परदेशात उच्च शिक्षणासाठी जाण्यापुर्वी...

प्रथमेश आडविलकर
Monday, 3 June 2019

आपण परदेशातील उच्च शिक्षण आणि शैक्षणिक शुल्काविषयी माहिती घेतली. या लेखामध्ये आपण परदेशातील विविध विद्यापीठांतील वेगवेगळ्या अभ्यासक्रमांविषयी माहिती जाणून घेऊया.

भारतीय विद्यापीठांसारखेच परदेशी विद्यापीठांमध्येही विद्याशाखांनुसार स्वतंत्र विभाग असतात. त्यांना स्कूल्स असे संबोधले जाते. जवळपास सर्व परदेशी विद्यापीठांमध्ये कला आणि सामाजिक विज्ञान, मानववंशशास्त्र, मूलभूत विज्ञान, अभियांत्रिकी, आरेखन (आर्किटेक्‍चर), व्यवस्थापन व उद्योजकता हे प्रमुख विभाग दिसून येतात. परदेशातील वाढत्या औद्योगिकीकरणाची गरज म्हणून जवळपास सर्वच परदेशी विद्यापीठे ही तेथील उद्योग क्षेत्राशी जोडली गेली. म्हणूनच तिथल्या बहुतांश विद्यापीठांना उद्योग क्षेत्राकडून वारंवार आर्थिक मदत केली जाते.

एवढेच नव्हे; तर परदेशातील बहुतांश विद्यापीठे ही स्वायत्त असल्याने त्यांचा अंतिम अभ्यासक्रम निश्‍चित करण्यामध्ये उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांचा सहभाग असतो. परदेशातील जवळपास सर्वच विद्यापीठे ही संशोधन विद्यापीठे असतात. अभियांत्रिकी आणि मूलभूत विज्ञान या विषयांतील शिक्षण-संशोधनावर तिथल्या अनेक विद्यापीठांचा भर असला, तरी अलीकडे मात्र या विद्यापीठांनी साहित्य, अर्थशास्त्र, भाषा, उद्योग-व्यवसाय आणि व्यवस्थापन या विभागांमध्येही उत्कृष्ट संशोधन केल्याचे आढळून येत आहे.

परदेशातील बहुतांश विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचे असतात; तर पदव्युत्तर अभ्यासक्रम वेगवेगळ्या कालावधीचे असतात. परदेशी विद्यापीठांमध्ये असलेला प्रमुख शैक्षणिक विभाग म्हणजेच स्कूल्सच्या माध्यमातून सर्व पदवी व पदव्युत्तर विभाग चालतात. या सर्व विभागांमधून विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर, व्यावसायिक आणि संशोधन पातळीवरील शेकडो अभ्यासक्रमांचे सर्टिफिकेट्‌स, ऑनलाईन व ऑफलाईन पर्याय परदेशी विद्यापीठांनी उपलब्ध करून दिले आहेत. विशेष म्हणजे हे सर्व अभ्यासक्रम मान्यताप्राप्त असून त्यांची वैधता सर्व ठिकाणी ग्राह्य धरली जाते.

विद्यापीठांमार्फत चालणाऱ्या या सर्व अभ्यासक्रमांना त्या-त्या देशांतील अधिकृत आस्थापनेची मान्यता मिळालेली असते. सर्वच परदेशी विद्यापीठातील ऑफलाईन अभ्यासक्रम हे फॉल आणि स्प्रिंग या दोन सत्रांमध्ये चालतात; तर ऑनलाईन अभ्यासक्रम वर्षभर उपलब्ध असतात. विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांना प्रवेश मिळविण्यासाठी त्या-त्या पदवी वा पदव्युत्तर स्तरासाठी आवश्‍यक असलेली प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे विद्यार्थ्यांसाठी गरजेचे आहे. 

भारतीय विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशाकडे ओढ असण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे तिथे उपलब्ध असलेले विषयांचे अमर्याद पर्याय. कोणतीही विद्याशाखा असली, तरीही अमेरिकेपासून ते युरोप, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियापर्यंत प्रत्येक देशात त्या विद्याशाखेतील विषयांचे वा उप-विषयांचे भरपूर पर्याय उपलब्ध आहेत.

भारतातील क्वचितच एखाद्या विद्यापीठात विषयांची इतकी उपलब्धता मिळेल. उदाहरणार्थ, जगातल्या पहिल्या क्रमांकाचे विद्यापीठ म्हणजे ‘एमआयटी’. या विद्यापीठांतील विविध स्कूल्सपैकी ‘स्कूल ऑफ आर्किटेक्‍चर ॲण्ड प्लॅनिंग’च्या अंतर्गत सेंटर फॉर रियल इस्टेट, मीडिया आर्टस्‌ ॲण्ड सायन्सेस, अर्बन स्टडिज ॲण्ड प्लॅनिंग हे विभाग; तर ‘स्कूल ऑफ इंजिनियरिंग’अंतर्गत एअरोनॉटिक्‍स ॲण्ड ॲस्ट्रोनॉटिक्‍स, बायोलॉजिकल इंजिनियरिंग, केमिकल इंजिनियरिंग, सिव्हिल ॲण्ड एन्व्हॉयर्नमेंटल इंजिनियरिंग, इलेक्‍ट्रिकल इंजिनियरिंग ॲण्ड कॉम्प्युटर सायन्स, हार्वर्ड-एमआयटी हेल्थ सायन्सेस अँड टेक्‍नॉलॉजी, इन्स्टिट्यूट फॉर डेटा, सिस्टम्स ॲण्ड सोसायटी, मटेरियल्स सायन्स ॲण्ड इंजिनियरिंग, मेकॅनिकल इंजिनियरिंग, न्युक्‍लिअर सायन्स ॲण्ड इंजिनियरिंग हे विभाग येतात.

याशिवाय ‘स्कूल ऑफ ह्यूमॅनिटीज, आर्टस ॲण्ड सोशल सायन्सेस’अंतर्गत कंपॅरेटिव्ह मीडिया स्टडीज, इकॉनॉमिक्‍स, हिस्टरी, ॲन्थ्रॅपॉलॉजी- सायन्स-टेक्‍नोलॉजी ॲण्ड सोसायटी, लिंग्विस्टिक ॲण्ड फिलोसॉफी, पॉलिटिकल सायन्स, सायन्स रायटिंग इत्यादी विभाग, ‘स्कूल ऑफ सायन्सेस’अंतर्गत फिजिक्‍स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथेमॅटिक्‍स, ब्रेन ॲण्ड कॉग्निटिव्ह सायन्स, अर्थ, ॲटमॉसफिअरिक ॲण्ड प्लॅनेटरी सायन्स; तर स्कूल ऑफ मॅनेजमेंटअंतर्गत एमआयटी स्लोआन एक्‍झिक्‍युटिव्ह एमबीए प्रोग्रॅम, एमआयटी स्लोआन फेलोज एमबीए प्रोग्रॅम, एमआयटी स्लोआन एमबीए प्रोग्रॅम, एमआयटी स्लोआन पीएचडी प्रोग्रॅम, एमआयटी स्लोआन मास्टर ऑफ बिझनेस ॲनॅलिटिक्‍स, एमआयटी स्लोआन मास्टर ऑफ फायनान्स, एमआयटी स्लोआन मास्टर ऑफ सायन्स इन मॅनेजमेंट स्टडिज इत्यादी अभ्यासक्रम आणि विभाग आहेत. विषयांची अशीच उपलब्धता आणि विभागांची रचना थोड्याफार फरकाने प्रत्येक विद्यापीठामध्ये असते. 

सर्वसाधारणपणे प्रत्येक विद्यापीठामध्ये अँथ्रॅपॉलॉजी, इकोनॉमिक्‍स, हिस्टरी, लिंग्विस्टिक्‍स,फिलोसॉफी, पॉलिटिकल सायन्स, फिजिक्‍स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथेमॅटिक्‍स, म्युझिक, इंग्लिश, सायकॉलॉजी, मटेरियल्स सायन्स ॲण्ड इंजिनियरिंग, एअरोनॉटिक्‍स ॲण्ड ॲस्ट्रोनॉटिक्‍स, बायोइंजिनियरिंग, केमिकल इंजिनियरिंग, सिव्हिल ॲण्ड एन्व्हॉयर्नमेंटल इंजिनियरिंग, मॅनेजमेंट सायन्स ॲण्ड इंजिनियरिंग, इलेक्‍ट्रिकल इंजिनियरिंग, कॉम्प्युटर सायन्स, मेकॅनिकल इंजिनियरिंग यांपैकी बहुतांश विषय असतात. तर काही विद्यापीठांमध्ये अर्थ सिस्टम सायन्सेस, अर्थ, एनर्जी ॲण्ड एन्व्हॉयर्नमेंटल सायन्सेस, एनर्जी रिसोर्सेस इंजिनियरिंग, जिओफिजिक्‍स आणि जिओलॉजीकल सायन्सेस यांसारखे थोडेसे हटके वाटणारे आणि वैद्यकीय शाखेअंतर्गत ॲनेस्थेशिया, जेनेटिक्‍स, सर्जरी, हेल्थ रिसर्च, बायोइंजिनियरिंग, न्युरोलॉजी, न्युरोबायोलॉजी इत्यादी विषय अभ्यासक्रमाला असतात.

Email: itsprathamesh@gmail.com
(लेखक परदेशातील उच्च शिक्षण या विषयातील करिअर समुपदेशक आहेत.)

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News