नाशिक जवळील रामशेज किल्ला जेवढा लहान तेवढाच त्याचा इतिहास महान आहे. संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत रामसेज हा असा एकमेव किल्ला होता ज्याने मोगलांशी जवळजवळ ५।। (साडे पाच) वर्षे सतत झुंज दिली. या मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षराने नोंद करुन ठेवण्यासारख्या पराक्रमाचे वर्णन मात्र आपल्याला मोगलांच्या कागदपत्रातून मिळते. तसेच ज्या पराक्रमी किल्लेदाराने सतत साडे पाच वर्षे किल्ला लढवला त्याचे नाव इतिहासाला अज्ञात आहे.

रामशेज म्हणजे रामाची शय्या. श्रीराम वनवासात असतांना त्यांनी या डोंगरावर काही दिवस मुक्काम केला होता, त्यामुळे या डोंगराला आणि किल्ल्याला "रामशेज" हे नाव मिळाले. संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत औरंगजेब हिंदवी स्वराज्य बुडविण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी महाराष्ट्रात आला. नाशिक प्रांत व शहर मुगलांच्या ताब्यात होते. अशावेळी नाशिक जवळील छोटासा गड घेण्यासाठी औरंगजेबने शहाबुद्दीन गाजीउद्दीन फिरोजजंग याला ४० हजार सैन्य, तोफखाना यांच्यासह पाठविले. मोगलांनी गडाला वेढा घातला तेव्हा गडावर ६०० च्या आसपास मावळे होते.

मोगलांनी रामशेजवर पहिला हल्ला चढवला आणि मोगल गडाला भिडले, त्याबरोबर गडावरील मावळ्यांनी दगडांचा प्रचंड मारा केला ,त्यामुळे मोगलांना माघार घ्यावी लागली. त्यानंतर शहाबुद्दीनने वेढा कडक करणे, सुरुंग लावणे, मोर्चे बांधणे, दमदमे तयार करुन त्यावर तोफा चढवून हल्ला करणे असे अनेक उपाय केले, पण रामशेजच्या अनुभवी किल्लेदाराने कौशल्याने आणि सावधगिरीने मोगलांचे सर्व मनसुबे उधळून लावले. मग हट्टाला पेटलेल्या शहाबुद्दीनने लाकडी बुरुज उभारून त्यावर तोफा चढवून किल्ल्यावर हल्ला करण्याची योजना आखली.
त्यानुसार आजुबाजूची जंगल तोडून लाकडे जमावण्यात आली. त्या लाकडांचा एक प्रचंड बुरूज बनविण्यात आला. मोगलांनी त्यावरून गडावर मारा सुरू केला पण त्याचा फारसा परीणाम झाला नाही. मे १६६२ मध्ये रामशेजचा वेढा फोडण्यासाठी संभाजी महाराजांनी रुपाजी भोसले व मानाजी मोरे यांना ५ ते ७ हजार सैन्यानिशी पाठविले. शहाबुद्दीनने गडाजवळील गणेश गावाजवळ मराठ्यांना रोखले. दोघांमध्ये तुंबळ युध्द झाले, त्यात मोगलांनी माघार घेतली. मराठ्यांनी मोगलांचे ५०० घोडे पकडून नेले. या विजयामुळे किल्ल्यावरील मावळ्यांमध्ये उत्साह संचारला. पण या पराजयामुळे औरंगजेब संतापला. त्याने बहादूरखानाला रामशेजला जाण्याची आज्ञा दिली.

शहाबुद्दीनने वेढा कडक करून किल्ल्यावर परत हल्ला चढवला. त्याबरोबर गडावरील मावळ्यांनी दगडांचा प्रचंड मारा केला .त्यात राजा दलपतराय दगडांच्या मार्याने जखमी झाला ,त्यामुळे मोगलांना माघार घ्यावी लागली. सलग येणार्या अपयशामुळे शहाबुद्दीन वेढा सोडून जुन्नरला गेला. आता वेढ्याची जबाबदारी बहादूरखानावर आली. त्याने किल्ल्यावर हल्ला करण्याची दुसरी योजना आखली. या योजने नुसार मोगलांच्या सैन्यातील एका गटाने तोफा, वाद्ये इत्यादी साहीत्य घेऊन गडाखाली एका जागी जमाव करावा. त्यामुळे या बाजूने मोगलांचा हल्ला होईल या कल्पनेने गडावरील मावळे त्या जागी जमतील. ही संधी साधून मोगलांच्या दुसर्या गटाने विरुध्द बाजूने किल्ल्यावर हल्ला करावा.
मराठ्यांना या योजनेची आधीच कुणकुण लागली होती. त्यामुळे मराठ्यांनी दोनही बाजूंना सैन्य विभागून मोगलांना सडकवून काढले आणि मोगलांच्या या योजनेवरही पाणी फिरवले. किल्ला जिंकण्यासाठी बहादूरखान काहीही करायला तयार होता. सैन्यातील लोकांनी एक तांत्रिक पकडून आणला. त्याने खानाला सांगितले मला १०० तोळे वजनाचा सोन्याचा साप बनवून द्या. तो मंतरून मी हातात घेईन आणि मग कुठलीही अडचण न येता मी तुमच्या सैन्याला किल्ल्याच्या प्रवेशव्दारा पर्यंत नेईन, मग विजय आपलाच. खानाने त्याच्या म्हणण्या प्रमाणे केले.

एके दिवशी तांत्रिकाला आघाडीवर ठेऊन मोगल सेना गडाच्या रोखाने निघाली. ती माराच्या टप्प्यात येताच मराठ्यांनी गडावरून गोफणीतून दगडफेक चालू केली.त्यातील एक दगड आघाडीवरच्या तांत्रिकाच्या छातीवर इतक्या जोराने लागला की, त्याच्या हातातील सोन्याचा साप उडाला आणि तांत्रिक खाली कोसळला. हे पाहून मोगल सैन्याचा धीर खचला व त्यांनी माघार घेतली.
या पराभवाने औरंगजेब संतापला. त्याने बहादूरखानाला वेढा सोडून जाण्याची आज्ञा दिली. या अपमानाने भडकलेल्या खानाने जातांना शहाबुद्दीनने उभारलेला लाकडी बुरुज जाळून टाकला. त्यानंतर औरंगजेबाने कासिमखान किरमाणी या सरदाराला रामशेजवर पाठवले, पण त्यालाही गड घेता आला नाही. अशा प्रकारे एक छोटासा गड पासष्ट महिने लढवून मराठे आणि त्यांचे किल्ले ही काय चीज आहे याची चुणूक मोगलांना दाखवली.