परदेशवारी करताय? याठिकाणी नक्की भेट द्या

उदय ठाकूरदेसाई
Saturday, 23 February 2019

एकदा तुम्ही न्यूझीलंडमध्ये पाय ठेवलात, की तुमच्या स्वप्नातील  सफर सुरू होते. दक्षिण बेटावरच्या टोकाला क्विन्सटाऊनपर्यंत पोहचण्याचा प्रवासात दुतर्फा दिसणारे अप्रतिम सृष्टिसौंदर्य बघून तुम्ही अगदी हरखून जाता. आनंदात अगदी न्हाऊन निघता. मात्र त्याच्याही पुढे म्हणजे अगदी पार दक्षिणेच्या टोकाला-मिलफोर्ड साउंडला जाण्यासाठी तुम्ही निघालात, की तुमचा प्रवास जणू स्वप्नलोकीच्या प्रदेशात जाण्यासाठी सुरू होतो. नंतर घडणारी प्रत्येक गोष्ट ही आपण स्वप्नात पाहात आहोत, की वास्तवात अनुभवतो आहोत तेच कळेनासे होते. म्हणूनच ही गंमत अनुभवण्यासाठी मिलफोर्ड साउंडला जायलाच हवे.

         परदेशवारी करताना दर दिवशीचा कार्यक्रम वाचून, पुढे काय वाढून ठेवलेय याची कल्पना येईलच याची शाश्‍वती नसते. उदाहरणार्थ कार्यक्रमाच्या नोंदीप्रमाणे क्विन्सटाऊनवरून मिलफोर्ड साउंड आणि परत या एवढ्याशा तपशिलावरून त्या अतिरम्य सफारीची कल्पना तुम्हाला करता येणार नाही.

       अति थंड आणि रोमहर्षक वातावरणातले क्विन्सटाऊन भल्या सकाळी सोडले, की छानपैकी कोवळे ऊन पडण्याच्या बेतास आपण टी अनौ इथे उतरतो. बाहेरच्या अति थंड वातावरणामुळे न्यूझीलंडमध्ये बस सुरू असताना ‘हीटर’मुळे बसमधील वातावरण उबदार असते आणि आपण बसमधील त्या उबदार वातावरणात बाहेर छानछान दिसणाऱ्या निसर्गचित्रां ना वा! वा!! म्हणत पुढे प्रवास करीत असतो. परंतु बसमधून जेव्हा उतरायची वेळ येते आणि हीटर बंद होऊन बाहेरच्या थंडीचा सामना करावा लागतो तेव्हा बसमधून बाहेर पडणारा पहिला प्रवासी बसबाहेर अर्धवट पाय टाकून परत बसमधे परतायचा विचार करतो अशी छान थंडी बाहेर असते. या सुरुवातीच्या गमतीनंतर मग एक-एक करून सारेजण बसमधून बाहेर पडतात. टी अनौला अतिशय सुंदर वातावरणात आणि छानशा कोवळ्या सूर्यप्रकाशामुळे चित्त वृत्ती उल्हसित  झालेल्या वातावरणात एक छानसा ट्रेक करता आला तर काय बहार येईल असे वाटून गेले. परदेशात ट्रेक करावा असे प्रथम टी अनौ येथे वाटले आणि वाटणे प्रत्यक्षात पूर्ण झाले अलास्का ला! 

            टी अनौ येथील अतिशय स्वच्छ सुंदर रस्ते , इमारती, कोवळ्या उन्हात जणू न्हाऊन निघत होते. मी बसमधून उतरून, फोटो काढून, सर्वजण येईपर्यंत चक्रधर बॉब बरोबर गप्पा मारीत उभा होतो. बॉब म्हणाला, ‘केवळ टी अनौ गावच नव्हे तर टी अनौ तळसुद्धा डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. हौशी ट्रेकर्स टी अनौवरून मिलफोर्ड साउंडला ट्रेकिंग करीतही जातात. घुमक्कड प्रवासी क्विन्सटाऊनपेक्षा टी अनौला मुक्काम करतात आणि इथूनच माघार        फिरतात.’ मी तर प्रथमदर्शनीच टी अनौच्या प्रेमात पडलो. नंतर आजूबाजूच्या परिसराचे निरीक्षण करताना एक महत्त्वाचा फरक माझ्या नजरेस पडला. टी अनौ येथे बसेस थांबल्या, की परदेशी पर्यटक बसमधून फटाफट उतरत. आमच्या बसमधून किंवा दुसऱ्या ज्या बसमधे भारतीय प्रवासी होते ते दांडीला धरून, इकडे तिकडे हलत, रमतगमत बसमधून उतरत होते. हा फरक आजही तसाच दृष्टीस पडतो.

           टी अनौवरून मिलफोर्ड साउंडला जाण्यासाठी बस सुरू झाली आणि त्याचबरोबर चक्रधर आणि गाइड असणाऱ्या बाँबचे सुंदर परिसराची माहिती देणे सुरू झालं. बॉब म्हणाला, ‘आता आपण मिरर लेक बघायला चाललो आहोत. हे मिरर लेक फियोर्ड लॅंड राष्ट्रीय उद्यानात येते आणि न्यू झीलंडमध्ये जी राष्ट्रीय उद्याने आहेत त्यात फियोर्डलॅंड हे पहिल्या क्रमांकावर आहे. अर्ल पर्वतशिखराजवळचा हा देखणा परिसर पायी फिरण्यासारखा आहे. तुम्हाला तो खूप आवडेल.’ बस थांबल्यावर सर्वजण घाईघाईने उतरले. बाहेरचे वातावरण आम्हाला बाहेर बोलावत होते. 

          समोर दिसणारे वातावरण इतके अप्रतिम होते की सारेजण बरोबरच्यांची साथ सोडून वेड्यासारखे समोरच्या दृश्‍यांचे फोटो घेऊ लागले. पर्वतशिखरांवरून घरंगळणारे ढग त्यांना टिपायचे होते. स्फटिक स्वच्छ पाण्याचे, लयदार, वळणदार ओढ्यांचे, झाडांचे, पानांचे, फुलांचे, माणसांचे फोटो घेत, लाकडाच्या दर्शनीय पायवाटेवरून चालत मिरर लेक ही उलटी अक्षरे पाण्यात सुलटी दिसतील अशा खास मोक्‍याच्या जागेवर सगळ्यांची फोटो काढण्यासाठी झुंबड उडाली. इथे एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, लाकडी रस्ता अशा पद्धतीने बांधलाय, की सामान्य माणसाप्रमाणे अपंगही आपापल्या गाड्या घेऊन स्वतःच्या हिमतीवर हा परिसर बघू शकतात. भारतात आपल्याकडे असा विचारच दिसत नाही. त्यानंतर फिर्डयोलॅंड राष्ट्रीय उद्यानातील अतिशय मोकळ्या अतिशय उत्फुल्ल वातावरणाचा आम्ही सर्वांनी निरोप घेतला.

      आता घाई होती ती मिलफोर्ड साउंडला जाऊन वेळेवर निघणारा क्रूझ गाठण्याची!  प्रवासात किती गमती आपसूक घडतात नाही! क्विन्सटाऊनवरून निघालो तेव्हा ‘कहो ना प्यार है’चे शूटिग झाले ती अप्रतिम जागा बघायला जायचे असे का नावर आले होते. परंतु मिलफोर्ड साउंड ही जागा देखण्या फियोर्डचा एक भाग आहे किंवा मिलफोर्ड साउंड क्रूझमधे बसून बघायचे आहे याविषयी  जेमतेमच माहिती होती. त्यावेळी तर क्रूझचीदेखील काहीच माहिती नव्हती. आम्ही आपले नुसतेच ‘मिलफोर्ड साउंड’चा घोष करीत चाललो होतो. अखेर आम्ही क्रूझ सुटण्याच्या धक्‍कयाजवळ आलो. तिथे आमची ‘प्राइड ऑफ मिलफोर्ड ’ ही दिमाखदार क्रूझ उभी होती. म्हणजे आम्ही वेळेत होतो.

     तिकिटे देऊन शिरल्याशि रल्याच ‘बुफे’चा कार्यक्रम होता. थोडा वेळ मित्रमैत्रिणींबरोबर गप्पा मारल्यावर डेसेच पोटात ढकलून स्वातीला म्हटले, ‘हे सर्वजण जेवताहेत तोवर आपण बाहेर फोटो काढून डेकवर जाऊ’ आणि क्रूझकप्तानाला विचारून क्रूझच्या सर्वांत पुढच्या टोकाला रेलिगजवळ रेंगाळत राहिलो. आम्ही अतिशय मजेत असताना क्रूझ सुरू झाली. सुरुवातीला मजा वाटली. परंतु लवकरच क्रूझने वेग पकडला. मग अफाट थंडीत आपण हालचाल न करण्याइतपत गारठून जाऊ की काय , असे वाटले. चालत्या वेगवान क्रूझमध्ये केबिनमधे पाठी फिरणे तर शक्‍य नव्हते. परंतु सुदैवाने तोवर एका धबधब्याच्याजवळ क्रूझ पोचल्याने क्रूझची गती मंदावली आणि आमची गारठ्यातून सुटका झाली. क्रूझचे पहि ले दर्श न घडले ते असे आणि पहिलाच अनुभव अनुभवला तोदेखील असा! यावरून एक धडा मिळाला; क्रूझ असो अथवा बोट, न्यूझीलंडमधे काहीच हळू चालत नाही.

          क्रूझ सुरू झाल्यावर समोर दिसणाऱ्या हत्ती शिखराचे (१५१७ मीटर्स ), सिह शिखराचे (१३०२ मीटर्स ), मित्रे शिखराचे (१६९२ मीटर्स ) दर्शन झाल्यावर सर्व प्रवासी पाण्याऐवजी आकाशाकडे, शिखरांकडे बघू लागले. का हीवेळा हिरव्यानिळ्या तर का हीवेळा निळसर झाक असलेल्या पाण्यातून पर्वतकडांच्या खोबणीतल्या संथ पाण्यातून टास्मा न समुद्रापासून १५ किलोमीटरवर असलेल्या फियोर्ड मधून मिलफोर्ड साउंड परिसर बघताना अनेक चांगल्या गोष्टींचा साक्षात्कार झाला. वर उल्लेखलेली शिखरे बघू, की स्टर्लिंग आणि बॉवेन हे जोमदार धबधबे बघू? क्रूझ बाजूच्या पाण्यात कोसळणाऱ्या जोरकस जलधारा बघू, की कोवळे ऊन खात दगडावर तपस्व् याप्रमाणे शांतपणे डोळे मिटून अपार शांततेत आराम करणारे सील बघू ? क्रूझबरोबर स्पर्धा करीत, बघणाऱ्या सर्व प्रवाशांना अतीव नेत्रसुख देणारे डॉल्फिन्स बघू, की केवळ निसर्गाच्या, धाडसाच्या, एकाडेपणाच्या आवडीतून मनापासून ‘कयाक ’मधून विहार करणारे विरले युवा प्रवासी बघू? रंगरूप बदलत चमचमणारे पाणी बघू, की साप नसल्यामुळे निर्धोक चालण्याजोगा ट्रेक रूट बघू?.. या विचारात गुंग असताना रुडयार्ड किपलिगसारखा लेखक मिलफोर्ड साउंडला जगातील आठवे आश्‍चर्य मानतो, असे ऐकायला आले.

     दरवर्षी १०-१२ लाख प्रवासी मिलफोर्ड साउंडला भेट देतात ते काही उगाच नाही. आमची क्रूझ एका थांब्यावर थांबली. आकाशात पाहिले, तर दोन हेलिकाप्टर्स देखील पाहायला मिळाली. तेव्हा कळले, की मिलफोर्ड साउंड एक्‍सप्लोर करायचे अनेक मार्ग आहेत त्यातला एक मार्ग हेलिकाप्टरद्वारे फेरी मारण्याचादेखील आहे. त्यानंतर खोलवर क्रूझ गेल्यावर क्रूझ काही काळ आवाज करेनाशी झाली. सहप्रवासी आणि हनिमून कपल्स यांच्यात आपसूक विभागणी झाली. युवा प्रवाशांनी मोक्‍याच्या जागा पकडून जणू एकमेकाच्या अंतर्म नात खोलवर जाण्याचा प्रयत्न केला. सर्वजण असे निसर्गात बुडून गेले असताना दोन डोळे अपुरे असल्याची जाणीव साऱ्यांनाच झाली. अक्षरशः अधाशासारखी निसर्गदृश्‍ये पिऊन घेत सारेजण चुळबुळ करू लागले, तशी क्रूझ पुन्हा एकदा आवाज करीत परतीच्या प्रवासाला लागली.

          सतत प्रश्‍न विचारणारी शंकेखोर मंडळी असतात ना त्याच पंथातल्या एका ने, दुसऱ्यांदा न्यूझीलंड दौऱ्यावर येणाऱ्या आमच्या सहप्रवाश्‍याला प्रश्‍न विचारला, ‘मिलफोर्ड साउंड ही एकच जागा आहे का इथे पाहायला?’ त्याच्या प्रश्‍ना वर जाणकार सहप्रवासी म्हणाला, 'तुझी शंका -तुझा डाउट खरा आहे. येथून जवळच डाउटफुल साउंड ही दुसरी जागा आहे. पण तिथे जाणे थोडे अडचणीचे आहे. तुम्हाला जायचेय का तिथे?’ त्या दोघांच्या प्रश्‍नोत्तरांवर जमलेल्यांमधे एकच खसखस पिकली आणि आम्ही त्यानंतर क्रूझमधून बसमधे आणि बसमधून क्विन्सटाऊनकडे असे परतीच्या प्रवासाला लागलो.

कसे जाल?
मिलफोर्ड साउंडला जाण्यासाठी तुम्हाला क्विन्सटाऊन गाठावे लागेल. घुमक्कड टी अनौ या अप्रतिम गावातदेखील मुक्काम करू शकतात. क्विन्सटाऊन आणि टी अनौ या दोन्ही ही ठिकाणांहून तुमची पूर्ण सहल आखली जाऊ शकते. न्यूझीलंडच्या व्यावसायिक मंडळींचे आयोजन खूप चांगले असते. 

कुठे राहाल?
सिनिक स्वीट्स, २७, स्टेनले रस्ता ,क्विन्सटाऊन. याशिवाय तुमच्या बजेटप्रमाणे आणि आवडीनिवडीप्रमाणे तुम्हाला क्विन्सटाऊनमधे राहता येईल. 

काय आणि कुठे खाल?
मिलफोर्ड साउंडला गेल्यावर क्रूझमधे शक्‍य तो बुफे असतो. त्याशिवाय धक्‍कयाजवळ अनेक हॉटेल्स आहेत. टी अनौलादेखील उत्कृष्ट सोय आहे. क्विन्सटाऊनमधे तर खाण्याची चंगळ आहे. खूप छान फळे, त्या फळांच्या स्वादाची आइस्क्रीम्स, माशांचे चविष्ट पदार्थ इत्यादींवर ताव मारता येऊ शकतो. दिवसभरात कधीतरी एकदा भारतीय अन्नपदार्थ खाण्याची तीव्र इच्छा झाल्यास क्विन्सटाऊन येथे, फ्रियाज इंडिया रेस्टॉरंट, ३३, कॅम्प रस्ता , तंदूर पॅलेस, ६२, शॉटओव्हर रस्ता , इंडियन स्टार रेस्टॉरंट,१११८, तुतनेका ई रस्ता आदी ठिकाणे आहेत. 

मिल फोर्ड साउंड कसे पाहाल?
क्विन्सटाऊन-मि लफोर्ड साउंड-क्विन्सटाऊन अशी एक पूर्ण दिवसाची सफारी करता येईल. घुमक्कड असाल आणि तुमच्याजवळ जास्त दिवस असतील तर टी अनौवरून मिलफोर्ड साउंड, डाउटफुल साउंड अशा सफारी करू शकता.हवामान चांगले असेल तर हेलिकाप्टरमधूनदेखील तुम्ही मिलफोर्ड साउंडची सैर करू शकता. धाडसी असलात, सरावात असलात, तर कयाक मधूनदेखील तुम्ही सफारी करू शकता.ट्रेकिंगची आवड असणारे तर इथे ट्रेक सुद्धा करू शकतात.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News