कळसूबाई – हरीश्चंद्रगड अभयारण्य

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 23 September 2019
  • येथे पक्ष्यांचा अधिवास ही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो.
  • अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात असलेल्या या अभयारण्याला विपुल जैवविविधता लाभली आहे.

सह्याद्री पर्वत रांगेतील महाराष्ट्रामधील सर्वोच्च शिखर कळसूबाई आणि नाणेघाटाच्या सानिध्यातील हरीश्चंद्रगड यांच्या आसपासचा सुमारे ३६१.७१ चौ.कि.मी चा डोंगराळ, दुर्गम परिसर महाराष्ट्र शासनाने इ.स १९८६ मध्ये अधिघोषित केला आहे. मुळा, प्रवरा, आढळा, म्हाळुंगी या नद्यांचे खोरे आणि उत्तुंग अशी गिरी शिखरे असा हा अप्रतिम सृष्टी सौंदर्याने नटलेला परिसर असून, इ.स १९१० ते १९२४ या काळात उभारण्यात आलेले भंडारदरा धरण आणि या धरणामुळे निर्माण झालेला सर आर्थर लेक हा जलाशय आणि त्याच्या सभोवतालचा परिसर अनेक देशी – विदेशी पक्ष्यांना आकर्षित करतो. येथे पक्ष्यांचा अधिवास ही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात असलेल्या या अभयारण्याला विपुल जैवविविधता लाभली आहे.

या क्षेत्रात दक्षिण उष्ण कटीबंधीय आर्द मिश्र पानगळीची वने, काटेरी वने तर काही भागात सदाहरित वने अशी वनांची विविधता येथे आढळून येते. या अभयारण्यात हिरडा, जांभूळ, चांदवा, बहावा, कुंभल, कुडल, सिरस, पांगारा, कराप, आवळा, अशिंद, बेहडा, खारवेल, कळंब, सावर, सादडा, अर्जुन, धामण, अशी नानाविविध वृक्षसंपदा येथे आढळते. या अभयारण्यात बिबळे, रानमांजरी, ताडमांजर, मुंगुस, तरस, कोल्हे, लांडगे, रानडुक्कर, भेकर, ससा, सांबर, शेकरू, घोरपड हे वन्यप्राणी देखील येथे बघायला मिळतात. विविध प्रजातीचे साप व सरडे सुद्धा येथे दिसून येतात. येथील जलाशय परिसरात करकोचे, बगळे, शराटी असे पाणपक्षी देखील येथे निदर्शनास येतात.

भंडारदरा येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पर्यटन संकुलात पाटबंधारे विभागाच्या विश्रामगृहात तसेच वनविभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात तसेच वनविभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात पर्यटकांच्या निवासाची सोय उपलब्ध आहे. तसेच भंडारदरा धरण परिसरात खासगी रिसॉर्टस देखील आहेत. अभयारण्याच्याच परिसरात रतनगड, मदनगड, अलंग, कुलंग, बिजनगडपट्टा, कोंबड किल्ला हे ऐतिहासिक गड-किल्ले तर रंधा फॉल, अम्ब्रेला फॉल हे मोठे धबधबे देखील येथे आहेत. कळसूबाई – हरीश्चंद्रगड अभयारण्याच्या पर्यटनासाठी ऑगस्ट ते डिसेंबर हा काळ उत्तम आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News