हाय बीपीला... करू बाय बाय..!

शब्दांकन: विशाल पाटील
Monday, 3 June 2019
 • वाढलेला रक्‍तदाब कमी का करायचा? 
 • उच्च रक्‍तदाबाची लक्षणे 
 • रुग्णांच्या गमतीशीर प्रतिक्रिया 
 • उच्च रक्‍तदाबामधील तपासण्या 
 • उच्च रक्‍तदाबावरील उपचार 
 • रक्‍तदाब कमी करणारी औषधे-विविध प्रश्‍न ?
 • उच्च रक्‍तदाब - हिमनगाचे टोक?  
 • उच्च रक्‍तदाबाचे प्रकार, कारणे 
   

आपले हृदय हे शरीराला रक्‍तपुरवठा व त्याद्वारे ऑक्‍सिजन पोचवणारा एक पंप असतो. प्रत्येक ठोक्‍याला हृदयातून शरीरामध्ये रक्‍त फेकले जाते. अवयवांच्या चांगल्या कार्यक्षमतेसाठी हा रक्‍तपुरवठा एक विशिष्ट सामान्य दाबामध्ये पोचणे गरजेचे असते. हा दाब काही कारणांमुळे कमी झाला तर हे अवयव चांगले काम करू शकत नाहीत आणि हा दाब प्रमाणाबाहेर असेल तरीही हे त्या अवयवांसाठी घातक ठरू शकते. 

कित्येक दशकांच्या संशोधनानंतर 2018 मध्ये हा दाब 130/80 च्या आसपास किंवा कमी असावा, असे स्पष्ट झाले. उच्च रक्‍तदाब 140/90 पेक्षा जास्त असल्यास त्याला "हायपरटेन्शन' म्हणतात व 90/70 पेक्षा कमी असल्यास त्याला कमी रक्‍तदाब (हायपोटेन्शन) म्हणतात. या दोन्हीही अवस्था आजाराच्या नसल्या तरी, आजाराकडे नेणाऱ्या मानल्या जातात. 

वाढलेला रक्‍तदाब कमी का करायचा? 
रक्‍तदाब उदा. 160/100 पेक्षा जास्त वाढला की शरीरातील महत्त्वाचे अवयव बाधित होतात. रक्‍तवाहिन्यांवर ताण येऊन डोळे, मेंदू, मूत्रपिंड आणि हृदय या अवयवांना बाधा होते. डोळ्यांचा पडदा (रेटिना) खराब होऊन दृष्टिहीनता येऊ शकते. मेंदूमधील रक्‍तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होणे किंवा रक्‍तवाहिन्या फुटणे यामुळे अर्धांगवायू होऊ शकतो. मूत्रपिंडे निकामी होतात आणि हृदयावर सूज येऊन त्याची कार्यक्षमता कमी होते. ज्याला "हार्ट फेल' होणे असे म्हणतात. या सर्व गुंतागुंतीमध्ये मृत्यूची शक्‍यता फार जास्त असते आणि हाच वाढलेला रक्‍तदाब जर 20 "मिमी'ने योग्य वेळी कमी केला तर या धोक्‍याची शक्‍यता कमी होऊ शकते. 

उच्च रक्‍तदाबाची लक्षणे 
90 टक्के रुग्णांमध्ये कसलीच लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे बऱ्याचदा उच्च रक्‍तदाबाला "सायलेंट किलर' समजले जाते. उर्वरित व्यक्‍तींमध्ये काही लहान-सहान लक्षणे आढळतात. डोकेदुखी, चक्‍कर, चिडचिड, झोप न लागणे, एकाग्रतेचा अभाव आदी. अशावेळी रक्‍तदाब तपासणे गरजेचे असते. उच्च रक्‍तदाब असणाऱ्या व्यक्‍तींचे प्रमाण जवळजवळ दर चार व्यक्‍तीपैंकी एकास म्हणजे 25 टक्के इतके जास्त आहे. शहरीकरणाचा प्रभाव या संख्येवर दिसून येतो आणि जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतामध्ये याचे प्रमाण खूप जास्त आहे. 

रुग्णांच्या गमतीशीर प्रतिक्रिया 
एखाद्या व्यक्‍तीला जर तुझे जास्त ब्लडप्रेशर आहे, असे सांगितले तर त्यांच्या प्रतिक्रिया फार गमतीदार असतात. 

 •  स्वीकारण्यासाठी नकार : मला बी.पी. असणे शक्‍य नाही. कारण घरात कुणालाच नाही, मला कसलाही त्रास नाही, मी व्यायाम करतो, व्यसन नाही आदी. 
 •  गांभीर्य नसणे/ बेफिकिरी : माझा बी.पी. जास्त आहे? असू दे ना. काही होत नाही. माझ्या खूप मित्रांना आहे. थोडे कामाचे टेन्शन आहे, होईल नॉर्मल काही दिवसांत. 
 •  नैराश्‍य/ भीती : मी कधीच व्यसन केले नाही, रोज व्यायाम करतो, ड्रिंक्‍सला शिवले नाही, खाण्याची काळजी घेतो तरीही मला हाय बी.पी.? माझे नशीबच खराब. आता माझे काय होणार? 

उच्च रक्‍तदाबामधील तपासण्या 
रक्‍तदाब नियमित मोजण्याबरोबर काही तपासण्या आवश्‍यक असतात. (उदा. रक्‍तातील साखरेचे, चरबीचे प्रमाण, हृदयासाठी ईसीजी व एकोकार्डिओग्राफी, किडनीसाठी - लघवी व युरिया/ क्रिऍटिनीन आणि नियमित डोळे तपासणी) या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. 

उच्च रक्‍तदाबावरील उपचार 
उच्च रक्‍तदाब जर काठावरील असेल तर जीवनशैलीतील योग्य बदलांच्या मदतीने यावर थोड्या फार प्रमाणात नियंत्रण शक्‍य आहे. पाच ते 10 मिलिमीटरने तो नक्‍की कमी होऊ शकतो. 
1) आहारातील बदल- मिठाचे कमी प्रमाणात सेवन केल्यास, जंकफूड टाळल्यास, मद्यपान कमी केल्यास रक्‍तदाब नक्‍की कमी होतो. 
2) वजन कमी करणे- आपल्या उंचीच्या प्रमाणात वाढलेले वजन कमी केल्यास वाढलेला रक्‍तदाब नक्‍की कमी होईल. 
3) व्यायामामध्ये एरोबिक व्यायाम प्रकार करावेत. उदा. भरभर चालणे, जॉगिंग, सायकल चालवणे, पोहणे या गोष्टी कराव्यात. जोर, बैठका किंवा वजन उचलण्याचे व्यायाम मात्र शक्‍यतो टाळलेले चांगले. 
4) मानसिक स्वास्थ्यासाठी : योगा, प्राणायाम किंवा ध्यानधारणा यामुळेही रक्‍तदाब कमी होण्यास मदत होते. 

रक्‍तदाब कमी करणारी औषधे-विविध प्रश्‍न ? 
सर्व प्रकारच्या जीवन शैलीतील बदल करूनही रक्‍तदाब नियंत्रणात येत नसेल तर तज्ज्ञ डॉक्‍टरांकडून औषधे घेण्याला दुसरा कुठलाच पर्याय नसतो. एकदा गोळी सुरू झाली की आपले आयुष्य संपले अशा टेन्शनची भर पाडून हायपर टेन्शन वाढवू नये. कुठल्याही कारणाशिवाय असणारा उच्च रक्‍तदाब नियंत्रणासाठी आयुष्यभर औषधे घ्यावी लागतात. ते उगाचच टाळण्याचा प्रयत्न करू नये. एकदा औषध सुरू झाले की ते बंद होणारच नाही, हे सर्वांसाठी लागू नाही. काही रुग्णांमध्ये डॉक्‍टरांच्या सल्ल्याने डोस कमी करता येतो किंवा बंदही होऊ शकतो. 

उच्च रक्‍तदाब - हिमनगाचे टोक? 
आज भारतामध्ये जितक्‍या लोकांना उच्च रक्‍तदाब आहे, त्यापैकी फक्‍त 25 टक्के लोकांनाच तो असण्याची जाणीव आहे. त्यापैकी फक्‍त 25 टक्के लोकच उपचार नीट घेतात आणि त्यातीलही फक्‍त 25 टक्के लोकांचा रक्‍तदाब योग्य नियंत्रणात आहे. खरे तर ही खूप गंभीर परिस्थिती आहे. अगदी सहजपणे नियंत्रणात येऊ शकणारी गोष्ट केवळ अज्ञान, भीती, बेफिकिरी व गैरसमजांमुळे योग्य नियंत्रणात येत नाही. समाजाच्या निरोगी व सुंदर आरोग्यासाठी उच्च रक्‍तदाबावर नियंत्रण मिळवणे खूप गरजेचे आहे आणि खरंच सांगतो ही लढाई तेवढी अवघड नाही. नियमितपणे आपला रक्‍तदाब तपासणे ही या लढाईतील पहिली पायरी आहे. कोणताही बाऊ न करता, टेन्शन न घेता हायपरटेन्शनवर मात सहज शक्‍य आहे. 

उच्च रक्‍तदाबाचे प्रकार, कारणे 
1) प्रायमरी हायपरटेन्शन- 

बहुतांशी लोकांमध्ये उच्च रक्‍तदाबासाठी कोणतेच प्रत्यक्ष व मोठे कारण नसते. फक्‍त अनुवांशिकतेमुळे उच्च रक्‍तदाब पुढील पिढ्यांमध्ये संक्रमित होत असतो. साधारणपणे वयाच्या चाळिशीमध्ये याची सुरवात होत असते. मात्र, हल्ली 30 किंवा 35 वयातच याची सुरवात होताना दिसते. तपासण्यांमध्ये कोणतेच कारण सापडत नाही. मात्र, जीवनशैलीतील काही घटकांमुळे उच्च रक्‍तदाब लवकर सुरू होऊ शकतो. 

काय आहेत ही कारणे? 
आहारामध्ये मिठाचे अतिसेवन, जास्त प्रमाणात मांसाहार, फळे व पालेभाज्यांचा अभाव, जंकफूड्‌सचा जास्त वापर. 
व्यायामाचा अभाव व स्थूलता. व्यसनाधिनता- धूम्रपान, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन, अति प्रमाणामध्ये मद्यपान. 
मानसिक ताणतणाव- मोठ्या प्रमाणात मानसिक ताणतणाव असणाऱ्या व्यक्‍तींमध्ये बऱ्याचदा उच्च रक्‍तदाबाचा धोका जास्त आढळतो. अनुवांशिकतेच्या जोडीला चुकीची जीवनशैली असेल तर उच्च रक्‍तदाब लवकर सुरू होतो. 

2) सेकंडरी हायपरटेन्शन - 
यामध्ये शरीरातील काही अवयवांतील संरचना किंवा कार्यक्षमतेमधील बिघाडांमुळे उच्च रक्‍तदाब आढळतो. (उदा. किडनीचे विकार किंवा रक्‍तवाहिनी चिकटलेली असणे- काही ग्रंथींचे विकार- थायरॉईड किंवा ऍडरिनल ग्रंथींचे विकार, हृदयाच्या महाधमनीचे विकार किंवा मधुमेह इत्यादी.) या प्रकारच्या रुग्णांचे प्रमाण अतिशय कमी असते. तरुण वयामध्ये जर रक्‍तदाब खूप जास्त राहात असेल किंवा औषधे घेऊनही रक्‍तदाब नियंत्रणात येत नसेल तर मात्र कारणे शोधणे महत्त्वाचे ठरते. 

गेल्या शतकापासून एक मोठे संकट उभे राहिले आहे, ते म्हणजे जीवनशैलीतील बदलांमुळे होणारे आजार व त्यामुळे वाढते मृत्यू. यामध्ये प्रामुख्याने हृदयविकार, अर्धांगवायू, मधुमेह, स्थूलता आणि उच्च रक्‍तदाबासारखे प्रकार येतात. हृदयरोग किंवा मधुमेहासारख्या विकारांबद्दल हल्ली थोडे तरी गांभीर्य वाढलेय; परंतु उच्च रक्‍तदाबाबद्दल (हायपरटेन्शन) अजूनही बरेचसे गैरसमज आणि गोंधळाची परिस्थिती आहे. उच्च रक्‍तदाब असणाऱ्या व्यक्‍तींचे प्रमाण जवळजवळ दर चार व्यक्‍तींपैकी एकास (25 टक्के) इतके जास्त आहे. 

- डॉ. सोमनाथ साबळे, सातारा 
एम. डी. (मेडिसीन), डीएनबी (कार्डिओलॉजी)  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News