त्वचेवरील ग्लो एक भूलभुलय्या!

डॉ. प्रमोद हरी महाजन
Saturday, 6 July 2019
  • अशा व्यक्तींना औषधांची अथवा कॉस्मेटिक्‍सची अयोग्य स्वरूपाची सवय लागण्याची शक्‍यता असते.
  • त्यांचे सौंदर्यदोष वयाच्या मानाने जास्त प्रमाणात हळूहळू वाढत जाऊन त्वचेचा निस्तेजपणा, खडबडीतपणा व काळसरपणा वाढण्याची शक्‍यता असते.

व्यक्तींना स्वतःची त्वचा तपासून न घेता तिच्यातील दोष घालविणारे औषध अथवा कॉस्मेटिक्‍स हवे असते. हे व्यावहारिक, पण अव्यवहारी स्वरूपाचे धोरण त्या व्यक्तीच्या त्वचा सौंदर्यसंवर्धनाला घातक ठरते. अशा व्यक्तींना औषधांची अथवा कॉस्मेटिक्‍सची अयोग्य स्वरूपाची सवय लागण्याची शक्‍यता असते. त्यांचे सौंदर्यदोष वयाच्या मानाने जास्त प्रमाणात हळूहळू वाढत जाऊन त्वचेचा निस्तेजपणा, खडबडीतपणा व काळसरपणा वाढण्याची शक्‍यता असते. म्हणून त्वचेचे योग्य अन्वेषण करून घेऊन योग्य वैद्यकीय सौंदर्य उपचार पुरेसा वेळ घ्यावेत. स्वयंउपचार व अवैद्यकीय उपचार टाळावेत.

वातावरणातील प्रदूषण, सूर्यप्रकाश, तीव्र कृत्रिम प्रकाश, हर्मोन्स, सौंदर्यप्रसाधनांचा गैरवापर, शरीरातील विविध आरोग्य समस्या यांचा परिणाम त्वचेवर होतो व त्वचेचे तेज कमी व्हावयास लागते. निरोगी मुलांच्या चेहऱ्यावर ग्लो निसर्गतःच दिसते. त्यांना सौंदर्यप्रसाधने वापरण्याची गरज नसते. ग्लो / तेज हा त्वचेच्या बाह्य व आंतरिक सशक्त स्थितीचा व व्यक्तीच्या निरोगीपणाचा गुणधर्माचा एकंदरीत परिणाम आहे. नॉर्मल नसलेल्या त्वचेवर बाहेरून सौंदर्यप्रसाधने अथवा औषधे लावण्यामुळे त्वचेवर तात्पुरते तेज अथवा ग्लो दिसत असले तरी या रसायनांचा परिणाम ओसरल्यावर हे तेज थोड्या वेळानंतर निघून जाते. मात्र त्वचेचे तेज निरोगीपणामध्ये आतून निर्माण होत असेल तरच टिकते म्हणून त्वचेवर ग्लो टिकवावयाचा असेल तर त्वचेमध्ये व शरीराच्या आरोग्यामध्ये बाह्य व आंतरीक सकारात्मक सुसंगत बदल करणारे दोन्ही प्रकारचे उपचार घ्यावयास हवे. निरोगी त्वचेवर तेज निसर्गतःच दिसत असते व ते टिकते. 
   
त्वचेवर सौंदर्य समस्या असल्यास / रोग असल्यास अथवा त्वचेची / शरीराची आरोग्य गुणवत्ता घसरल्यास तेज / ग्लो दिसत नाही. विविध कारणांमुळे त्वचेचे बिघडलेले आंतरीक सौंदर्यदोष, सौंदर्य लेसर व इतर वैद्यकीय सौंदर्य त्वचा नवजीवनीकरण (रेजुव्हेनेशन) उपचारांनी सुधारता येतात व त्वचेवर ग्लो / तेज निर्माण करता येते. उदा. त्वचेचा गुळगुळीतपणा, उजळपणा, तेलकटपणा, त्वचेच्या पृष्ठभागावर समान प्रमाणात रंग- छटा, त्वचेचा रक्तप्रवाह, त्वचेची मर्यादित पारदर्शकता इत्यादी.

क्‍यू स्वीच / लाँग पल्स एनडी याग लेसर फेशियल स्किन रेजुव्हेनेशन त्वचेच्या आत चार ते सहा मि.मी. पर्यंत प्रभाव निर्माण करते. त्यामुळे त्वचेची गुणवत्ता आतून सुधारते व ग्लो वाढतो. मेकअप केल्यामुळे चेहरा सुंदर दिसतो; पण चेहऱ्यावरील सौंदर्यदोष समोरच्या व्यक्तीच्या लक्षात येत नाहीत, असे समजू नये. मेकअपला व इतर कृत्रिम सौंदर्यवर्धक उत्पादनांना स्वतःच्या मर्यादा आहेत व कालांतराने त्यांचे अयोग्यसह परिणामही आहेत.

आपल्या त्वचेवरील त्वचेचा नैसर्गिक ग्लो आपल्या सुदृढ आरोग्याचे प्रतीक आहे. त्वचेवरचा हा ग्लो टिकविण्यासाठी शरीराचे व त्वचेचे नैसर्गिक आरोग्य टिकविणे गरजेचे असते. आपल्या आरोग्याची गुणवत्ता सुधारण्याकडे लक्ष द्यावे. शॉर्टकट टाळावा. अनावश्‍यक अथवा अयोग्य व विविध सौंदर्यप्रसाधने लावणे, अनावश्‍यक अवैद्यकीय सौंदर्य उपचार पद्धत वापरणे, त्वचेला संरक्षण न देणे, हे सर्व कालांतराने त्वचेच्या सौंदर्यास घातक ठरताना आढळतात. अशा व्यक्तींमध्ये योग्य वैद्यकीय सौंदर्य उपचार सुरू करण्यासाठी उशीर झालेला असतो.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News