मुलांना ऐकण्याची संधी घ्या

शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक
Thursday, 20 June 2019

एवढं सतत पालक बोलत असतात, तरी मूल मात्र ऐकत नसतं! मुलगा शाळेत जात असल्यास तो दिवसभरात खूप काही ऐकत, बघत, करत असतो.

तुम्ही मुलांशी संवाद वाढवायला हवाय! संवाद वाढवायचा म्हणजे काय करायचं? काय काय बोलता तुम्ही मुलांशी? बोलतो की... बरंच बोलतो. अभ्यास झाला का, शाळेत काय होमवर्क दिलाय, डबा संपवलास का, का उरला डबा, का संपत नाही तुझा डबा, आवरून झालं का, अंघोळ केलीस का, शूज नीट ठेव, हात धुतलेस का, रंग नीट वापर... कपड्यांवर सांडू नकोस, तोंड नीट धू, टीव्ही काय बघत बसलायस, अभ्यास कर.

म्हणजे... प्रश्‍न किंवा सूचना. हे तर विचारावंच लागतं सगळं आणि याशिवाय अजून काय बोलायचं मुलांशी? हा होता संवाद पालक आणि बालसमुपदेशक गंपूदादा/किशोरीताई यांच्यात झालेला... नेहमी साधारण हाच आणि असाच होत असणारा. एवढं सतत पालक बोलत असतात, तरी मूल मात्र ऐकत नसतं! मुलगा शाळेत जात असल्यास तो दिवसभरात खूप काही ऐकत, बघत, करत असतो.

शाळेतून परतल्यानंतर त्याला आईला खूप काही सांगायचं असतं. शाळेत आज काय मज्जा झाली, कोण कसं पडलं, वाटेत येताना हत्ती बघितला, उंट बघितला... माझं कुणाशी भांडण झालं इ.इ. हे सगळं त्यानं कुणाला सांगायचं? आई तर सूचनाच करत असते. मग त्याला बोलण्याची काय इच्छा राहणार? माझं ऐक, बोलू नकोस म्हणत पालक संवादाची ‘बातनश्‍य’ करून टाकत असतात. हे टाळण्यासाठी समुपदेशक सुचवतात ते मुद्दे असे ः

  • संवाद सुरू होण्याची पहिली पायरी म्हणजे ऐकणे! 
  • मुलांच्या कृतीतून, त्याची कृती जाणून घेऊन ऐकलं पाहिजे.
  • मुलाची देहबोली वाचता, ऐकता आली पाहिजे.
  • मुलाच्या बोलण्यातून त्याला काय म्हणायचंय हे ऐकलं पाहिजे. 
  • बोलण्यात लपलेले अर्थ, भावही समजून घेऊन ऐकलं पाहिजेच. 
  • कधीतरी असंही म्हणता आलं पाहिजे, आज मी तुझं ऐकणार आहे.
  • मुलांच्या मनातली खळबळ, अस्वस्थता, उत्स्फूर्तता, आनंद, दुःख, राग... सगळं वाचता आणि जाणता येण्यासाठी मुलाला ऐकण्याची गरज आहे. तुम्ही मुलाचं ऐकलंत, तर मूल ऐकणार आहे. त्याला बोलण्याची संधी द्या आणि तुम्ही ऐकण्याची संधी घ्या!
     

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News