाच्या डोक्यावर गांधी टोपीच्या आकाराचा केंजळगड अधून मधून दर्शन देत असतो. केळंजा व मोहनगड ही केंजळ्गडाचीच उपनावे आहेत.

बाराव्या शतकात भोजराजाने केंजळगडची निर्मिती केली. इ.स. १६४८मध्ये हा किल्ला आदिलशाच्या अधिपत्याखाली आला. सन १६७४ साली शिवरायांचा मुक्काम चिपळूण शहरात पडला होता. वाई आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्व किल्ले शिवरायांच्या ताब्यात आले होते.

मात्र केंजळगड अजून त्याच्या ताब्यात आला नव्हता, म्हणून शिवाजी महाराजांनी केंजळगड घेण्यसाठी आपल्या मराठी फौजा पाठवल्या. गंगाजी विश्वासराव किरदत हा या किल्ल्याचा किल्लेदार होता, त्याने मराठ्यांना चोख प्रत्युत्तर दिले; पण मराठ्यांकडून तो मारला गेला आणि २४ एप्रिल १६७४ रोजी किल्ला मराठयांनी जिंकला. पुढे १७०१ साली हा गड औरंगजेबाकडे गेला. मात्र लगेच एक वर्षाने म्हणजे १७०२ साली परत केंजळगड मराठयांच्या ताब्यात आला. २६ मार्च १८१८ साली ब्रिटिश अधिकारी जनरल प्रिझलर याने दुर्गाचा ताबा घेतला.

गडाचा घेर हा लंबवतळकर आणि छोटाच आहे. चारही बाजूनी उभे ताशीव कातळ कडे आहेत. काही ठिकाणी मजबूत अशी तटबंदी आढळते. एक पडझड झालेला बुरुजही आहे. एक सुकलेले टाके तसेच काही इमारतीचे भग्नावशेषही आढळतात. येथेच वरच्या अंगास एक चुन्याचा घाणा आहे. पुढे एक चागली मजबूत अशी इमारत आढळते साधारण कोठारासारखी तिची रचना आहे. काही कागदपत्रांच्या उल्लेखानुसार हे दारूचे कोठार असावे. येथून पुढे रायरेश्वरच्या दिशेने ओसाड माळ आहे.

कोठारापासून दुसऱ्या दिशेने चालत गेले असता आणखी एक चुन्याचा घाणा आढळतो. दोन चुण्याचे घाणे असणे म्हणजे गडावर मोठया प्रमाणावर बाधकाम झालेले असले पाहिजे; पण गडमाथ्यावर सर्व बाजूला असलेल्या छातीपर्यंत वाढलेल्या गवतामुळे ही बांधकामे शोधणे कठीण होऊन बसते. या दुसऱ्या चुन्याच्या घाण्यामुळे काही अंतरावर एका जुन्या मंदिराचे अवशेष आहेत. छप्पर नसलेल्या या देवळात केंजाई देवीची मूर्ती आहे. इथल्या रांगडया निसर्गाला साजेश्या रांगड्या देवतांच्या इतरही काही मूर्ती आसपास आहेत.

केंजळगडाची ही डोंगररांग माथ्याकडे हिरवाईने नटलेली दिसते. पावसाच्या सिजननंतर नजीकच्या काळात आल्यास सारी धरणी हिरवाईने नटलेली दिसते. पावसाळा तसेच हिवाळ्याच्या दिवसात गडाला भेट दिल्यास सारी धरणी हिरव्या गवताने आच्छादलेली दिसते. अशा अमोघ सौंदर्याने नटलेला केंजळगड हा ट्रॅकिंगसाठी आर्कषक ठिकाण आहे, हे मात्र नक्की.
