या आहेत ‘एनआयडी’ मधील संधी

हेमचंद्र शिंदे, करिअर मार्गदर्शक
Wednesday, 11 September 2019
  • ज्यांना डिझाईन, फॅशन टेक्नॉल़ॉजी क्षेत्रात काम करायचे असेल तर नजरेसमोर नामांकित अशा ‘एनआयडी’, ‘एनआयएफटी’मधील प्रवेशाचे ध्येय असायला हवे.

देशातील डिझायनर क्षेत्रातील नामांकित अशा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन (एनआयडी) अहमदाबाद, गांधीनगर, बंगळूर, कुरुक्षेत्र (हरियाना), भोपाळ, जोरहाट (आसाम) आणि विजयवाडा या संस्थांची स्थापना केंद्र सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने केली. या स्वायत्त संस्थांना वैधानिक दर्जा आहे. ‘एनआयडी’तर्फे बॅचलर ऑफ डिझाईन, मास्टर ऑफ डिझाईन आणि ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डिझाईन प्रोग्राम हे अभ्यासक्रम राबविण्यात येतात.

बॅचलर ऑफ डिझाईन -

चार वर्षे कालावधीचा हा पदवी अभ्यासक्रम फक्त ‘एनआयडी’ अहमदाबाद (१०० जागा) येथे उपलब्ध आहे. इंडस्ट्रिअल डिझाईनअंतर्गत सिरॅमिक अॅण्ड ग्लास डिझाईन (१० जागा), फर्निचर अॅण्ड इंटेरिअर (१० जागा), प्रॉडक्शन डिझाईन (१५ जागा) उपलब्ध आहेत. कम्युनिकेशन डिझाईन अंतर्गत अॅनिमेशन फिल्म डिझाईन (१५ जागा), एक्झिबिशन डिझाईन (१० जागा), फिल्म अॅण्ड व्हिडिओ कम्युनिकेशन (१० जागा) व ग्राफिक डिझाईन (१५ जागा) उपलब्ध आहेत. टेक्सटाईल डिझाईन, अॅपरल लाइफस्टाइल अॅण्ड अॅक्सेसरीज डिझाईन अंतर्गत ‘टेक्सटाईल डिझाईन’साठी १५ जागा उपलब्ध आहेत.

जीडीपीडी ग्रॅज्युएट डिप्लोमा प्रोग्रामिंग डिझाईन हा चार वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम एनआयडी विजयवाडा, कुरुक्षेत्र, भोपाळ व जोरहाट या ठिकाणी उपलब्ध असून, प्रत्येक ठिकाणी इंडस्ट्रिअल डिझाईन २० जागा, कम्युनिकेशन डिझाईन २० जागा व टेक्सटाईल डिझाईन २० जागा अशा ६० जागा उपलब्ध आहेत.

प्रवेशासाठीची पात्रता परीक्षा - 

सर्व एनआयडीमधील वरील अभ्यासक्रमासाठी डीएटी - डिझाईन अॅप्टिट्यूड टेस्ट परीक्षा राष्ट्रीय स्तरावर दोन टप्प्यांत आयोजित केली जाते. 
भाग -१: पूर्वपरीक्षा ही ३ तास कालावधीची एकूण १०० गुणांची असते. त्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह व सब्जेक्टिव्ह प्रश्‍न असतात. यामधून विश्‍लेषण क्षमता, व्हिज्युएलायझेशन, सर्जनशीलता तपासली जाते. नमुना प्रश्‍नपत्रिका संकेतस्थळावर उपलब्ध आहे. परीक्षा केंद्रात मुंबई शहराचा समावेश आहे. 

भाग-२: मुख्य परीक्षा ही पहिल्या परीक्षेतून निवडलेल्या विद्यार्थ्यांसाठी असते. मुख्य परीक्षा दोन दिवसांत घेतली जाते. स्टुडिओ सेटअपमधील मल्टिपल स्वरूपात चाचण्या, ‘एनआयडी’ संस्थेतच घेतल्या जातात. पूर्वपरीक्षा ३० टक्के व मुख्य परीक्षा ७० टक्के असे भारांकन देऊन अंतिम निवड यादी जाहीर केली जाते.

शैक्षणिक पात्रता - 

वरील दोन्ही अभ्यासक्रमांसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाकडून विज्ञान, कला, वाणिज्य या कोणत्याही शाखेतून बारावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 

वेळापत्रक व अर्ज - 

ऑनलाईन अर्ज दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात www.admissions.nid.edu संकेतस्थळावर उपलब्ध होतात. देशभरात पूर्वपरीक्षा जानेवारीत घेतली जाते. तिचा निकाल मार्चमध्ये जाहीर होतो व त्यानंतर मुख्य परीक्षा मे महिन्यात घेतली जाते. अभियांत्रिकी करिअर म्हटले, की ‘आयआयटी’, ‘एनआयटी’, तर मेडिकल म्हटले, की ‘एम्स’मधील प्रवेशाचे प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वप्न असते. ज्यांना डिझाईन, फॅशन टेक्नॉल़ॉजी क्षेत्रात काम करायचे असेल तर नजरेसमोर नामांकित अशा ‘एनआयडी’, ‘एनआयएफटी’मधील प्रवेशाचे ध्येय असायला हवे. नवनिर्मितीचा ध्यास असणाऱ्यांना, रचनात्मक कल्पकतेला वाव असणाऱ्या या क्षेत्रात अमाप संधी आहेत. याच शाखेतील मास्टर ऑफ डिझाईन पदव्युत्तर अभ्यासक्रम ‘एनआयडी’, ‘एनआयएफटी’मध्ये उपलब्ध असून, त्यानंतर जागतिक स्तरावर करिअरची संधी उपलब्ध होते. लक्षात ठेवा, याच क्षेत्रातील आपल्या अवतीभोवती दोन, सहा महिने कालावधीची अनेक खासगी कोर्सेस उपलब्ध आहेत. परंतु, त्यामधून आपल्या नावासमोर फक्त डिझायनर लावता येते. समाधान, यश मात्र मिळत नाही. म्हणूनच ज्यांना या क्षेत्रात करिअर करायचे असेल त्यांनी ‘एनआयडी’, ‘एनआयएफटी’चे ध्येय ठेवा.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News