यामुळे गावाकडचं फेसबुक बंद पडलंय...

जयपाल गायकवाड
Tuesday, 26 February 2019

काळाच्या ओघात चावडीचे महत्व कमी झाले आहे. आता फक्त हे चावडी होती सांगण्यापुरतं ही जागा राहिली असल्याचे मला दिसून आले, मात्र त्या चावडीच्या इतिहास डोळ्यासमोर येत होता. कारण गावातले अनेक निवाडे अन वाद, संकटे अन त्यांचे निवारण याचे ती दार्शनिक होती. चावडीच्या भिंतीला कान लावले तरी अनेक श्वास अन निश्वास यांचे उसासे ऐकू येतील, गावातला खरा इतिहास चावडीच्या कणाकणात मिसळून गेलेला असतो. आजचे फेसबुकवरील पोस्ट, लाईक, कमेंट्स आणि फेसबुक लाईव्ह म्हणजेच तेंव्हाच्या चावडीवरील चर्चा होय...

गेल्या महिन्यात गावाकडे जांबला गेलो असताना गावात फेरफटका मारला त्यावेळी जुन्या भागातील सर्व वाडे ओसाड पडलेली दिसली. गावातील जवळपास बहुतांश लोकं नवीन वस्ती म्हणजे गावाच्या वरच्या भागात बस स्टॅन्ड परिसरात राहण्यासाठी गेले होते. त्यातले अनेकजण नोकरी निमित्त गाव सोडून गेले आहेत. हे सर्व पाहत असताना लहानपणीचे दिवस आठवत होते. सोबत माझा मित्र पंकज होता त्याला फोटोग्राफीची आवड असल्यामुळे सोबत डीएसएलआर कॅमेरा होता. गावातली जुन्या काळातली बंद दुकाने, चिरेबंदी वाडे पाहून तो म्हणाला हे तर एखाद्या चित्रपटाचा सेट वाटतोय...

फिरत असताना गावातील जुन्या काळातील व माझ्या लहानपणी गावातील मुख्य ठिकाण चावडी मध्ये आल्यानंतर तेथे काही गावातील ८० ते ९० वर्ष वयाचे ज्येष्ठ मंडळी बसली होती. थोडावेळ त्यांच्याशी गप्पा मारल्या त्यांच्या सोबत फोटो पण घेतला. त्यानंतर मला हळूहळू लहानपणापासून आतापर्यंत या चावडीत होणारे कार्यक्रम येथे बसणारे ज्येष्ठ नागरिक, गावातील महत्वाच्या सभा, चर्चा आठवू लागल्यानंतर चावडीचे महत्व गावासाठी काय होते हे समजू लागले.
 
प्रत्येक गावात एक वेशीजवळचे मारुतीचे मंदिर व नमाजासाठीचे मातीचे मीनार किंवा गाव मोठं असेल तर मस्जिद असते. ही सर्व धार्मिक प्रवृत्तीच्या गावकरयांची श्रद्धास्थाने माझ्या गावात आहेत. इथले उत्सव अन उरूस हे घरचाच जलसा असतो. तर प्रत्येक गावातली चावडी ही मुळातच बोलभांड असते तशीच माझे गाव जांबची पण होती. अनेक घटनांची ती मूक साक्षीदार आहे. काळाच्या ओघात चावडीचे महत्व कमी झाले आहे. आता फक्त हे चावडी होती सांगण्यापुरतं ही जागा राहिली असल्याचे मला दिसून आले, मात्र त्या चावडीच्या इतिहास डोळ्यासमोर येत होता. कारण गावातले अनेक निवाडे अन वाद, संकटे अन त्यांचे निवारण याचे ती दार्शनिक होती. चावडीच्या भिंतीला कान लावले तरी अनेक श्वास अन निश्वास यांचे उसासे ऐकू येतील, गावातला खरा इतिहास चावडीच्या कणाकणात मिसळून गेलेला असतो. आजचे फेसबुकवरील पोस्ट, लाईक, कमेंट्स आणि फेसबुक लाईव्ह म्हणजेच तेंव्हाच्या चावडीवरील चर्चा होय...

दुर्देवाने आता त्या चावडीवर कोणी चर्चा करीत नाहीत नवी तरुणाई दिवसभर बस स्टॅन्ड वरच्या हॉटेल  मध्ये बसून राहते व दिवसभर मोबाईलमध्ये आणि इंटरनेट मध्ये व्यस्त असते...चावडी सोबतच दुसरं महत्वाचं ठिकाण इथला पार...माझ्या गावातील मारोतीच्या मंदिराच्या परिसरातील कट्याला पार म्हणतात एवढं मला माहिती आहे. अनेक गावात वडाच्या झाडाला गोल कट्टा तयार केलेला असतो. लहान असताना या पारावर कधी कधी खेळायचो, त्यावेळी अनेक निरीक्षणे पाराची झाली होती. त्याचे महत्व आज समजू लागले...

सध्या दुपारच्यावेळी काही जुने वयस्क लोक बसून राहतात पण पूर्वी पारावर गावातील लोकांच्या गप्पा मोठ्या रंगत असत. कुणाच्या घरी पाहुणे आलेत इथपासून ते आज कुणाच्या घरी ‘देवदेव’ आहे इथपर्यंतची पहिली खबर पारावरून गावात पसरते. पारावरचा कट्टा हा गावाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे मंच बनतो तर कधी एखाद्या सभेचे तर एखाद्या बैठकीचे दमदार बोल ऐकण्यासाठी गावकरी त्या पाराभोवती गोळा झालेले असत, गावातला पार गावाची कळा सांगतो असे म्हणतात. पारात कैद असतात अनेक अपेक्षा अन उपेक्षाची जीवघेणी गाऱ्हाणी ती मात्र पार फक्त आपल्या एकट्याच्या अंतःकरणात ठेवून असतो त्याचे शेअरिंग होत नसते. पाराचे ते असहाय दुःखणे असते, त्याच्या अबोलव्यथांचे प्रकटन तो कधी करत नाही. इंटरनेट मुळे माणसाची प्रगती झाली असली तरी माणसांमधील असलेला संवाद असूनही दुरावा दिसून येत आहे. 

आता फक्त चावडी आणि पार हे गावचं फेसबुक होत एवढंच सांगू शकतो. गावाचं गावपण हरवून गेलं आहे. शेवटी एवढंच गाव म्हणजे फाटक्या कपड्यात दुख लपवून, जमीन गहाण टाकून, जीवाला जीव देऊन आईबापाची सेवा करणारया अन मातीच्या ऋणात राहून कोरभर भाकर पोटाला खाऊन, त्याच मातीत जगून आपला स्वाभिमान धरित्रीच्या चरणी अर्पण करणारया शेकडो माणसांचा एकसंध देह असतो..
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News