राष्ट्रीय सेवा योजनेत मुलींच्या सहभागाचे प्रमाण वाढत आहे

डाॅ अतुल साळुंखे
Saturday, 26 September 2020

सळसळत्या उत्साहाच्या तरुणाईला त्यांच्या महाविद्यालयीन जीवनात दिशा देण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) माध्यमातून केले जाते. सध्या ३४ विद्यापिठांमध्ये एनएसएसचे काम सुरू असून एकूण ३.९३ लाख विद्यार्थी एनएसएसचे सभासद आहेत. 

राष्ट्रीय सेवा योजनेत मुलींच्या सहभागाचे प्रमाण वाढत आहे

राष्ट्रीय सेवा योजना (नॅशनल सर्व्हिस स्किम) म्हणजेच एनएसएसचा ५१ वा वर्धापन दिन नुकताच साजरा करण्यात आला. सक्षम व सक्रीय पिढी घडविणाऱ्या एनएसएसची भूमिका, कार्य आणि भविष्यातील दिशा याबाबत योजनेचे राज्य संपर्क अधिकारी प्राचार्य डॉ अतुल साळुंखे यांनी वर्धापन दिनानिमित्त यिनबझ बरोबर संवाद साधला.

सळसळत्या उत्साहाच्या तरुणाईला त्यांच्या महाविद्यालयीन जीवनात दिशा देण्याचे काम एनएसएसच्या माध्यमातून केले जाते. सध्या ३४ विद्यापिठांमध्ये एनएसएसचे काम सुरू असून एकूण ३.९३ लाख विद्यार्थी एनएसएसचे सभासद आहेत. विशेषतः या संख्येत मुलींचे प्रमाण दरवर्षी वाढत आहे. गेल्या दहा वर्षांच्या ट्रेंडचा विचार केला तर एनएसएसमध्ये शहरी व ग्रामीण अशा दोन्ही भागातील मुलींचा सहभाग वाढल्याचे आपल्याला दिसते. 

एनएसएसमध्ये मुलांना घडवले जाते. त्यांच्या आशा, अपेक्षा, आकांक्षा यांना योग्य दिशा देण्याचे काम एनएसएस करते. याच मुलांना अँबॅसिडर बनवून जेव्हा गावांमध्ये कामासाठी पाठविले जाते तेव्हा त्या गावातील तरुण मुला-मुलींच्या आयुष्यातही अप्रत्यक्षपणे परिवर्तन घडते. राष्ट्रीय सेवा योजनेची मुले करत असलेले कार्याचे निरीक्षण गावातील लोक करतात. एनएसएसच्या मुला-मुलींच्या वागण्या-बोलण्यातून गावातील तरुणाईला प्रोत्साहन मिळते. 

हे प्रोत्साहन दोन प्रकारचे असते. गावातील लोकांना पण वाटतं की ही मुलं बाहेरून येऊन हे काम करू शकतात तर आपण का नाही करू शकत? गावातील महिला देखील या गोष्टी बघत असतात. त्यांना पण वाटतं की जर ही मुलं शहरातून येऊन कोणतंही काम करू शकतात तर माझी मुलं शिकली तर ती पण गावासाठी काही करू शकतील. अशा प्रकारे जुन्या रुजलेल्या नकारात्मक भावना मोडीत काढण्याचे काम एनएसएसच्या माध्यमातून होते. त्यामुळे गावा-गावात परिवर्तन घडायला सुरवात होते. म्हणून या मुलांना राष्ट्रीय सेवा योजनेत ब्रँड अँबासिडर म्हटले जाते.

एनएसएसतर्फे अनेक उपक्रम राबविले जातात. कोव्हिड-१९ सारख्या महामारीच्या काळात मास्क, सॅनिटायझरचे वाटप असो  किंवा मोबाईलवर आरोग्य सेतू अॅप्लिकेशन डाउनलोड करून देण्यासाठीची मदत, एनएसएसच्या मुलांनी फर्स्ट लाईन वर्कर म्हणून काम केले आहे. याव्यतिरिक्त अन्य समाजोपयोगी प्रकल्प जसे की गोबरगॅस, बायोगॅस प्रकल्पाचा वापर, सांडपाण्याचा निचरा करायला शिकविणे या सर्वांचा फायदा लोकांना पटवून दिला जातो. शहरी भागातील काही महाविद्यालयांकडून गावे दत्तक घेतली जातात. त्यांच्या प्रयोग शाळेतील साहित्य जेव्हा त्या गावांमधील शाळांमध्ये नेले जाते किंवा त्या गावातील मुलांना शहरातील शाळेत आणून प्रात्यक्षिक दाखविले जाते तेव्हा दोन्ही बाजूने जाणिवा जागृत होतात. महाविद्यालयांना वाटायला लागतं की आपण या मुलांना शिकवलं पाहिजे आणि गावातील मुलांना उच्च शिक्षणाची ओढ लागते. 

एनएसएसच्या विद्यार्थ्यांना असलेल्या रसायनशास्त्राच्या (केमिस्ट्री) ज्ञानाचा उपयोग शेतकऱ्यांना पाणी व मातीच्या विश्लेषणासाठी करता आला किंवा जर एखाद्याला रक्ताची चाचणी करता येत असेल तर गावकऱ्यांना त्यांचा रक्तगट जरी सांगता आला तरी त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप मदत होऊ शकते. सध्याच्या कोव्हिड-१९ महामारीच्या काळात शरीरातील आॅक्सिजन पातळीचे निदान करून देता आले तरी त्याचा खूप मोठा फायदा समाजाला होऊ शकतो. अशाप्रकारे एनएसएसच्या कार्याचा फायदा समाजाला यापूर्वीही आणि आताही होतो आहे.

आपल्या मुला-मुलींनी शिकावं अशी इच्छा शेतकरी कुटुंबातील पालकांना असते पण हीच मुलं नंतर शेतीपासून दूर जातील अशी भीतीही त्यांना असते. एनएसएसच्या माध्यमातून आपण या मुला-मुलींच्या आणि त्यांच्या पालकांच्या मानसिकतेमध्ये सकारात्मक बदल घडवून आणत आहोत. पेन आणि टिकाव याचा मेळ घालायचा प्रयत्न आपण करतो आहे. आणि असं झालं तर कुठल्याही शेतकऱ्याचा मुलगा शिक्षणापासून वंचित राहणार नाही आणि शेतीपासून दूरसुद्धा जाणार नाही. त्यामुळे अनेक गावातील मुलं-मुली शिक्षण घेतल्यानंतर पुन्हा शेतीकडे वळाली आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News