वर्क फ्रॉमचे आरोग्यास हानीकारक परिणाम; कॅन्सर, हृदयरोगाचा धोका

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 21 July 2020
  • लॉकडाऊनमुळे अनेक जण वर्क फ्रॉर्म होम करत आहेत; मात्र तासन्‌ तास एकाच स्थितीत बसून राहिल्याने किंवा बेडवर, सोफ्यावर काम केल्याने आरोग्यावर घातक परिणाम होण्याची शक्‍यता आहे.
  • एकाच ठिकाणी बसून राहिल्याने मान आणि पाठदुखी ओढावू शकते.

मुंबई :- लॉकडाऊनमुळे अनेक जण वर्क फ्रॉर्म होम करत आहेत; मात्र तासन्‌ तास एकाच स्थितीत बसून राहिल्याने किंवा बेडवर, सोफ्यावर काम केल्याने आरोग्यावर घातक परिणाम होण्याची शक्‍यता आहे. एकाच ठिकाणी बसून राहिल्याने मान आणि पाठदुखी ओढावू शकते. हे सामान्य असले, तरी याची सवय लागणे धोकादायक ठरू शकते. एवढेच नव्हे, तर यामुळे कर्करोग, हृदयविकारासारख्या गंभीर समस्याही उद्‌भवू शकताता. तज्ज्ञ डॉक्‍टरांनी याला दुजोरा दिला आहे.

मेडिकल जर्नल जेएएमए ऑन्कोलॉजीने केलेल्या एका सर्व्हेनुसार जास्त वेळ बसून राहिल्याने कॅन्सर आणि हृदयाचे विकारही होण्याची शक्‍यता आहे. सर्व्हेत चार वर्षांत आठ हजार लोकांवर संशोधन करण्यात आले. लोकांच्या राहणीमानाचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये जास्त वेळ बसल्याने किंवा जास्त हालचाली नसणाऱ्या लोकांना कर्करोगामुळे मृत्यूचा ८२ टक्के धोका आहे. जास्त वेळ बसणाऱ्या लोकांपेक्षा ऍक्‍टिव्ह असणाऱ्या आणि व्यायाम करणाऱ्या लोकांमध्ये हा धोका कमी प्रमाणात आहे. रोज चालणे, जास्तीत जास्त सायकलिंग करणाऱ्या लोकांना कर्करोगाने मृत्यू होण्याचा धोका कमी असतो. या लोकांमध्ये कर्करोगाने मृत्यूचे प्रमाण ३१ टक्के एवढे आहे. त्यामुळे दैनंदिन जीवनात चालणे, व्यायाम करणे गरजेचे आहे. तसेच वर्क फ्रॉम होममुळे आळस वाढल्याचेही सर्व्हेत समोर आले आहे.

अशी घ्या काळजी

 

  • एक तासाहून अधिक वेळ झाल्यानंतर थोडा वेळ उठून चाला, फिरा.
  • पाणी पिण्यासाठी किचनमध्ये स्वत: तासाभराने उठा.
  • एखादा महत्त्वाचा फोन आल्यास बसून न बोलता उठा आणि चालत-फिरत बोला.
  • स्वत:ची कामं स्वत: करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा.
  • जेवण काम करण्याच्या ठिकाणी न करता दुसऱ्या ठिकाणी करा.
  • जेवणानंतर लगेच कामाला बसू नका. थोडा वेळ फिरून कामासाठी बसा.

बैठ्या जीवनशैलीमुळे विविध आजारांना निमंत्रण

लॉकडाऊन कालावधीत सुरू असलेल्या वर्क फ्रॉम होममुळे शारीरिक हालचालींचे प्रमाण कमी झाले आहे. बैठी जीवनशैली विविध आजारांना आमंत्रण देणारी असून विविध प्रकारचे कर्करोग होण्याचा धोकाही यामुळे वाढतो. आतडे, एंडोमेट्रिअल, स्तनांचा कर्करोग, प्रोस्टेट, स्वादुपिंड आणि फुप्फुसांचा कर्करोग बैठ्या जीवनशैलीमुळे होत असल्याचे आढळून आले आहे. बसण्याच्या वेळेत दोन तासांनी वाढ झाल्यास हा धोका आणखी वाढत असल्याचे दिसून आले. शारीरिक हालचाल न केल्यास शरीरातील चरबी आणि सूजही वाढते, असे अपोलो स्पेक्‍ट्रा हॉस्पिटलचे डॉ. संकेत शाह यांनी सांगितले.


 

कोरोना संसर्गामुळे हृदय आणि रक्ताभिसरणावर विपरित परिणाम होऊ शकतो. अधिक काळ एकाच ठिकाणी बसून काम केल्याने फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होते. पोक काढून बसल्याने फुफ्फुसाचे स्नायू आकुंचन पावतात, तसेच घशाच्या स्नायूंवरही परिणाम होऊ शकतो. परिणामी पाठीच्या वरच्या बाजूचे स्नायू कालांतराने अशक्‍त होतात. त्यामुळे श्‍वसनाच्या समस्या वाढू शकतात. त्यामुळे नियमित हालचाली करणे आवश्‍यक आहे.

 

-डॉ. बिपीनचंद्र भामरे, कार्डिओ थोरॅसिक सर्जन, सर एच एन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल एण्ड रिसर्च सेंटर

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News