तोंडची भाकरी का पळाली...
निवडणुकीत देशातले सगळे दिग्गज नेते सोलापुरात ठान मांडून आहेत. निवडणुकीत शेवटच्या क्षणाला कोण निवडूण येईल, असे चित्र आहे. जिकडे पहावे, तिकडे बॅनर, म्हणजे इमारतीपेक्षा उंच असणारे बॅनर सोलापूरचं सौंदर्य विद्रूप करून टाकत होतं.
सोलापूरच्या निवडणूकीने सध्या महाराष्ट्रात काटेकी टक्कर असे चित्र उभे केले आहे. या निवडणुकीत देशातले सगळे दिग्गज नेते सोलापुरात ठान मांडून आहेत. निवडणुकीत शेवटच्या क्षणाला कोण निवडूण येईल, असे चित्र आहे. जिकडे पहावे, तिकडे बॅनर, म्हणजे इमारतीपेक्षा उंच असणारे बॅनर सोलापूरचं सौंदर्य विद्रूप करून टाकत होतं. आतापर्यंतच्या दौऱ्यामध्ये गल्ली बोळात प्रचार करणारे कार्यकर्ते, तेही भर उन्हात, हे चित्र मी सोलापूरात पाहिलं. सोलापूरहून मी वैराळ नावाच्या गावात गेलो. वैराळ आणि आसपासचा बार्शीचा पुर्ण पट्टा हा ज्वारीसाठी प्रसिध्द.म्हणजे राज्यात सगळीकडे या ठिकाणावरून ज्वारी खाण्यासाठी जाते.इथे ज्वारीचं पिकू शकते. जमिनीची पत, पडणारं पाणी, उन्हाची तिव्रता, या सगळ्यांच गणित पाहिलं तर ज्वारी हे एकमेव पिक कुठलाही दगा फटका न देता, डौलाने उभं राहतं, असे शिवराज फलफले सांगत होते.
ज्वारी पिकवण्यामागे दोन कारणे, एक खाण्यासाठी आहेच आहे, पण दुसरी इथेनॉलच्या वेगवेगळ्या कारखान्यावर ही ज्वारी विकत घेतली जायची. हा भाग प्रचंड दुष्काळी. त्यामुळे जनावरांना कडबाही ज्वारीच्या पिकातून मिळतो. पण आता गेल्या दोन वर्षापासून ज्वारीचा प्रसिध्द असलेला तालूका ज्वारी पिकवतचं नाही, अशी परिस्थिती आहे. फलफले यांच्याकडे शंभर एक्कर जमिन आहे, पण ज्वारी पिकवून तिचं काय करायचं हा प्रश्न त्यांच्या समोर आहे. पिकलेल्या ज्वारीला मार्केटच नाही, तर ज्वारीचे उत्पन्न घेऊन काय करावं, हा सवाल वैराळच्या फलफले यांनी विचारला होता. मंगळवेढा आणि पंढरपूर इथले इथेनॉलचे प्रकल्प बंद पडले होते, गेल्या दोन वर्षापासून पाण्याची पातळी इतकी खाली गेली आहे, की जनावरांनाही पिण्यासाठी पाणी नाही, चार एक्करवाला आणि पाच एक्करवाला आपल्या शेतात काही न पेरता जमिन तशीच पडिक ठेवण्यात समाधान मानतोय.हे जमीनवाले इतर जिल्ह्यात काम करण्यसाठी जातात.गावच्या गाव शेतात काही पिकत नसल्यामुळे रिकामे झाली आहेत.
याच गावात असलेल्या एका छोट्याशा व्यापाऱ्याला आम्ही भेटलो. शिवाजी कांबळे असं त्यांच नाव. शिवाजी कांबळे यांच्याकडे वडिलोपार्जित पाच एक्कर जमिन. पण ती जमिन त्यांनी पडिक ठेवली आहे. दोन वेळा त्यांनी पेरलं पण निसर्गाची साथ न मिळाल्यामुळे जेवढा खर्च त्यांनी पेरणीवर केला, त्याच्या निम्मं उत्पन्नही त्यांना मिळालं नाही. शेवटी त्यांनी या वर्षीपासून जमिन पडीक ठेवण्याचा निर्णय घेतला. बसस्टॅंडच्या समोर त्यांनी वर्षभरापूर्वी एक छोटसं बूट विक्रीचं दुकान टाकलं. पण नोटाबंदी आणि जीएसटी यांच्यामुळे त्यांच्या सगळ्या स्वप्नांचा चक्नाचुर झाला. कांबळे सांगत होते, की सरकारला कुठून अवदसा सुचली आणि त्यांनी नोटाबंदी केली. आम्ही आजूनही नोटाबंदीच्या धक्क्यामधून सावरलो नाही. कसं तरी दोन वेळेच्या खान्याची व्यवस्था आता होते, एवढं काय ते शिल्लक आहे.कांबळे यांनी तयार केलेली चागली बूट आणि चप्पल पुण्या मुंबईतही तयार होणार नाही अशा स्वरुपाची होती.
एक सोलापूर-पुणे रस्ता जर सोडला तर सोलापूर जिल्हातल्या रस्त्यांना कोणी वाली आहे की नाही, हा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. वैराळमधल्या रस्त्यांची आवस्था तर विचारायला नको.
या भागात जलयूक्त शिवाराची काम का झाली नाहीत, असा सवालही शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जोताय. याच गावातले शेफन शेख आणि अमोल कोरके सांगत होते की, आजूबाजूच्या अनेक जिल्हांमध्ये जलयूक्त शिवाराची खूप चांगली कामे झाली. पण आमच्या इकडे जलयूक्त शिवारांची कामे का झाली नाहीत, असं आम्ही तालुका पातळीवर अधिकाऱ्यांना अनेकांना विचारलं. पण आम्हाला कोणी समाधानकारक उत्तर द्यायला तयार नाहीत. गावात असलेला दुष्काळ आणि पिण्याचे पाणी, रस्ते यांच्या गंभीर झालेल्या समस्या वर्षापर्यंत कोणी सोडवत नाही. अशी आमची स्थिती आहे. आम्ही रस्त्याने निघालो, जिकडे पाहावे, तिकडे काळभोर रान, कुठे हिरवं दिसेलं तर नवलंच. अनेक ठिकाणी वाळलेल्या बोरांच्या बागा, छोट्या-छोट्या अंगूरच्या बागा तोडण्याचे काम जोरात सुरू होते. पिण्यासाठी कुठे तरी जनावरांना पाण्याची सोय सार्वजनिक विहरीवर सामाजिक भान ठेऊनच लोक करत असल्याचे आम्हाला पाहायला मिळत होतं. पण कुठेही शासनाच्या माध्यामातून जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय केली नसल्याचे होतं.
सोलापूर हा तसा मराठवाड्याच्या दुष्काळाच्या तुलनेत मराठवाड्याचा सख्खा भाऊ म्हणावा लागेल. पाणी जनावरांसाठी चारा आणि रस्ते या मुख्य गरजा इथल्या आहेत, त्या वर्षांनुवर्षांपासून आहेत. सोलापूरचा चादरीचा बंद असलेल्या कारखान्यासारखे अनेक विषय इथले गंभीर विषय आहेत. पण त्या पलिकडे जाऊन इथला विषय आहे, तो म्हणजे सक्षम नेतृत्वाचा, चांगल्या नेत्याचा. जे नेते देशपातळीवर आणि राज्य पातळीवर आपल्या कामगिरीचा ठसा उमठवतात त्यांचा ठोस दिसेल असा ठसा आपल्या जिल्हावर का उमटत नाही, असा सवाल विचारणारे अनेक जण मी सोलापूर जिल्हात असताना बोलताना अनुभवले.