रेशन कार्ड धारकांना सरकार देणार ५० हजार रुपये? जाणून घ्या, व्हायरल फोटोमागचं सत्य  

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 4 May 2020

सोशल मीडियावर सरकारच्या नव्या स्कीमचे मेसेज आणि फोटो नेहमीच व्हायरल होताना दिसतात. सरकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचाव्यात म्हणून सोशल मीडियाचा प्रभावी वापर होताना दिसतो.

सोशल मीडियावर सरकारच्या नव्या स्कीमचे मेसेज आणि फोटो नेहमीच व्हायरल होताना दिसतात. सरकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचाव्यात म्हणून सोशल मीडियाचा प्रभावी वापर होताना दिसतो. मात्र काहीवेळा हा वापर चुकीच्या पद्धतीने देखील होताना दिसत आहे. नुकताच सोशल मीडियावर  सरकारच्या पायलट प्रोजेक्टचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये राष्ट्रीय शिक्षित बेरोजगार योजनेचा उल्लेख आहे. त्याअंतर्गत लाभार्थ्यांना 50 हजारांचे मदत पॅकेज देण्याची चर्चा आहे.

काय आहे व्हायरल पोस्ट 
या व्हायरल पोस्टनुसार सरकारने राष्ट्रीय शिक्षित बेरोजगार योजना सुरू केली आहे. या अंतर्गत सर्व रेशनकार्डधारक अर्जदारांना 50 हजार रुपयांचे मदत पॅकेज देण्यात येणार आहे. योजनेशी संबंधित अटी देखील पोस्टमध्ये नमूद केल्या आहेत. ज्येष्ठ नागरिक, भारतीय विधवा महिला, शेतकरी, रोजंदारीचे कामगार, बेरोजगार आणि सर्व रेशनकार्ड धारकांसह ही योजना बाधित लोकांसाठी असून प्रथम येणार्यांना ही सेवा देण्यावर आधारित आहे. पहिल्या 40 हजार अर्जदारांना याचा लाभ मिळणार आहे. त्यांना ऑनलाईन पेमेंटद्वारे ५० हजार पॅकेज देण्यात येणार आहे. याबाबत संबंधित मेसेजमध्ये आणि फोटोमध्ये ईमेल आयडी देखील पुरविण्यात आला आहे. इच्छुकांनी त्या ईमेलवर आपली माहिती पाठवावी, असं देखील आवाहन करण्यात आलं आहे. 

 

काय आहे सत्य?
सरकारच्या प्रेस इंफॉर्मेशनने हा दावा नाकारला आहे. पीआयबीने रविवारी केलेल्या ट्विटमध्ये सरकारने ही योजना सुरू केली नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच  बनावट आणि फसव्या साइट्सपासून सावध रहाण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून हा मेसेज सोशल मीडियावर फिरत असल्याने यासाठी अनेकांनी विचारपूस करण्यास सुरुवात केली होती. मात्र या मेसेजमध्ये कोणतेच तथ्य नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हा व्हायरल होणारा मेसेजमधील दावा फेक ठरला आहे. 

सरकारच्या योजनांच्या नावाखाली अशाप्रकारे अनेकजण फसवणूक करत असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. बेरोजगारांसाठी असणारी ही स्कीम ५० हजार देत असल्याचे समजताच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आली. मात्र बेरोजगारांनी आणि नागरिकांनी अशा अफवा आणि फेक मेसेजवर विश्वास न ठेवता त्याची पडताळणी करणे गरजेचे आहे. सुशिक्षित  बेरोजगारांसाठी सरकारने अशी कोणतीही योजना राबवली नाही. नागरिकांसाठी असणाऱ्या सरकारच्या योजना आणि त्याबाबतची माहिती ही सरकारच्या वेबपोर्टलवर देण्यात येते. कोणत्याही मेसेजबाबत शंका आल्यास सरकारच्या वेबसाईटवर जाऊन त्याबाबत खात्री करूनच पुढील प्रक्रिया करावी.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News