हजरजबाबी अन्‌ दिलखुलास कोल्हापूर!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 18 May 2019
  • कोल्हापूर म्हणजे म्हटले तर शहर आणि म्हटले तर एक मोठे खेडे
  • अर्थातच बदलत्या काळातही कोल्हापूरचा अस्सल बाज आजही कायम टिकून आहे.

कोल्हापूर म्हणजे म्हटले तर शहर आणि म्हटले तर एक मोठे खेडे. अर्थातच बदलत्या काळातही कोल्हापूरचा अस्सल बाज आजही कायम टिकून आहे. इथल्या भोवतालातला हजरजबाबीपणा आणि आभाळाएवढ्या माणसांच्या कर्तृत्वातूनच प्रेरणा मिळाली आणि एक विनोदी अभिनेता म्हणून नावारूपाला आलो...नितीन कुलकर्णी संवाद साधत असतात आणि त्यांचा एकूणच या क्षेत्रातील पंचवीस वर्षांचा प्रवास उलगडत जातो. कोल्हापूर म्हणजे कलारत्नांची खाण आहे. पण, साऱ्यांनी मिळून पुन्हा मराठी सिनेसृष्टीचा तो सुवर्णकाळ आणला पाहिजे, अशी अपेक्षाही ते व्यक्त करतात.  

श्री. कुलकर्णी करवीर तालुक्‍यातील कुडित्रे गावचे. वाणिज्य शाखेचे ते पदवीधर. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच विविध स्पर्धा, युवा महोत्सवातून त्यांचा प्रवास सुरू झाला आणि स्वतः लेखन केले पाहिजे, याची जाणीव होताच एकपात्री प्रयोग त्यांनी रंगमंचावर आणला. कलापथकांतूनही त्यांनी काम केले. भालचंद्र कुलकर्णी, यशवंत भालकर, भास्कर जाधव यांनी त्यांना चित्रपटात आणलं. आजवर ‘देखणी बायको नाम्याची’, ‘गाव एक नंबरी’, ‘राजा पंढरीचा’, ‘चल गंमत करू’, ‘आबा झिंदाबाद’, ‘सासूची माया’, ‘संभा’, ‘रामदेव आले रे बाबा’, ‘रिकामटेकडे’, ‘कोणी मुलगी देते का मुलगी’, ‘पकडापकडी’, ‘सासरची का माहेरची’, ‘नाथा पुरे आता’, ‘भैरू पैलवान की जय हो’, ‘झुंजार’, ‘खबरदार’, ‘सगळे करून भागले’, ‘राजमाता जिजाऊ,’ ‘चंद्रकला’, ‘वादळ वारं सुटलं गं’, ‘माचीवरला बुधा’ आदी चित्रपटातून विविध भूमिका साकारल्या तर ‘सासूची माया’, ‘सासू आली अडचण झाली,’ ‘वेलकम टू जंगल’ या चित्रपटांसाठी पटकथा, संवाद आणि गीत लेखन केले आहे.

आणखी तीन ते चार चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहेत. त्यांच्या या साऱ्या प्रवासातील खरा टर्निंग पॉईंट ठरला तो दूरचित्रवाणी वाहिनीवरील ‘दादांचा वारसदार’ या रिॲलिटी शोच्या निमित्ताने. राज्यभरातील २५५ हून अधिक स्पर्धकांमधून त्यांनी विजेतेपद पटकावले. नुकत्याच झालेल्या ‘चला हवा येऊ द्या, होऊ दे व्हायरल’ शोमध्येही ते उपविजेते ठरले. त्यांच्या ‘फुकटचा सल्ला खुल्लमखुल्ला’, ‘घडीभर बसा पोटभर हसा’, ‘हसतमुखी सदासुखी’ या एकपात्री प्रयोगांना रसिकांचा मोठा प्रतिसाद मिळतो.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News