तिचा तो शेवटचा मॅसेज आणि शेवटची भेट

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 5 June 2019

पलीकडून काहीच आवाज आला नाही तसा विराज थोडा बैचेन झाला. त्याला काव्याला शेवटच भेटायच होत,पण तिच्या मनात काहीतरी वेगळच होत.

"हैलो, ऐकतेस का
काव्या, प्लीज
तू बोलली नाहीस तरी चालेल पण निदान ऐक तरी..."

पलीकडून काहीच आवाज आला नाही तसा विराज थोडा बैचेन झाला. त्याला काव्याला शेवटच भेटायच होत,पण तिच्या मनात काहीतरी वेगळच होत. विराज काव्याच्या आठवणीत फार खचून गेला होता. भुतकाळातले सर्व क्षण त्याच्या डोळ्यासमोर नाचू लागले.

अवचित एका सकाळी विराजला ती भेटली. गोड गुलाबी ओठावरती नाजूक कळी उमललेली अन् पापण्याच्या तोरणामध्ये सारा निसर्ग सामावलेली. कानातले दोन नाजूकसे झुंबर तिच्या सुंदर चेहऱ्याला पहारा देत होते.

केसात माळलेला मोगऱ्याचा गजरा सुगंधाची उधळण करत होता.
तिच्या डोळ्यात एक अनामिक ओढ अन् ओठावर ओळखीच स्मितहास्य झळकत होत.काहीच न बोलता खूपकाही सांगणारा तिचा सुंदर चेहरा काळजात घर करत होता.

विराज भानावर आला आणि त्याने शेवटचा कॉल करायचा ठरवलं,
"हैलो,काव्या , तू बोलत का नाहीस,,,
पण प्लीज भेटायला ये.तु भेटायला आलीस तर पुन्हा नव्याने सुरूवात येईल. आणि नाही आलीस तर हा शेवटचा कॉल असेल.मी आणखी एक तास वाट पाहतो. ओके,बाय"

डोळ्यातले अश्रू लपवत काव्याने फोन ठेवला .आणि ती घराबाहेर पडली.तिने मनाशी ठरवलं विराजला भेटून समजावून सांगायच.आणि त्याच्या आयुष्यातून कायमच निघून जायचं.
तिने मॅसेज टाईप केला,मी येतेय.

"मी येतेय" विराजची मैसेजटोन वाजली.विराजने मैसेज पाहिला आणि त्याला पहिल्या मॅसेजची आठवण झाली. पहिल्या भेटीनंतर दोन दिवसांनी तिचा मॅसेज आला होता.दोन चांदण्याच्या मध्ये पाच शब्द "शुभसकाळ".असं वाटल कानात दोन नाजूकसे झुंबर घालून ती समोर उभी आहे.तिच्या एवढया शब्दाने विराजचा दिवस आनंदात गेला.

खरच काय जादू असते ,प्रेमाची,सौंदर्याची की शब्दांची.
विराज तिच्या सौंदर्याच्या आणि ती त्याच्या शब्दाच्या प्रेमात पडली होती.

विराज एक शब्दवेडा माणूस,त्याच्याच शब्दात सांगायचे तर,
"माझ्या शब्दांना काव्याची प्रेरणा मिळाली अन् कविता तयार होत गेली.तिची कविता,तिच्यासाठी कविता,जगण आणि मरण फक्त माझी कविता. ती वाचायची मला अन् माझ्या कवितेतल्या प्रत्येक शब्दाला अन् विचारायची न समजल्यागत, ही कविता कोणावर आहे.माझ्या निशब्द भावनातून तिला उत्तर मिळायचे.
तिचा माझ्यावर आणि माझ्या शब्दावर अधिकार होता.कारण तिच्याशिवाय शब्द अन् शब्दाशिवाय मी शक्यच नव्हतं.
मी तिला म्हणायचो,

"माझ्या प्रत्येक शब्दावर
अधिकार तुझाच आहे
ही भावनांची कहानी
प्रत्येक कविता तूच आहे."

काव्या कवितेपासून दूर गेली,पण विराजला कधी कळलेच नाही.
कोरडया आभाळाकडे नजर ठेवून विराज आता फक्त तिची वाट पाहत होता. अजून एक तास संपलेला नव्हता. म्हणून विराजच्या मनात आशा कायम होती. विराजला आनंद झाला,काव्या आली होती,कदाचित आता ही शेवटची भेट.

हातात लग्नाची पत्रिका ठेवत ती म्हणाली,"लग्नाला नाही आलास तरी चालेल,पण मला विसरुन जा" विराज थक्क झाला,तिच्या हाताच्या मेंहदीकडे पाहत म्हणाला,"व्यवहार छान जमतो तुला ,मला कधीच जमला नाही. मलाही मान्य आहे.शब्दाने पोट भरत नाही,भरतात फक्त मने.प्रत्येक प्रश्नाला माझ्याकडे उत्तर आहे पण तू कधी विचारलेच नाही.वाटल आता तरी विचारशील." स्वत:ला सावरत काव्याने विचारल, "काय विचारायच,संसार कसा करायचा,तुला नोकरी कधी लागणार,

संसार करण्यासाठी शब्द नाही पैसा लागतो रे, माझा निर्णय ठरलाय,त्यात बदल होणार नाही. तारुण्याच्या उंबरठयावर तुझ्या प्रेमात पडण्याची चूक माझ्याकडून झाली असेल पण लग्न करून मी पुन्हा चूक करणार नाही."

काव्याला सुखद धक्का देण्याचा विचार विराजचा होता,पण विराज निश्चल झाला. शब्दाचा किमयागार आज निशब्द झाला. व्यवहार आणि भावनेमध्ये व्यवहाराचा विजय झाला.विराजच्या मनात मात्र शब्द जमा होऊ लागले.त्याच्या मनात सहज विचार आला.
शब्दाने माणसे कोठे बांधता येतात ,बांधता येतात फक्त मने.
सकाळी उमललेल सुंदर फुल दुपारच्या तप्त उन्हात कोमजून गेलं,फुलांचे निखारे काळजात ठेवून जगताना आता भान ठेवावे लागणार. मोगऱ्याच्या सुंदर फुलावर भुलण्याचा गुन्हा आता करता येणार नाही. 

 विराजने मनातल्या विचाराला थांबवले,आणि त्याच्या काळजातून शब्द बाहेर पडले. "जिथे असशील तिथे सुखात रहा.तुझी परतण्याची मी वाट पाहणार नाही.कारण कोणत्याच स्वप्नात जगण्याचा अधिकार मला नाही.तो अधिकार तू हिरावून घेतलास.म्हणून पुन्हा एकदा स्वप्नाची होणारी राखरांगोळी मला पाहता येणार नाही."

काव्याला अखेरचा निरोप देताना विराजही व्यवहार शिकला .नोकरी लागल्याची आनंदाची बातमी काव्याला सांगितली असती तर विराजला गमावल्याच दुःख तिला आयुष्यभर सलल असतं.आणि काव्याला दुःखी करण्याचा विचार विराजच्या मनात नव्हता.कारण अजूनही प्रेमाच्या भावनेला व्यवहाराचा स्पर्श नव्हता.

काव्या पाठमोरी झाली तसे विराजच्या डोळ्यात अश्रु तरळले .आणि विराजच्या मनातल्या विचारांनी मात्र विराजचा ताबा घेतला. 'आयुष्याच्या पटलावर कित्येक माणसं भेटतात.पण विसरता येत नाही पहिल प्रेम अन् करता येत नाही शेवटच प्रेम.फुले फुलतात,मने भ्रमित होतात अन् प्रेमात पडतात. माझे पहिले प्रेम तू आहेस,कधीच विसरता येणार नाही,पण शेवटच प्रेम नाहीस .माझे शेवटचे प्रेम तू दिलेला व्यवहार आहे.म्हणून पुन्हा आता प्रेमात पडायची इच्छाच राहिली नाही. तुझ्या व्यवहाराला घेऊन सुखाने जगेल अन् माझे शेवटचे प्रेम शेवटचेच ठरेल.'

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News