गंधर्वगड

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 25 August 2020
  • गंधर्वगड हे नाव काहीसे काव्यात्मक असले तरी गंधर्वगड हा एक किल्ला आहे.
  • कोल्हापूर जिल्ह्यामधील चंदगड तालुक्यात हा किल्ला असून चंदगडापासून १२ ते १३ कि.मी. अंतरावरील एका पठारावर आहे.

गंधर्वगड हे नाव काहीसे काव्यात्मक असले तरी गंधर्वगड हा एक किल्ला आहे. कोल्हापूर जिल्ह्यामधील चंदगड तालुक्यात हा किल्ला असून चंदगडापासून १२ ते १३ कि.मी. अंतरावरील एका पठारावर आहे. किल्ल्यामध्येच गंधर्वगड नावाचे गाव आहे.

सभासद बखरीतील उल्लेखानुसार हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी वसविलेल्या १११ किल्ल्याच्या यादीत आहे. १५ जानेवारी १६६६ मध्ये पन्हाळगड घेण्याच्या उद्देशाने शिवराय ५ हजार सैन्यानिशी गंधर्वगडाच्या परिसरातून पन्हाळ्यावर चाल करून गेले. २८ जुलै १६८७ च्या पत्रात काकती कर्यातीचा देसाइ आणि हुकेरी परगण्याचा देसाइ आलगौडा यांनी मोगलांच्या वतीने मराठ्यांकडील गंधर्वगड घेतल्याचा उल्लेख आहे. या कामासाठी मोगलांनी काकतीच्या देसायांना अजमनगर/बेळगावची आणि हुकेरी देसायांना चंदगड आणि आजर्याची देशमुखी मनसब आणि एक हत्ती देण्याचे अमिष दाखविले होते.

या किल्ल्याचा ताबा बरीच वर्षे आदिलशाहीशी जवळीक असलेल्या हेरेकर सावंत भोसले यांच्याकडे होता. सदाशिवराव भाऊ कर्नाटकात जाताना येथे काही काळ मुक्कामास होते. पुढे १८४४ च्या बंडात इंग्रजांनी मोठ्या प्रमाणावर नासधूस केली. गडावरील पहाण्यासारखी ठिकाणेतुटलेल्या तटबंदीमधून आपला गडप्रवेश होतो. या बाजूला ढासळत चाललेल्या तटबंदीमध्ये दोन तीन बुरूज तग धरून उभे असलेले दिसतात. या तटबंदीमध्ये चोरवाट आहे पण ती ढासळलेल्या चिऱ्यामुळे पुर्णतया बुजून गेलेली आहे. तटबंदीजवळ एक दहा फूट खोलीची छोटीसी विहीर आहे.

विहीरीच्या तळाला एका कोपऱ्यात पाणी पाझरलेले दिसत होते. गंधर्वगडावरील चाळोबा हे गावातील लोकांचे ग्रामदैवत आणि श्रध्दास्थान. या जुन्या छोट्याशा मंदिराचा कायापालट करून नवे मोठे मंदिर गावकऱ्यांनी उभारलेले आहे. मंदिरत  चाळोबाचा मुखवटा आहे. मंदिराच्या परिसरात विरगळी पडलेल्या आहेत. बाजूलाच एका वास्तुचा भव्य चौथरा आहे. मंदिराच्या जवळ असलेल्या शाळेच्या परिसरात काही वर्षांपुर्वीपर्यंत गडकरी हेरेकर सावंत यांच्या वाड्याचे अवशेष होते. ते सर्व गावकऱ्यांनी नष्ट करून टाकले आणि तेथे मुलांना खेळण्यासाठी सपाट मैदान केले. गंधर्वगडाचे गडपण अंशाअंशाने कमी होत चालले आहे. इतरत्र अजूनही काही चौथरे आढळतात. गडाच्या माथ्यावरून महिपालगड आणि कलानंदीगड तसेच ताम्रपर्णी नदीचे खोरे दिसते.

पोहोचण्याच्या वाटा :-

कोल्हापूरहून चंदगडाची एसटी पकडायची. चंदगड यायच्या अगोदर साधारण १० किमी वर वळकुळी नावाचे गाव आहे. इथे उतरून डाव्या हाताचा रस्ता पकडायचा आणि गंधर्वगडवर पोहोचायचे. वळकुळी ते गंधर्वगड ही सुधारण अर्धा तासाची चाल आहे. गडाच्या पायथ्याशी आणि गडातील वस्तीलासुध्दा गंधर्वगड म्हणतात.

स्वत:चे वाहन असल्यास बेळगाव शिनोळी मार्गे नागनवाडी गाठायची. नागनवाडी गावातून २० मिनिटांच्या अंतरावर वाळकुळी गाव आहे. गंधर्वगडावर थेट गाडी रस्ता गेला असल्याने स्वत:ची गाडी असल्यास थेट गडावर जात येते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News