नव्या शैक्षणिक सत्राची चाहूल, पालकांची पुर्व तयारी सुरु !

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 3 June 2019
  • पालक व पाल्यांची शालेय साहित्य खरेदीची लगबग !
  • नवे शैक्षणिक सत्र सुरु होण्यास उरले अवघे १५ दिवस

माहूर : उन्हाळ्याच्या सुट्टय़ा संपायला येत असल्याने अवघ्या १५ दिवसांतच नवीन शैक्षणिक सत्राला सुरुवात होत आहे. काही खासगी शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेतील स्टॉलद्वारे यापूर्वीच शालेय साहित्य खरेदी केले आहे. मात्र शासकीय व अनुदानित शाळेतील पालकांसह पाल्यांनी शाळा सुरू होण्याचे अल्प दिवस बघता शालेय साहित्य खरेदीची तालुक्यात लगबग सुरू केली आहे.

मागील वर्षाच्या तुलनेत यंदा शालेय साहित्यांच्या किंमतीत थोडीफार वाढ झाली आहे. शाळेच्या दोन महिन्यांच्या सुट्टय़ांमध्ये मौजमजा, पर्यटन व लग्न समारंभ आटोपून स्वगृही परतले आहे. नवीन शैक्षणिक वर्ष असल्याने नवीन वर्ग, नवे शिक्षक, नवीन मित्र, त्यातच नवे पाठय़पुस्तकांमुळे विद्यार्थ्यांमध्ये एक नवीन आकर्षण ठरत आहे.

विद्यार्थ्यांची शालेय साहित्य खरेदी ही उत्सूकतेसह आनंदाची पर्वणीच ठरत असते. दुकानातून शालेय साहित्य खरेदी करताना पुस्तकांचा सुगंध व टवटवीत नव्या नोटबुकांसह नवीन गणवेश अशा संपूर्ण नव्या बस्त्यासह शाळेत जाण्याची मजा विद्यार्थ्यांसाठी काही ओरच असते.

शिवाय पाल्याला संपूर्ण तयारीने बघून पालक आई-वडिलांचा उत्साह द्विगुणीत होत असून आपल्या पाल्याचा हरिक येत असल्याचे दिसत आहे. माहूर पंचायत समितीला वर्षभरापासून प्रभारी गटशिक्षणाधिकारी लाभल्याने शैक्षणिक गुणवत्तेत फारसा प्रभाव पडला असल्याचे दिसून आले नाही.

दरम्यान या शैक्षणिक वर्षात माहूर पं.स.ला नवे गटशिक्षणाधिकारी मिळणार असल्याची माहिती असून नव्या शैक्षणिक सत्रात तरी कर्तबगार व कठोर प्रशासक गटशिक्षणाधिकारी माहूर सारख्या अतिदुर्गम आदिवासी बहुल, पेक्षा क्षेत्र बहुल असलेल्या तालुक्याला मिळावा अशी अपेक्षा शिक्षणप्रेमी नागरिक व्यक्त करीत आहे. जि.प. अध्यक्षा श्रीमती शांताबाई पाटील जवळगावकर, माजी आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी माहूर तालुक्याच्या शिक्षण विभागाकडे विशेष बाब म्हणून लक्ष द्यावे अशी अपेक्षा तालुक्यातील जनतेतून व्यक्त करण्यात येत आहे.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News