मराठीला अभिजात दर्जा द्या; मनसे मोदींना पाठवणार १० हजार पोस्ट कार्ड...!

हर्षल भदाणे पाटील
Friday, 7 June 2019
  • मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव
  • दक्षिणी भाषाकडून आपण भाषाप्रेम शिकायला हवं

नवी मुंबई - मनसे मराठीच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. साडेचार वर्ष उलटली तरीही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला नसल्यामुळे मनसे सरकारला घेरण्याच्या प्रयत्नात आहे. तमिळ सह संस्कृत, तेलगु, कन्नड, मल्याळम, ओडीआ या सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला मग मराठीला का नाही ? असा सवालही मनसेने उपस्थीत केला आहे.

 

केंद्र सरकारने शिक्षण धोरण मसुद्यात हिंदीची सक्ती केली होती. दक्षिणेत हिंदी भाषेला होणारा विरोध पाहता केंद्र सरकारने शिक्षण धोरणाच्या मसु्द्यात बदल केला आहे. या मसुद्यातील बदलात हिंदी भाषेतील असणारी सक्ती काढण्यात आली आहे. आता महाराष्ट्र नव निर्माण सेना मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी थेट पंतप्रधान मोदींना दहा हजार पोस्ट कार्ड पाठवणार आहे. तसं पत्रही नवी मुंबई मनसेचे गजानन काळे यांनी ट्विटरच्या माध्यमातुन प्रसिद्ध केले आहे.

 

पत्रात काय आहे मजकुर ?

तमिळसह संस्कृत, तेलगु, कन्नड, मल्याळम, ओडीआ या सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. त्याचप्रमाणे मराठीने अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासंदर्भातील सर्व निकष पूर्ण करून आता साडेचार वर्ष उलटली आहेत. 

केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या भाषा तज्ञांनी एकमताने मराठीच्या बाजूने शिफारस केलेली असतानाही केंद्र सरकार ही घोषणा करायला टाळाटाळ करीत आहे. त्यामुळेच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा या मागणीबाबत दबाव वाढविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, नवी मुंबई शहराच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना १० हजार पोस्टकार्ड पाठविणार अशी घोषणा नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी केली आहे.

पठारे समितीने आपल्या अहवालात मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा या संदर्भातील सर्व कागदपत्रे, पुरावे, सादर केली आहेत, मात्र तरीही राज्य सरकार केंद्रावर दबाव आणत नाही आहे. त्यामुळेच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव अजून केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे. त्यामुळेच मनसे पोस्टकार्डच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मराठी जनतेच्या वतीने त्यांच्या भावना केंद्र सरकार कडे पोहचविणार असल्याची माहिती गजानन काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

तमिळ व इतर दक्षिणी भाषाकडून आपण भाषाप्रेम शिकायला हवे असे मत काल परवाच पठारे समितीचे समन्वयक हरी नरके यांनी व्यक्त केले होते व यापुढे राजकीय दबाव निर्माण करण्याचे काम, नागरिकांचे आहे असेही ते पुढे म्हणाले होते तोच आशय घेत केंद्र सरकार वर दबाव निर्माण करण्यासाठी व मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी मनसेने ही पोस्टकार्ड मोहीम सुरु केली असल्याचे मत मनसेचे गजानन काळे यांनी दिले आहे.

नवी मुंबईतीलच नव्हे तर महाराष्ट्रातील जनतेनेही याला प्रतिसाद द्यावा व मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी आपले मत पोस्ट कार्ड वर लिहून मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवावे असे  गजानन काळे यांनी मांडले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News