कुस्तीच्या मैदानात 'मैत्रीने' जिंकले प्रेक्षकांचे मन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 8 January 2020

ही गदा मिळावी, यासाठी आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात आम्ही सारेच संघभावनेने सक्रिय होतो. आम्ही दोघे चांगले मित्र आहोत. संकुलाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी दोघेही जिद्दीने झटत आहोत. ही गदा आमच्या संकुलाला मिळाली आहे.

पुणे : ‘मी पराभूत झालोय, असे वाटत नाही. गदेचे आम्ही दोघेही मानकरी आहोत. मी पुन्हा महाराष्ट्र केसरीच्या मैदानात उतरणार आहे,’ अशी भावपूर्ण प्रतिक्रिया उपमहाराष्ट्र केसरी शैलेश शेळके याने व्यक्त केली.

हर्षवर्धन सदगीरने विजयानंतर जल्लोष करण्याआधी शैलेशला खांद्यावर उचलून घेतले. त्या वेळी भारावून गेलेल्या शैलेशने कुस्तीप्रेमींना अभिवादन केले. हर्षवर्धनने सांगितले की, ही गदा मिळावी, यासाठी आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात आम्ही सारेच संघभावनेने सक्रिय होतो. गेल्या दशकाची ही संघर्षगाथा आहे. यात आमच्यातील प्रत्येकाचा वाटा आहे.’ शैलेशने सांगितले की, आम्ही दोघे चांगले मित्र आहोत. संकुलाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी दोघेही जिद्दीने झटत आहोत. ही गदा आमच्या संकुलाला मिळाली आहे.

हर्षवर्धनने यापुढे हिंद केसरी व आंतरराष्ट्रीय स्तरांवरील स्पर्धांवर लक्ष असेल, असे सांगितले; तर शैलेशने ऑलिंपिक पदक हे सर्वोच्च ध्येय असल्याची महत्त्वाकांक्षा बोलून दाखविली. या दोन कसलेल्या मल्लांना घडविलेल्या काका पवार यांनीही याची ग्वाही दिली. ते म्हणाले की, महाराष्ट्र केसरी किताबानंतर आता आम्ही हिंद केसरी या देशातील सर्वोच्च प्रतिष्ठेच्या तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील पदके मिळविण्यासाठी प्रयत्न करू. एक वस्ताद या नात्याने माझ्या संकुलातील मल्ल मेहनतीत, प्रयत्नांत यत्किंचितही कमी पडणार नाहीत, अशी ग्वाही मी देतो. ते हे ध्येय साध्य करण्यात यशस्वी ठरतील, असा मला विश्वास आहे.

मल्लांची उत्तेजक चाचणी

गेली कित्येक वर्षे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद महाराष्ट्र केसरी लढतीची डोपिंग टेस्ट व्हावी, यासाठी प्रयत्न करीत होती. या सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर यंदा नाडाचे अधिकारी उपस्थित राहिले व त्यांनी आवश्‍यक ती प्रक्रिया पूर्ण केली. नाडाकडून अहवाल आल्यावर तो जाहीर करण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र केसरीचे तांत्रिक अधिकारी बंकट यादव यांनी दिली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News