बनावट फॉलोअर्स तयार केल्याप्रकरणी दोन प्रसिद्ध अभिनेत्रींची नावे समोर 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 24 July 2020

आयुक्तांनी याप्रकरणी गुन्हे शाखेच्या गुप्तवार्ता विभागाला तपासाचे आदेश दिले होते.

मुंबई : समाज माध्यमावर बनावट फॉलोअर्स तयार केल्याप्रकरणी दोन प्रसिद्ध अभिनेत्रींची नावे समोर आल्यानंतर आता विविध क्षेत्रांतील 10 मोठी नावे पोलिसांच्या रडारवर आली आहेत. त्यात बांधकाम व्यावसायिक, नृत्यदिग्दर्शक, फॅशन डिझायनर, स्पोर्टस कंपनी यांचा समावेश असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले.

1 जुलै रोजी प्रसिद्ध गायिका भूमी त्रिवेदीच्या नावाने बनावट इस्टाग्राम खाते तयार करण्यात आल्याची तक्रार पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्याकडे केली होती. आयुक्तांनी याप्रकरणी गुन्हे शाखेच्या गुप्तवार्ता विभागाला तपासाचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी कुर्ला येथील गौरीशंकर नगर येथून तरुणाला अटक केली होती. याप्रकरणी तपास करणाऱ्या विशेष पथकाने आणखी दोन कंपन्यांची ओळख पटवली असून त्याही समाज माध्यमांवर बनावट फॉलोअर्स, लाईक्‍स तयार करत असल्याचा संशय होता. त्याप्रकरणी अखेर पोलिसांनी आरोपी काशीफ मन्सूरला अटक केली. मन्सूरने आतापर्यंत 25 हजार ऑर्डरनुसार फॉलोअर्स पुरवल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानुसार आरोपीने आतापर्यंत दोन कोटी 30 लाख बनावट फॉलोअर्स पुरवल्याचेही एका अधिकाऱ्याने सांगितले. त्याच्या चौकशीतून दोन प्रसिद्ध अभिनेत्रींसह बांधकाम व्यावसायिक, नृत्यदिग्दर्शक, फॅशन डिझायनर, स्पोर्टस कंपनी अशा 10 सेलेब्रिटी रडारवर आल्या आहेत.

भारतातील पहिलेच प्रकरण
इन्स्टाग्राम, फेसबुक या समाज माध्यमांवर सॉफ्टवेअरच्या मदतीने कोट्यवधी बनावट प्रोफाईल तयार करण्यात येतात. त्या माध्यमातून मागणीनुसार कोणाचेही फॉलोअर्स वाढवता येऊ शकतात. त्यामुळे त्या प्रोफाईलचा प्रभाव पडू शकतो. त्यासाठी विशिष्ट सॉफ्टवेअर (बॉट्‌स) तयार करण्यात आले होते. समाज माध्यमांच्या यंत्रणेत फेरफार करून हा प्रकार केला जातो. भारतात प्रथमच अशा यंत्रणेशी संबंधित व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. अशी 100 पेक्षा जास्त पोर्टल सध्या अस्तित्वात आहेत. याप्रकरणी पोलिसांनी 54 हून अधिक समाज माध्यमांची पडताळणी केली आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News