गोरखगड

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 30 June 2020

नाशिक जिल्ह्यातील मनमाड जवळ अंकाई टंकाई हे दोन प्रसिध्द जोड किल्ले आहेत. त्या किल्ल्यांपासून ३ किमी अंतरावर आंबेवाडी गावात गोरखनाथाचा डोंगर नावाच एक तिर्थक्षेत्र आहे

नाशिक जिल्ह्यातील मनमाड जवळ अंकाई टंकाई हे दोन प्रसिध्द जोड किल्ले आहेत. त्या किल्ल्यांपासून ३ किमी अंतरावर आंबेवाडी गावात गोरखनाथाचा डोंगर नावाच एक तिर्थक्षेत्र आहे. गॅझेटर आणि इतर कागदपत्रात याचा किल्ला म्हणून कुठेही उल्लेख सापडत नसला तरी त्यावर असलेल्या खोदीव गुहा, पाण्याची टाक इत्यादी अवशेष पाहाता हा एकेकाळी टेहळणीचा किल्ला असवा. अंकाई आणि टंकाई वरील ब्राम्हणी लेण्यांचा आणि या किल्ल्याचा निर्मितीचा काळही एकच असण्याची शक्यता आहे. 

पुढील काळात अंकाई टंकाई किल्ल्याचे महत्व वाढल्यावर या किल्ल्याचा वापर कमी झाला असवा आणि त्याचा ताबा नाथ संप्रदायाकडे गेला असण्याची शक्यता आहे. आपण या शक्यतांच्या जंगलात न शिरताही या प्राचीन डोंगर चढाईचा त्यावरील अवशेषांचा आनंद घेऊ शकतो. 

अंकाई टंकाई हे दोन किल्ले नीट पाहाण्यास पाच ते सहा तास लागतात. जर आदल्या दिवशी मुंबई किंवा पुण्याहून निघुन पहाटे मनमाडला पोहोचल्यास दुपारपर्यंत अंकाई आणि टंकाई किल्ले पाहुन होतात. त्यानंतर त्याच्या पासुन ६ किमीवर असलेला गोरखगड पाहुन पायथ्याच्या मंदिरात मुक्काम करता येतो किंवा ७ किमीवरील कात्रा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या कातरवाडीतील हनुमान मंदिरात मुक्कामाला जाता येते. दुसऱ्या दिवशी कात्रा किल्ला पाहाता येतो. काटेकोरपणे कार्यक्रम आखल्यास ४ किल्ले दोन दिवसात पाहुन होतात. अर्थात त्यासाठी बरोबर खाजगी वाहान असणे आवश्यक आहे. कारण या आतल्या भागात एसटी आणि रिक्षांची सोय नाही. 

पहाण्याची ठिकाणे 

किल्ल्याच्या पायथ्याशी एक मोठा वट वृक्ष आहे. त्याखाली नाथपंथीयांच्या काही समाध्या आहेत. इथूनच गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. पायऱ्या चढताना उजव्या बाजूला दोन नक्षीदार समाध्या आहेत. किल्ल्याच्या पाव उंचीवर गेल्यावर पायऱ्या संपतात. त्यानंतर ओबडधोबड पायवाटेने अर्धातास चढल्यावर आपण किल्ल्याच्या पहिल्या टप्प्यावर पोहोचतो. इथे उजव्या बाजुला जाणारी पायवाट गोरखनाथांच्या गुहेपाशी जाते. ही गुहा खोलवर कोरलेली असून त्यात नाथपंथीय साधुंच्या मुर्ती आहेत. 

ही गुहा पाहुन परत पायवाटेवर येउन कातळात कोरलेल्या पायऱ्यांवरून पाच मिनिटे चढुन गेल्यावर आपण डोंगराच्या कातळकड्या खाली असलेल्या गुहांपाशी पोहोचतो. इथे एक मोठी गुहा कोरलेली आहे. गुहेच्या उजव्या बाजूला कानिफननाथांची गुहा आहे ती. पाहुन पायऱ्यांपाशी येउन डाव्या बाजूला चालायला सुरूवात केल्यावर पाण्याच टाक पाहायला मिळत. पण त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. पुढे एक मोठी गुहा आहे. त्याचा पुढे डोंगराच्या पश्चिम टोकावर असणाऱ्या नेढ्या पर्यंत जाण्यासाठी कातळकडा उजव्या बाजुला आणि दारी डाव्या बाजुला ठेवत १० मिनिटे चालल्यावर आपण कातळकड्याच्या टोकाला येतो. 

इथून १०-१२ फुटाचा कातळटप्पा चढल्यावर आपण किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावर जाता येते. इथे कुठलेही अवशेष नाहीत. इथे एक भगवा झेंडा लावलेला आहे. तो दर गुरुपौर्णिमेला बदलला जातो. किल्ल्याच्या माथ्यावरून अंकाई-टंकाई, कात्रा आणि मेसणा हे किल्ले दिसतात. कातळ टप्प्यावरून उतरल्यावर समोरच्या पठारावर दिसणाऱ्या नेढ्या पर्यंत चालत जाण्यास १५ मिनिटे लागतात. नेढ जवळून पाहुन आल्या मार्गाने परत येउन किल्ला उतरावा.

किल्ल्याच्या गुहे पुढचा मार्ग मळलेला नाही आहे. त्यामुळे तो चिंचोळा टप्पा फार जपून पार करावा लागतो. किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावर जाण्यासाठी असलेला कातळटप्पा चढण्यासाठी रोप आणि गिर्यारोहण्यासाठी वापरले जाणारे साहित्य असणे सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक आहे. 

किल्ला चढायला पाउण तास आणि पूर्ण बघायला १ तास लागतो.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News