उठा, सज्ज व्हा! प्रतिबंधात्मक उपाय करून कोरोनाला पराभूत करा! 

गणित- विज्ञान अध्यापक मंडळ, हिंगणघाट
Tuesday, 17 March 2020

विश्व आरोग्य संघटनेने कोरोना म्हणजेच कोविड 19 या रोगास महामारी घोषित केली आहे. चीनच्या वूहान शहरातून या रोगाचा प्रकोप नोव्हेंबर 19 पासून झाला. कोरोनाबद्दल बरेच गोंधळ उडवणारे मेसेजेस व साहित्य आल्यामुळे जनतेला सतर्क करून प्रतिबंधात्मक उपाय योजून कोरोनास पराभूत करणे हेतूने जनजागरण करण्याचा आमचा मानस आहे.

तेव्हा उठा, सज्ज व्हा, खालील उपाययोजनांचा अवलंब करा व इतरांनाही माहिती द्या. 

कोरोनाची लक्षणे कोणती व त्याबद्दल आत्यंतिक भीती का आहे?
कोरोना हा संसर्गजन्य रोग आहे. त्याची सर्व लक्षणे फ्लू सारखीच! सर्दी, खोकला, ताप, घशात खरखर किंवा इन्फेक्शन. डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य औषधोपचार न घेतल्यास किंवा दुर्लक्ष केल्यास हा रोग बळावतो व न्युमोनिया, श्वसनास त्रास, शरीरात ऑक्सिजनचे कमी होणारे प्रमाण तसेच कधीकधी कफमधून रक्त इत्यादी लक्षणे दिसू लागतात. लोकांना सविस्तर माहिती नसल्याने केवळ अफवांमुळे जनमानसामध्ये भीती पसरते आहे. 

मोठी बातमी: विदेशी नागरिकांना झाला कोरोना; अफवा पसरविणाऱ्या तरुणावर गुन्हा 

कोरोना खूपच धोकादायक आहे का? 
उत्तर आहे, 'नाही', कोरोनामुळे होणारा मृत्यूदर केवळ दोन टक्के आहे. यापेक्षाही इबोला, स्वाइनफ्लू, चिकनगुनिया, बर्ड फ्लू, टीबी. ई. चा मृत्यू दर जास्त आहे. परंतु, कोरोनाहा संसर्गजन्य असल्याने आजारी व्यक्तीने स्वतःची काळजी घेऊन खोकलताना किंवा शिंकताना विषाणू पसरु नयेत याची खबरदारी घेणे जरुरी आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत ज्या लोकांना सर्दी- खोकला झाला आहे आहे त्यांच्यापासून अंतर ठेवावे, तसेच अशा व्यक्ती काळजी घेत नसल्यास त्यांना समजून सांगणे गरजेचे आहे. झालेला सर्दी, खोकला, कोरोना असेल असे नाही तर बदलत्या वातावरणाने बऱ्याच लोकांना हा त्रास होतो म्हणून काळजी न करता स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. 

कोरोना कोणास बाधित करण्याची जास्त शक्यता आहे? 
कोरोना लहान मुले, वृद्ध व्यक्ती किंवा ज्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी आहे, जसे कॅन्सर, टीबी, लिव्हर सोरासिस, अतिउच्च रक्तदाब, मधुमेह इत्यादी रुग्णांना होण्याची शक्यता जास्त असते. परंतु, आवश्यक काळजी घेतल्यास संभाव्य लागण टाळल्या जाऊ शकते. 

मोठी बातमी: सामान्यांना मंत्रालयात प्रवेश बंदी; महाविकास आघाडीचा निर्णय 

कोरोना हाऊ नये म्हणून कोण कोणती खबरदारी घेतली पाहिजे?
या रोगाची लक्षणे दोन ते 14 दिवसापर्यंत असतात जर तुम्हाला ताप, सर्दी, खोकला, घशात इन्फेक्शन असल्यास घाबरून न जाता डॉक्टरांचा सल्ला घ्या व योग्य उपचार करून घ्या. श्वसननलीका इन्फेकशन मुक्त होण्याकरता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य पद्धतीने वाफारा घ्या. पाणी भरपूर प्या व आराम करा. मुख्य म्हणजे हात वारंवार स्वच्छ धुवा व स्वच्छता ठेवा. 
खोकलताना, शिंकताना आपल्यामुळे इतरांना प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घ्या. जमल्यास हाताच्या कोपरामध्ये (कोहनीमध्ये) शिंका, खोकला. महत्त्वाचे म्हणजे दुर्लक्ष न करता योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊन दिलेल्या औषधांची मात्रा पूर्ण घ्या.

जास्त ताप, सर्दी, श्वसन त्रास होत असेल तर कोरोना टेस्ट करावी का?
नाही, डॉक्टरांच्याच सल्ल्याने कोरोना टेस्ट करावी जर डॉक्टरांना तुम्ही संशयित रुग्ण वाटत असल्यास ते योग्य निर्णय घेतील. या टेस्ट सरकारने निर्धारित केलेल्या लॅबमध्येच होतात कारण शेवटी बायोसेफ्टी फोर निर्देशांकाचे पालन करणे अनिवार्य असते. 

कोरोना पूर्ण बरा होतो का?
योग्य काळजी घेतल्यास व डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन केल्यास कोणत्याही अतिविशेष उपचाराविना कोरोना पूर्ण बरा होऊ शकतो. कोरोनाकरीता अद्याप कोणतीही प्रतिबंधात्मक लस निघाली नाही. तरी रुग्णांच्या दिसणार्‍या लक्षणांवरून डॉक्टर योग्य पद्धतीने उपचार करू शकतात. 

कोरोनोबद्दल गैरसमज कोणकोणते?
लसूण, आले खाल्ल्याने कोरोना टाळला जाऊ शकतो हा गैरसमज आहे त्यास कोणताही वैद्यकीय पुरावा नाही. अंडे, मांसाहाराने कोरोना होतो हा एक गैरसमज आहे अन्नपूर्ण शिजवून खावे ही एक दक्षता घ्यावी. तापमान वाढल्यास कोरोना कमी होईल असे तज्ञांचे मत आहे परंतु यात मतभिन्नता आहे. एन- नाईंटीफाईव, एन- नाईंटीनाईन मास्कची आवश्यकता नाही. 3 लेयर सर्जीकल मास्क या विषाणू करता पुरेसा आहे तेही योग्य सल्ला नंतरच वापरावा. पाळीव प्राण्यांपासून आपल्याला धोका होण्यापेक्षा आपणच पाळीव प्राण्यांपाशी जाताना हात स्वच्छ धुवून जावेत. सर्दी, खोकला, असल्यास त्यांच्याशी संपर्क येऊ देऊ नये. 

कोरोनाकरीता व्यक्तिगत काळजी कोणती घ्यावी?
स्वच्छ हात धूवावे. गर्दीत जाणे टाळावे. आवश्यक असल्यासच घराबाहेर पडावे. दवाखान्यात व मेडिकल स्टोअर किंवा इतर गर्दीच्या ठिकाणी अनावश्यक तेथे हात लावू नये व तशाच हाताने तोंड, नाक, डोळ्यांना स्पर्श करू नये. सर्दी, खोकला, ताप असलेल्या व्यक्तीशी संपर्क टाळावा किंवा अंतर ठेवावे.

सर्दी, खोकला, ताप, घशास त्रास इत्यादी लक्षण आढळल्यास घाबरून न जाता डॉक्टरांचा सल्ला व पूर्ण उपचार घ्यावा. व्हाट्सअ, फेसबुक व इतर प्रसारमाध्यमांवर केवळ प्रमाणितच माहिती टाकावी. जनमानसात गोंधळ व संभ्रम होईल अशा बिनबुडाच्या मेसेजची माहिती पोलिसांना द्यावी कारण हा एक सायबर गुन्हा आहे. शासनाच्या निर्देशांचे पालन करावे.

 

  • तेव्हा स्वतःची काळजी घ्या.
  • स्वजनांची काळजी घ्या, पर्यायाने समाजाची काळजी घ्या. 
  • सकस व संतुलित आहार घ्या. जेवणात पालेभाज्या व
  • फळे याचा समतोल राखा. प्रोटीन व विटामिन सी युक्त आहार घ्या.
  • सकारात्मक राहा, मनस्वास्थ्य उत्तम ठेवा.
  • स्वतःची प्रतिकारक्षमता वाढवा व कोरोनास पराभूत करा.
  • चला, उठा, सज्ज व्हा, अफवांवर विश्वास ठेवू नका. समाजजागृतीत सह्भागी व्हा...
  • सौजन्य: आगरकर विद्या भवन, हिंगणघाट

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News