वर्ल्डकपच्या हिरोचा क्रिकेटला अलविदा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 10 June 2019
  • यशापेक्षा अपयश जास्त आले आणि त्यानेच मला लढण्याची जिद्द दिली, असे म्हणत भारताच्या वर्ल्डकपचा किंग युवराजसिंगने आज आंतरराष्ट्रीय  क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली. युवराजसिंगमधला क्रिकेटपटू आता अधिकृतरित्या संपलाय..!

मुंबई - यशापेक्षा अपयश जास्त आले आणि त्यानेच मला लढण्याची जिद्द दिली, असे म्हणत भारताच्या वर्ल्डकपचा किंग युवराजसिंगने आज आंतरराष्ट्रीय  क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली. युवराजसिंगमधला क्रिकेटपटू आता अधिकृतरित्या संपलाय..! चार वर्षांच्या अवधीत भारताला दोन विश्‍वकरंडक स्पर्धा जिंकून देणारा हा लढवय्या खेळाडू आता कारकिर्दीच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर आहे आणि भारतीय संघात त्याच्या पुनरागमनाची शक्‍यता आता पूर्णपणे मावळली आहे. युवराजसिंगने पत्रकार परिषद बोलावली म्हटल्यावर त्याच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले. अखेर त्याने भावूक होत आंतरराष्ट्रीय  क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली. 

कॅन्सरशी झुंजणारा युवराज.. आक्रमक फलंदाजी करणारा युवराज.. उपयुक्त फिरकी गोलंदाजी करणारा युवराज.. भारतीय संघाचा क्षेत्ररक्षणाचा दर्जा उंचावणारा युवराज आता पुन्हा 'टीम इंडिया'तून खेळताना दिसणार नाहीच, यावरच आजच्या या संघनिवडीने शिक्कामोर्तब केले आहे. साहजिकच आहे! युवराजपेक्षा सातत्यपूर्ण आणि दर्जेदार कामगिरी करणारे अनेक पर्याय आज निवड समितीसमोर आहेत. त्यामुळे त्याला संघात पुनरागमन अवघड होतेच; तरीही त्याने आशा सोडली नव्हती. 

यंदाच्या आयपीएलपूर्वी झालेल्या लिलावामध्येही युवराजला कुणीही करारबद्ध केले नव्हते. एकेकाळचा संघ सहकारी आणि घनिष्ठ मित्र झहीर खान धावून आला आणि मुंबईच्या संघात त्याला स्थान मिळाले. त्यातही, यंदाच्या आयपीएलमधील सुरवातीच्या एक-दोन सामन्यांमध्ये युवराजला खेळण्याची संधी मिळाली; पण नंतर त्याच्या जागी ईशान किशनला खेळविण्यास मुंबईच्या संघ व्यवस्थापनाने प्राधान्य दिले. 

2007 मध्ये वेस्ट इंडीजमध्ये झालेल्या विश्‍वकरंडक स्पर्धेत भारताला मानहानिकारक पराभवासह स्पर्धेतून बाहेर पडावे लागले होते. त्यानंतर काही महिन्यांतच झालेल्या ट्‌वेंटी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेत महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वाखालील नवोदित संघाने थेट विजेतेपदापर्यंत झेप घेतली. त्यात युवराजची कामगिरी मोलाची होती. त्यानंतर चार वर्षांत मायदेशी झालेल्या विश्‍वरंडक स्पर्धेतही भारतानेच बाजी मारली. यातही युवराजच चमकला होता. 

शारिरिक त्रासामुळे संघाबाहेर जावे लागलेल्या युवराजने जिगरबाज पुनरागमन केले; पण त्याला पूर्वीचा सूर गवसलाच नाही. गेल्या दोन वर्षांत त्याला भारतीय संघात एकदाही स्थान मिळालेले नाही. केदार जाधव, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, विजय शंकर असे नवे 'फिनिशर' तयार झाले आणि त्यांनी वेळोवेळी ही जबाबदारी समर्थपणे पारही पाडली. त्यामुळे युवराजच्या पुनरागमनाचा मार्ग बंद झाला होता. 2015 च्या 'वर्ल्ड कप'पूर्वी निदान युवराजच्या नावाची चर्चा तरी झाली होती; पण आता चर्चेतही त्याचे नाव नव्हते. इशारा स्पष्ट होता.. युवराजची कारकिर्द आता संपली आहे!

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News