असे घडवा मुलांनमध्ये ‘व्यक्तिमत्त्व’!

शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक
Wednesday, 5 June 2019

अर्थात, मुलांचं व्यक्तिमत्त्व चांगलं घडावं या दिशेनं आपण विचार/प्रयत्न करणार असू, तर प्रथम चांगलं व्यक्तिमत्त्व म्हणजे काय?

पालक मुलांना सर्वांत मोलाचं काय देऊ शकतात, या प्रश्‍नाचं खरं उत्तर आहे ‘व्यक्तिमत्त्व’. पालक मुलांशी जसं वागतात, बोलतात त्यातून मुलांची आत्मप्रतिमा घडत असते, त्याचं व्यक्तिमत्त्वही घडत असतं. पण मुलांचं व्यक्तिमत्त्व उत्तम घडावं, यासाठी पालक काही प्रयत्नही करू शकतात. काही दक्षताही घेऊ शकतात.

अर्थात, मुलांचं व्यक्तिमत्त्व चांगलं घडावं या दिशेनं आपण विचार/प्रयत्न करणार असू, तर प्रथम चांगलं व्यक्तिमत्त्व म्हणजे काय, आपली मुलं नेमकी कशी व्हायला हवीत याबद्दलच्या आपल्या कल्पना निश्‍चित हव्यात. व्यक्तिमत्त्व विकास हा सध्या परवलीचा शब्द झाला आहे. त्यासाठी कार्यशाळा, प्रशिक्षण शिबिरं घेतली जातात. त्यावर पुस्तकंही उपलब्ध असतात. मुद्दा असा आहे, अशी पुस्तकं वाचून मुलांना अशा शिबिरांना पाठवून त्याचं व्यक्तिमत्त्व विकसित होतं का? 

होय, पुस्तकातून त्यासाठीची काही सूत्रं मिळतात, पण ती नेटानं आचरणात आली तरच त्यांचा लाभ होणार! होय कार्यशाळेतून त्यासाठीची दिशा दाखवली जाते, पण त्यादिशेनं प्रवास तर ज्याचा त्यानेच करायचा असतो.

व्यक्तिमत्त्वात तडकाफडकी काही बदल होत नसतो. व्यक्तिमत्त्व घडवणं, फुलवणं हा एक सतत चालणारा प्रवास असतो. शिवाय प्रत्येकाचं व्यक्तिमत्त्व, प्रत्येकाचा पिंड वेगळा असतो. सर्वच सूत्रं उपयुक्त ठरत असली, तरी प्रारंभी त्यातील आपल्याला झेपणारी, पेलणारी, आपल्या मूळ व्यक्तिमत्त्वाशी सहजी जळणारी अशी सूत्रं आत्मसात करणं योग्य ठरतं. या बाबतीत इन्स्टंट असं काही नसतं. झटपट परिणामाची अवास्तव अपेक्षा असल्यास ती पूर्ण होत नाही. मग सूत्रांमधला विश्‍वास आणि प्रयत्नांमधला उत्साह ओसरत जातो. मुलांचा उत्साह असा ओसरणार नाही, याकडं पालकांनी लक्ष द्यावं लागतं.

त्याहीपेक्षा पालकांनी हे लक्षात घ्यायला हवं की व्यक्तिमत्त्वाचे जे मूलभूत पायाभूत पैलू असतात, त्यांची जडणघडण ही घरातच होत असते आणि त्यात पालकांना वाटा किंवा त्याचं योगदान हे महत्त्वाचं असतं. मुलांचं व्यक्तिमत्त्व हे काही एका रात्रीत घडत नसतं... किंवा एखाद्या शिबिरातही घडत नसतं. दैनंदिन जीवनातल्या छोट्या-छोट्या गोष्टींतून त्याचं व्यक्तिमत्त्व घडत असतं... विकसित होत असतं.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News