याच ‘एरियल योगा’ची क्रेझ तरुणांमध्ये वाढतेय...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 21 June 2019
  • पारंपरिक योगाव्यतिरिक्त एरियल योग, क्रोमा योग, स्नेक योग, डिजिटल योग, चेअर योग असे अनेक नवीन प्रकार शिकवले जात आहेत.
  • त्यातही तरुणांमध्ये जास्त प्रिय आहे तो एरियल योगा.

नवी मुंबई -  योग म्हटले की, सूर्यनमस्कार, भुजंगासन, अनुलोम-विलोम असे पारंपरिक योग प्रकार नजरेस येतात; मात्र इतर व्यायाम प्रकारांनुसार योगाचे प्रशिक्षणही आता आधुनिक स्वरूपात दिले जात असून तरुणांमध्ये ‘एरियल योग’ शिकण्याची क्रेझ असल्याचे सांगितले जात आहे. दोरीच्या मल्लखांबाशी साम्य असलेला हा योग प्रकार गेल्या दोन-तीन वर्षांपासून मूळ धरू लागला आहे. 

पारंपरिक योगाव्यतिरिक्त एरियल योग, क्रोमा योग, स्नेक योग, डिजिटल योग, चेअर योग असे अनेक नवीन प्रकार शिकवले जात आहेत. त्यातही तरुणांमध्ये जास्त प्रिय आहे तो एरियल योगा. अमेरिका आणि इतर पाश्‍चात्त्य देशांमध्ये २०१४ पासून हा योग शिकण्याचा कल वाढला. शिल्पा शेट्टी, मलायका अरोरा, करिना कपूर-खान आदींंचे या योगाचे व्हिडीओ व्हायरल हा योग शिकण्याची धडपड तरुणांमध्ये वाढत असल्याचे सांगितले जाते.

एरियल योग म्हणजे काय?
या पद्धतीमुळे कठीण आसने सहज, सुलभरीत्या करता येतात. रेशमी कापडापासून तयार केलेल्या झोपाळ्यावर हा योग केला जातो. त्यामुळे जमिनीपासून काही अंतरावर आपले शरीर राहते. झोपाळ्यावर लयबद्ध योगासने केली जात असल्याने त्याला अँटी ग्राव्हिटी योग असेही म्हटले जाते. या प्रकारामुळे शरीरातील रक्ताभिसरण वाढते आणि शरीर 
निरोगी राहते. 

उद्यानांमध्ये मिळताहेत योगाचे मोफत धडे
गेल्या काही वर्षांत जगाला भारतीय योगविद्येने वेड लावले आहे. त्यामुळे भारतातही योगविद्येचा मोठ्या प्रमाणावर प्रसार व्हावा, याकरिता अनेक ठिकाणी उद्यानांमध्ये योगाचे मोफत प्रशिक्षण दिले जाते. योग विज्ञान संस्थेमार्फत असे मोफत योग प्रशिक्षण सत्र ठिकठिकाणी आयोजित केले जात असल्याची माहिती, आयोजक श्रीमंत तांदळे यांनी दिली. या प्रशिक्षणाला सकाळी जॉगिंगसाठी वा फेरफटका मारण्याकरिता येणाऱ्या वयस्कर व्यक्तींचा तसेच गृहिणींचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असल्याचे, योग विद्या निकेतनच्या प्रशिक्षक प्रियांका गुप्ता यांनी सांगितले. उद्यानांमधील सत्रात सूर्य नमस्कार, गोमुखासन, भुजंगासन, प्राणायाम असे सोपे प्रकार शिकवले जातात. 

अनेकांना शीर्षासनसारखी इतर कठीण आसने करताना लोअर बॅकचा त्रास होतो किंवा हाडांवर जास्त ताण येतो. हे टाळण्यासाठी एरियल योग चांगला पर्याय आहे. या योग प्रकारामुळे मेंदूला रक्तपुरवठा अधिक होत असल्याने अँटीएज म्हणूनही या योग प्रकाराला लोक प्राधान्य देतात.  - दिलेश तेलवणे, एरियल योग प्रशिक्षक, खारघर

बॉलीवूड सेलिब्रिटीज ही योग पद्धती वापरत असल्याने तरुणांमध्येही योग शिकण्याची, त्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता दिसून येते.  - प्रियांका गुप्ता,  योग प्रशिक्षक, वाशी

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News