मालवण : आंगणेवाडी जत्रेची सुरुवात झाली असून या जत्रेसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून तयारी सुरु आहे. लाखो भाविकांच्या स्वागतासाठी आंगणेवाडीनगरी सजली असून ग्रामस्थ, मंडळे आणि प्रशासनाने चोख नियोजन केले आहे.
कोकणवासियांचं श्रद्धास्थान असलेल्या आणि नवसाला पावणारी देवी म्हणून ओळख असणारी आंगणेवाडीच्या भराडीदेवीची (Anganewadi Bharadi Devi) सर्वत्र ख्याती आहे. कोकणवासीयांना तिच्या वार्षिक जत्रेची विशेष उत्सुकता असते.
देवीच्या दर्शनासाठी रांगांची सुविधा केली आहे. भाविकांना अवघ्या पंधरा मिनिटात देवीचे दर्शन घेता येणार आहे. मंदिरावर आकर्षक रोषणाई केली आहे. भाविकांच्या स्वागतासाठी आंगणे कुटुंबीय, आंगणेवाडीनगरी सज्ज झाली आहे. महसूल, आरोग्य, पोलिस प्रशासन, पंचायत समिती, ग्रामपंचायतीच्या वतीने आवश्यक सुविधा उपलब्ध केल्या आहेत.
राज्यभरातील विविध राजकीय पक्षांच्या स्वागतकमानी, डिजिटल बॅनर लावण्यात आले आहेत. एसटी आगारातून ४६ गाड्यांचे नियोजन केले आहे. भाविकांसाठी येथील बस स्थानकातून १८ बसफेऱ्यांचे नियोजन केले आहे. तालुक्याच्या अन्य भागांतून २८ गाड्यांचे नियोजन केले आहे.
टोपीवाला हायस्कूल येथून तीन देवबाग तारकर्ली येथून तीन, सर्जेकोट येथून दोन, आनंदव्हाळ, डांगमोडे येथून एक बसफेरी सोडण्यात येईल. चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी मालवण- बोरिवली गाडीची सोय केली आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रवासादरम्यान एसटी गाडी बंद पडल्यास दुरुस्तीसाठी पथक नियुक्त केले आहे. रात्रपाळीसाठी पथक नियुक्त केले आहे. बस स्थानक येथे प्रवाशांसाठी रांगेची व्यवस्था केली आहे. एसटीच्या सुविधेचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आगारव्यवस्थापक एन. व्ही. बोधे यांनी केले आहे. यात्रोत्सवात दरवर्षी प्रमाणे लेझर किरण शो ची अशी रोषणाई केली आहे.
अशाप्रकारे ठरते आंगणेवाडी जत्रेची तारीख
महाराष्ट्रातील इतर जत्रेप्रमाणे आंगणेवाडीच्या देवीची जत्रा ही तिथीनुसार किंवा विशिष्ट दिवसानुसार ठरवली जात नाही. आंगणेवाडी देवीच्या यात्रेसाठी देवीलाच कौल लावला जातो. सामान्यपणे मालवण जिल्ह्यातील गावकरी, मानकरी एकत्र येऊन डिसेंबर महिन्याच्या मध्यावर या देवीला कौल लावतात. यंदादेखील मंगळवार म्हणजे १८ डिसेंबर २०१८ रोजी देवीने दिलेल्या कौलानुसार जत्रेची तारीख २५ फेब्रुवारी २०१९ ही ठरवण्यात आली. सामान्य कोकणवासीयांसोबतच महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेते,कलाकार मंडळी या देवीच्या यात्रेला दरवर्षी हमखास भेट देतात. दीड दिवसाच्या जत्रेमध्ये दरवर्षी कोट्यांची उलाढाल होत असते.