अशी वृत्तनिवेदिका तुम्ही पहिलीये का?

ऋषिराज तायडे
Tuesday, 26 February 2019

बदलत्या काळानुरूप आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत चालला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, व्हर्च्युअल रिॲलिटी यांसारख्या नवतंत्रज्ञानाचा प्रसारमाध्यमांत वापर करून अनेक नवनवीन प्रयोग केले जात आहेत. चीनच्या ‘शिनव्हा’ वृत्तवाहिनीने कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित पहिली रोबो वृत्तनिवेदिका सादर केली आहे.

वृत्तवाहिन्यांवर बातम्या सांगणारे वृत्तनिवेदक म्हटले, तर पूर्वीच्या दूरदर्शनवरील वृत्तनिवेदकांपासून ते आताच्या आधुनिक काळातील निवेदक आपल्या डोळ्यांसमोर येतात. पूर्वीच्या बातम्या सांगण्याच्या पद्धतीत अनेक बदल होताना आपण बघत आलो आहेत.

बातम्या अधिक रंजक पद्धतीने सादर करण्यासाठी व्हीएफएक्‍स, ॲनिमेशन, त्रिमितीय कलाकृतींचा अनोख्या पद्धतीने वापर केला जात आहे. चीनमधील ‘शिनव्हा’ या वृत्तवाहिनीने कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित जगातील पहिली रोबो वृत्तनिवेदिका बुधवारी (ता.२१) सादर केली आहे.

या वृत्तनिवेदिकेचे नाव शिन शिओमंग असे ठेवण्यात आले असून ‘शिनव्हा’ वृत्तवाहिनी आणि ‘सोगोऊ’ या चीनमधील सर्च इंजिन कंपनीने संयुक्तपणे या रोबोची निर्मिती केली आहे. याच वाहिनीतील महिला निवेदिका असलेल्या ‘क्‍यु मेंग’ यांचा चेहरा आणि आवाज ‘शिन’ला देण्यात आला आहे. आगामी मार्च महिन्यात अन्य दोन रोबो वृत्तनिवेदकांसह ‘शिन’ पूर्ण वेळ सेवेत दाखल होत आहेत. अन्य दोन पुरुष रोबो वृत्तनिवेदकसुद्धा कृत्रिम बुद्धिमत्तेवर कार्यरत असणार आहेत.

नोव्हेंबर २०१८ मध्ये ‘शिनव्हा’ वाहिनीने कृत्रिम बुद्धिमत्तेवर काम करणारा ‘क्‍यु हाव’ नामक वृत्तनिवेदक सादर केला होता. त्यात अधिक सुधारणा करून बातम्या सांगण्याची पद्धत, चेहऱ्यावरील हावभाव, देहबोली, हातवारे इतके अस्सल आहेत, की प्रथमदर्शनी ते रोबो असेल यावर विश्‍वासच बसत नाही. एकीकडे अनेक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढत असताना, यामुळे अनेकांचे रोजगार हिरावण्याची भीती उद्योगविश्‍वातून व्यक्त केली जात आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News