दुसऱ्याला मदत केली तर आपल्याला कोणीतरी मदत करेल

डाॅ केशव वाळके
Monday, 28 September 2020

समाजातील रिसोर्स आणि गरजू यांच्यातील दुवा बनण्याचं काम एनएसएस करते. जर कोणी कोव्हिड पॉझिटिव्ह निघालं तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा त्यांना मदत करा. आपण कुणाला मदत केली तर आपल्याला कोणीतरी मदत करेल यावर विश्वास ठेवा.

ओळख एनएसएसचीः केशव वाळके, संचालक तथा कार्यक्रम समन्वयक, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

 

दुसऱ्याला मदत केली तर आपल्याला कोणीतरी मदत करेल

 

राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये (एनएसएस) गेल्या वीस ते बावीस वर्षांपासून सक्रीय असलेले डाॅ केशव वाळके हे मुळचे नागपूरचे. महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून नोकरीस असले तरी त्यांना समाजकार्यात मोठा रस आहे आणि विशेषतः मुलांसोबत काम करायला त्यांना खूप आवडतं त्यांच्या एनएसएसच्या कार्याचा आणि अनुभव वाळके सरांनी यिनबझसाठी सांगितला...

मी स्वतः जी लहानपाणी परिस्थिती पहिली ती खूप वेगळी होती. वडील गायी चारायचे आणि आई माती ओढायच्या कामाला जायची. आम्हाला कुणाची ना कुणाची मदत मिळत राहायची. आणि म्हणून कुठे तरी वाटायचे की आपण पण कुणाला तरी मदत केली पाहिजे. कारण आपण समाजाला काही देणं लागतो. या भावनेतून मी १८ वर्षांखालील मुलांसाठी इमर्जन्सी हेल्पलाईन सुरु केली. 

बालमजूर, आदिवासी मुलं यांच्यासोबत मी गेली अनेक वर्ष काम करत आहे. महाविद्यालयात शिकवत असताना लक्षात आलं की गावाकडील मुलं ७० ते ८० टक्के गुण घेऊन शहरात यायची. पण अकरावीत नापास होत. असं का होतंय याचा विचार केला. मग लक्षात आले की मुलं शासकीय वसतीगृहात राहायची. त्यांच्यात कॉन्फिडन्सची कमतरता असत. इथली लोकं माझ्या भाषेवर हसतील याची भीती, इंग्रजी बोलण्याची भीती, इतर गोष्टींची माहित नाही, संभाषण करताना त्यांना अडचणी येत होत्या. एकूण १२५ मुलांसोबत काम करायला सुरुवात केली. त्यातील ९८ टक्के आदिवासी मुलं होती. त्यांना प्रशिक्षण दिले.

सध्याच्या काळात ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन प्रकारे काम चालू आहे.ऑनलाईन माध्यमातून पोस्टर, मेसेजेस, व्हिडिओ यातून जनजागृती केली. एकूण २६८०० विद्यार्थी सभासद आहेत आणि त्यांच्या माध्यमातून नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया भागातील सहा लाख नागरिकांपर्यंत जनजागृतीचे कार्यक्रम पोहचवले. आरोग्यसेतू अॅप डाउनलोड करण्यासाठी सुमारे सव्वा लाख नागरिकांना मदत  केली.

दीड लाख मुलांना आॅनलाईन माध्यमातून मास्क बनवण्यास शिकवले. युनिसेफ आणि एनएसएसच्या स्वयंसेवकांनी मिळून ऑनलाईन वर्कशॉप घेतलं. विदर्भ पातळीवरील विद्यापीठांमधील एक हजार विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता. या कार्यशाळेमध्ये कोरोनाबाबत जनजागृती करण्यात आली.

ऑफलाईन पद्धतीमध्ये पोलीस मित्र म्हणून विद्यार्थ्यांनी काम केलं. हेल्थ सर्व्हेमध्ये शासकीय यंत्रणेसोबत आरोग्य दूत म्हणून काम केलं. यात दोन हजारहून अधिक जणांनी रक्तदान केले. या व्यतिरिक्त, औषधांचे व सॅनिटायझरचे वाटप, क्वाॅरंटाईन सेंटरमध्ये काम, मास्क बनवणे, स्थानिक प्रशासनासोबत धान्य वाटप आणि सोशल  डिस्टंसिंगसाठी लोकांना मदत केली.

कम्युनिटी किचन सुरु करून कामगारांना किंवा अडकलेल्या लोकांसाठी अशा एकूण सुमारे दीड हजार लोकांसाठी अन्न पुरविले. सुमारे ५० हजार लोकांपर्यंत आम्ही जेवण पोहोचवलं. साधारण चार जिल्हे मिळून दीड लाख लोकांपर्यंत एनएसएसचे कार्य पोचले.
एका आदिवासी गावामध्ये २३ कुटुंबियांना तीन महिने पुरेल एवढं धान्य आणि शासनाची मदत मिळवून दिली. कोव्हिड रुग्णालयातील ६० वर्ष वयापुढील नागरिक आणि विशेषतः ज्यांच्याकडे मोबाईल नाही किंवा तो वापरता येत नाही अशा लोकांना त्यांच्या  कुटुंबियांशी संपर्क साधून दिला. त्यांचा एकटेपणा दूर केला.

स्पिट फ्री इंडिया ही चळवळ चालू केली. विदर्भात थर्रा आणि तंबाकूचं प्रमाण जास्त आहे. ते खाऊन कुठेही थुंकल्यामुळे कोरोना पसरतो याची जनजागृती करण्यासाठी ही चळवळ सुरु केली. यात ५०००० लोकांनी शपथ घेतली की सार्वजनिक जागी थुंकणार नाही आणि स्वतः खाणार नाही.

समाजातील रिसोर्स आणि गरजू यांच्यातील दुवा बनण्याचं काम एनएसएस करते. जर कोणी कोव्हिड पॉझिटिव्ह निघालं तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा त्यांना मदत करा. आपण कुणाला मदत केली तर आपल्याला कोणीतरी मदत करेल यावर विश्वास ठेवा.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News