महाविद्यालय परिसरात गुलाब बहरला

अंकुश खेमराज सोनवणे
Thursday, 14 February 2019

महाविद्यालय परिसरात गुलाब, तरुणाईच्या हातात उठून दिसत असला तरी, दुसऱ्या बाजूला मात्र पालकांच्या चेहऱ्यावरची काळजीही लपलेली नव्हती. या सर्व डेजच्या उत्सवात तरुणाई आपल्या संस्कारांना कुठे मूठ माती द्यायला नको, इतकीच अपेक्षा आपण तरूणाईकडून करू शकतो.

जळगाव - आज प्रेमी युगलांचा खास दिवस! व्हॅलेंटाईन निमित्ताने जळगाव शहरात अनेक महाविद्यालय परिसरात गुलाबाचे फुल विक्री करणारे लहानगे, आज सकाळपासूनच दिसत होते. गुलाब खरेदीसाठी तरुणाईने सकाळपासून गर्दी केली. एक गुलाबाचे फुल 20 रुपयाला मिळत असले, तरी प्रेमी युगल गुलाबाची किंमत न करता मिळेल त्या किंमतीला खरेदी करून आपल्या प्रियजनाला देण्याचे काम तरुणाई मोठ्या उत्साहात करत असते.

शहरातील बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर फुल विकणाऱ्यांना सुरक्षा रक्षकांनी हुसकावले, तरी देखील फुलविक्रेते त्याठिकाणी पुन्हा-पुन्हा येतच होते. शहरातील अतिशय वर्दळीच्या ठिकाणी हे महाविद्यालय असल्याने वातावरण चांगलेच गुलाबी झाल्याचे बघायला मिळाले. याप्रकाराबद्दल येणारे जाणारे लोक, मात्र या कृत्याबद्दल निषेध व्यक्त करत होते. तरुणाईच्या चेहऱ्यावर मात्र एक वेगळाच आनंद होता. हे सर्व बघत असताना विदेशी संस्कृतीचा पगडा आपल्या देशातील तरुणाईच्या मनावर किती बिंबलाय? हे बघायला मिळत होते.

तारुण्याच्या उंबरठ्यावर भरचौकात हे सर्व घडत असलं तरी मात्र पालकांना आपल्या पाल्यांची काळजी वाटतच होती. सध्या 'डेज'चे वातावरण असल्याने पाल्यांना महाविद्यालयात पाठवणे देखील काळजीचं वाटत असल्याची प्रतिक्रिया काही पालकांनी दिली.

महाविद्यालय परिसरात गुलाब, तरुणाईच्या हातात उठून दिसत असला तरी, दुसऱ्या बाजूला मात्र पालकांच्या चेहऱ्यावरची काळजीही लपलेली नव्हती. या सर्व डेजच्या उत्सवात तरुणाई आपल्या संस्कारांना कुठे मूठ माती द्यायला नको, इतकीच अपेक्षा आपण तरूणाईकडून करू शकतो.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News