कनिष्ठ महाविद्यालयांचे क्‍लासेससमोर लोटांगण 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 3 June 2019
  • प्रवेश मिळवून देण्यासाठी मनधरणी
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया ठरणार नाममात्र 

नागपूर : राज्यात अकरावी प्रवेशासाठी माहिती पुस्तिकांची विक्री करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, अकरावी प्रवेश प्रक्रियेपेक्षा कनिष्ठ महाविद्यालयांचा विश्‍वास खासगी शिकवणी वर्गांवर अधिक असल्याने अकरावीत क्‍लासेसमधील विद्यार्थ्यांचे अधिकाअधिक प्रवेश स्वत:कडे मिळावे यासाठी कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्यांसह संस्थाचालक मोठ-मोठ्या शिकवणी वर्गासमोर लोटांगण घालत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे यंदाही अकरावीची प्रवेश प्रक्रिया नाममात्र ठरणार असल्याचे चित्र आहे. 

शिकवणी वर्गावर आळा बसावा यासाठी राज्यभरातील पाच शहरांमध्ये मागील वर्षापासून अकरावी प्रवेशाची ऑनलाइन प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र, या प्रक्रियेला छेद देत, क्‍लासेसमधूनच अकरावीचे प्रवेश झाल्याचे चित्र दिसून आले. गतवर्षी पहिलीच वेळ असल्याने अनेक नामवंत महाविद्यालयांना याचा फटका बसल्याचे दिसून आले. याचाच परिणाम जवळपास बारावीच्या निकालातही बघायला मिळाला. निकाल घटताच, मेरीटही घटले. मात्र, यावर्षी कुठलीही "रिस्क' न घेता, छोट्या कनिष्ठ महाविद्यालयांपासून तर शहरातील बड्या कनिष्ठ महाविद्यालयांनी कंबर कसली आहे.

त्यामुळे शहरातील नामवंत महाविद्यालयांमध्ये स्वत: प्राचार्य आणि संस्थाचालक खासगी शिकवणी वर्ग चालविणाऱ्यांकडे जाऊन त्यांच्याकडे प्रवेशासाठी विनवणी करतात. शिकवणी वर्गाच्या संचालकांना ते पटल्यास त्याच कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यात येतो. त्यामुळेच सध्या प्राचार्यांकडून खासगी शिकवणी वर्गाकडे प्राचार्य व संस्थाचालक लोटांगण घालत आहेत. मात्र, या प्रकाराने अकरावी प्रवेश प्रक्रिया खऱ्या अर्थाने नाममात्र ठरली असल्याचे दिसून येते. मागील वर्षी शहरातील काही नामवंत कनिष्ठ महाविद्यालयांची तपासणी केल्यास हे सत्य निश्‍चित बाहेर येईल. त्यामुळे बऱ्याच ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरातील दुसऱ्याच कोपऱ्यात प्रवेश घेत असल्याचे दिसून येते. 

क्‍लासेस ठरवितात प्रवेश 
दहावीच्या परीक्षेनंतर बारावीनंतरचे करिअर म्हणून खासगी शिकवणी वर्गाकडे पालकांची धाव असते. त्यामुळे महाविद्यालय कुठले असले तरी, शिकवणी वर्ग टॉपचे असावे असाच जवळपास पालकांचा कल असतो. त्यामुळे अकरावीपूर्वीच खासगी ट्युशन क्‍लासेसमध्ये पालकांची गर्दी असते. याचाच फायदा घेत, शिकवणी वर्ग घेणाऱ्या संस्थाच कुठला विद्यार्थी कुठे प्रवेश घेईल हे ठरते. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News