दहावीच्या परीक्षेत मुलींचीच बाजी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 9 June 2019
  • लातूर विभागीय मंडळाचा ७२.८७ टक्के निकाल
  • गतवर्षीच्या तुलनेत कमी निकाल

लातूर - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत लातूर विभागीय मंडळाचा निकाल ७२.८७ टक्के निकाल लागला आहे. या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे, अशी माहिती विभागीय मंडळाचे अध्यक्ष महेश करजगावकर यांनी येथे दिली.

लातूर विभागीय मंडळात एक लाख सात हजार २९१ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. या पैकी ७८ हजार १८७  विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात विशेष प्राविण्यात वीस हजार २५, ग्रेड एकमध्ये २९ हजार ६२४, ग्रेड दोनमध्ये २३ हजार २६९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पाच हजार २६९ विद्यार्थी पास झाले आहेत. निकालाची टक्केवारी ७२.८७  इतकी आहे. यात लातूर जिल्ह्याचा निकाल ७८.६६ टक्के लागला आहे. ३९ हजार ७६६ पैकी ३१ हजार २७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्याचा निकाल ७२.१७ टक्के लागला आहे. या जिल्ह्यात २२ हजार ३४५ पैकी १६ हजार १२७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नांदेड जिल्हयाचा निकाल ६८.१३ टक्के लागला आहे. या जिल्ह्यात ४५ हजार १८० पैकी ३० हजार ७८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, अशी माहिती श्री. करजगावकर यांनी दिली.

लातूर विभागात एक हजार ७३२ शाळातून विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. लातूर विभागात मुलींच्या निकालाची टक्केवारी ७८.२२ इतकी आहे. तर मुलांचा निकाल ६८.३५ टक्के इतका आहे. विभागात ४९ हजार ९७३ पैकी ३८ हजार ४८६ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर ५९ हजार १९५ पैकी ३९ हजार ७०१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

विभागात लातूर जिल्ह्याचा मुलींचा ८३.६४ तर मुलांचा ७८.६६ टक्के, उस्मानाबाद जिल्ह्याचा मुलींचा ७९.५० तर मुलांचा ७२.१७ टक्के तर नांदेड जिल्ह्याचा मुलींचा ७३.१५ टक्के तर मुलांचा ६३.१४ टक्के निकाल लागला आहे.  या विभागात शुन्य ते दहा टक्केपर्यंतच्या २८ तर दहा ते वीस टक्केपर्यंतच्या २१ शाळाचा निकाल आहे. या विभागात परीक्षा केंद्रावरील ४५ व परीक्षेनंतरचे २५ असे ७० गैरप्रकार उघडकीस आले होते. यात दोघांची एक अधिक पाच, ४२ जणांची एक अधिक एक तर तीघांची संबंधीत विषयाची संपादणूक पातळी रद्द करण्याची शिक्षा देण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

या विभागात खेळाच्या गुणासाठी एक हजार ९८५ प्रस्ताव आले होते. त्यापैकी एक हजार ९३८ प्रस्ताव पात्र ठरले असून केवळ ४७ प्रस्ताव अपात्र आहेत. चित्रकलेचे सहा हजार २४७ प्रस्ताव आले होते. त्या पैकी पाच हजार ६४९ प्रस्ताव पात्र ठरले असून ५९८ प्रस्ताव अपात्र ठरले आहेत.लोककलेचे १६० पैकी १५९ प्रस्ताव पात्र ठरले आहेत, अशी माहिती श्री. करजगावकर यांनी दिली. यावेळी मंडळाचे सचिव चित्तप्रकाश देशमुख, सहायक संचालक सुधाकर तेलंग, शिक्षणाधिकारी औदुंबर उकीरडे उपस्थित होते.

गतवर्षीच्या तुलनेत कमी निकाल
गेल्या वर्षी लातूर विभागाचा निकाल ८६.३० टक्के लागला होता. यावर्षी ७२.८७ टक्के निकाल लागला आहे. म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत १३.४३ टक्केने निकाल कमी लागला आहे. परीक्षेचा पॅटर्न बदलल्याने हा निकाल कमी लागला आहे, अशी माहिती श्री. करजगावकर यांनी दिली.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News